राजकीय धुळवड! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मार्च 2019

शिमग्याच्या सणास अद्याप दोन आठवडे बाकी असतानाच देशात "राजकीय धुळवड' सुरू झाली आहे. खरे तर लोकसभा निवडणुका जेमतेम दीड महिन्यावर आल्यामुळे अशी धुळवड अपेक्षितच असली, तरीही आताची धुळवड ही देशाच्या संरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावरून सुरू होणे मात्र कोणालाच रुचणारे नाही.

शिमग्याच्या सणास अद्याप दोन आठवडे बाकी असतानाच देशात "राजकीय धुळवड' सुरू झाली आहे. खरे तर लोकसभा निवडणुका जेमतेम दीड महिन्यावर आल्यामुळे अशी धुळवड अपेक्षितच असली, तरीही आताची धुळवड ही देशाच्या संरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावरून सुरू होणे मात्र कोणालाच रुचणारे नाही. पुलवामा येथे "जैशे महंमद' या पाकिस्तानपुरस्कृत अतिरेकी संघटनेने घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे चाळीसहून अधिक जवान हुतात्मा झाले आणि त्यानंतर लगोलग भारतीय हवाई दलाने थेट पाकिस्तानातील "जैशे'च्या तळावर हल्ला करून तेथील अतिरेक्‍यांचे अड्डे उद्‌ध्वस्त केल्यापासून ही "राजकीय धुळवड' सुरू झाली असून, त्यात सत्ताधारी आणि विरोधी असे सर्वच पक्ष सामील होणे, ही बाब चिंताजनक आहे. शिवाय, त्यामुळे या पक्षांच्या विश्‍वासार्हतेबरोबरच देशाची राजकीय प्रतिष्ठाही मलिन होऊ पाहत आहे, याचेही भान कोणाला उरलेले नाही. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याची पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जातीने लक्ष घालून, त्याची भारतात रवानगी केली आणि तेव्हापासून या सर्व घटनांचे राजकीयीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे आता एकंदरीतच निवडणुकांच्या तोंडावर या पुढे प्रचाराची पातळी कोणत्या थराला जाऊ शकते, याची चुणूक बघायला मिळत आहे.

खरे तर या सर्व प्रकाराची सुरवात परदेशी प्रसारमाध्यमांतून, भारताच्या हवाई हल्ल्यात दोन-अडीचशे अतिरेकी ठार झाल्याच्या नरेंद्र मोदी सरकार करत असलेल्या दाव्यावर प्रश्‍नचिन्ह उभे करण्याने झाली आहे. त्याच वेळी दस्तुरखुद्द मोदी तसेच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी या हल्ल्याचे श्रेय घेण्यास सुरवात केली आणि लगोलग देशातील 21 विरोधी पक्षांनी एकत्रितपणे देशाच्या सुरक्षाविषयक प्रश्‍नाचे राजकारण करण्यास आक्षेप घेतला. त्यानंतर राहुल गांधी यांच्यापासून ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत आणि शरद पवार यांच्यापासून मेहबूबा मुफ्ती यांच्यापर्यंत अनेकांनी भारताने केलेल्या या हल्ल्याचे पुरावे मागण्यास सुरवात केली. मात्र, सरकारने त्याबाबत काहीही ठोस उत्तर न देता, आपल्याच दाव्यावर खंबीरपणे उभे राहण्याचा पवित्रा घेतला; तर मोदी यांनी आपल्या सभांमधून या हल्ल्याचे पुरावे मागणारे विरोधक हे पाकिस्तानचीच भाषा बोलत असल्याचे आरोपसत्र सुरू केले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या हल्ल्यात 250 अतिरेकी प्राणास मुकल्याचा दावा रविवारीच एका सभेत केला. अमेरिकेतील "ट्विन टॉवर्स'वर झालेल्या भीषण हल्ल्याचा बदला पाकिस्तानात दडून बसलेला अल-कायदा संघटनेचा म्होरक्‍या ओसामा बिन लादेन, याची हत्या अमेरिकेने अकस्मात तेथे हवाई हल्ला करून केली होती आणि नंतर त्या हल्ल्याचे चित्रीकरणही जाहीर केले होते, याचा दाखला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी दिला आहे. हे एवढेच नाही. "सोशल मीडिया'वरून मोदीभक्‍त तसेच विरोधक यांच्यात याच विषयावरून माजलेले रण देशात सामाजिक अस्वस्थता निर्माण करत आहे. कोणत्याही राजकीय पक्षास त्याची जराही खंत वाटताना नसणे, हे सारेच उद्वेगजनक आहे.

"या हवाई हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले, त्याचा नेमका आकडा सांगता येणे कठीण आहे', असे भारतीय हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी स्पष्ट केले आहे. लक्ष्यभेद करणे हे आमचे उद्दिष्ट होते; जीवितहानी किती झाली, हे पाहणे नव्हे, हे त्यांचे उद्‌गार पुरेसे स्पष्ट आहेत. अशा परिस्थितीत किती ठार झाले, या संख्येवरून राजकीय धुमश्‍चक्री माजविणेच मुळात गैर आहे. पण सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही त्याचे भान राहिलेले नाही. या साऱ्याचा अर्थ स्पष्ट आहे. भाजपला या हल्ल्याचे राजकारण आपली "राष्ट्रभक्‍तां'ची मतपेढी मजबूत करण्यासाठी करावयाचे आहे, तर विरोधकांनाही त्या संदर्भात प्रश्‍नचिन्ह उभे करत, सरकार तसेच भाजप यांना खोटे पाडायचे आहे. मात्र, या हल्ल्याच्या विश्‍वासार्हतेचा पुरावा मागणाऱ्या कोणासही तातडीने "देशद्रोही' म्हणणे, ही बाब अश्‍लाघ्य आहे. खरे तर पुलवामा येथील शोकांतिकेनंतर सर्वच विरोधी पक्षांनी आपण सरकारच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले होते. पण ते सामंजस्याचे वातावरण फार काळ टिकले नाही. आपापल्या राजकीय चष्म्यातूनच जगाकडे पाहावयाचे एकदा ठरवले तर मग होणाऱ्या धुळवडीस थांबवता येणे कठीणच असते. त्याचेच प्रत्यंतर सध्या येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Air Strike: indian politics in editorial