अभिनंदनानंतरचे आव्हान (अग्रलेख)

Abhinandan Varthaman
Abhinandan Varthaman

पाकिस्तानवरील सर्व प्रकारचा दबाव कायम ठेवणे आणि त्याचवेळी संघर्ष चिघळू नये, यासाठी प्रयत्न करणे, हे आता भारतापुढचे आव्हान असेल. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका ही त्यादृष्टीने महत्त्वाची घटना आहे.

पा किस्तानी लष्कराच्या ताब्यातून आपला लढाऊ वैमानिक भारतात सुखरूप परतणे, ही निश्‍चितच आनंददायी घटना असून हे भारताचे मोठे राजनैतिक यश आहे. भारतीय हवाई दलामार्फत पाकिस्तानात घुसून जी कारवाई करण्यात आली, ती फक्त बिनलष्करी आणि प्रतिबंधात्मक कारवाई होती आणि तिचे लक्ष्य नागरी वसतीचे ठिकाण नव्हे, तर फक्त दहशतवादी तळ एवढेच होते, ही भूमिका घेऊन त्यात भारताने सातत्य ठेवले. आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळविण्यात ती बाब सहाय्यभूत ठरली. पाकिस्तानवरील सर्व प्रकारचा दबाव कायम ठेवणे आणि त्याचवेळी संघर्ष चिघळू नये, यासाठी प्रयत्न करणे, हे आता भारतापुढचे आव्हान असेल. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका ही त्यादृष्टीने महत्त्वाची घटना आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेचेही आवाहन केले होतेच. पण या सकारात्मक घटना असल्या तरी सरहद्दीवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन सुरूच आहे आणि मसूद अजहर याच्यावर काय कारवाई करणार, याविषयी पाकिस्तानने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. एफ-१६ विमाने पाकिस्तानने अमेरिकेकडून घेतली ती अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाईचे कारण सांगून; प्रत्यक्षात ती भारताच्या विरोधात कशी वापरली गेली, हे पाकिस्तानच्या विमानाचे जे अवशेष मिळाले, त्यावरून उघडच झाले. भारतीय लष्कराने प्रसारमाध्यमांना ते दाखवून पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर आणला. वास्तविक अमेरिकेकडून जी आर्थिक-लष्करी मदत मिळते, तिचा वापर दहशतवाद्यांच्या निर्मूलनासाठी नव्हे, तर त्यांना पोसण्यासाठी होतो, हे भारत सातत्याने ओरडून सांगत होता. पण यात खंड पडला नाही. पाकिस्तानने दहशतवादाला आपली भूमी मुक्तहस्ते वापरू दिली. सध्याच्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक रसद थांबवली असली तरी वातावरण निवळल्यावर ती पुन्हा सुरू होणे घातक ठरेल.

ज्या इस्लामिक राष्ट्र संघटनेच्या (ओआयसी) स्थापनेच्या वेळी मोरोक्कोमध्ये पाकिस्तानने भारताच्या प्रवेशाला विरोध केला, त्याच संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमाच्या वेळी भारताला आमंत्रित केल्याने पाकिस्तानला पोटशूळ उठलाय. या परिषदेवर या वेळी पाकिस्तानने चक्क बहिष्कार टाकला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ‘ओआयसी’ची भारताची दहशतवादविरोधी भूमिका आक्रमकपणे मांडली, हे बरे झाले. ही संघटना पाकिस्तानच्या हट्टापुढे झुकली नाही, याचा सांगावा पाकिस्तानने लक्षात घ्यावा. उठसूट भारताविरोधात गरळ ओकणे थांबवले पाहिजे.
भारताने केलेली कारवाई आणि त्यानंतर पाकिस्तानवर जगभरातून आलेला दबाव या घटनांमधून थोडे जरी आत्मपरीक्षण पाकिस्तानात सुरू झाले, तरी त्यांना देशउभारणीसाठी बाह्य नव्हे तर अंतर्गत अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची नितांत गरज आहे, हे कळेल. दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला समस्यांनी घेरले आहे. आर्थिक संकट घोंगावत आहे. कधी अमेरिकेच्या तर कधी चीनच्या दावणीला देश बांधल्याने त्यांच्या मांडलिकासारखे राहावे लगत आहे. आज पाकिस्तानातील करमणूक उद्योगात बॉलिवूडचा वाटा काही कोटींचा आहे. आता भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनाला, प्रसारणाला, एवढेच नव्हे तर भारतात चित्रीत जाहिरातींच्या प्रसारणावरही पाकिस्तानने बंदी घातली आहे. खऱ्या अर्थाने संवाद सुरू व्हावा, ही त्या देशाची भूमिका प्रामाणिक आहे किंवा नाही, असा प्रश्‍न निर्माण होतो. भारत आणि पाकिस्तान या दोन्हीही देशातील जनतेत सांस्कृतिक, कला, व्यापार, उद्योग अशा अनेक पातळ्यांवर सहकार्य वाढवून सौहार्द, शांतता वाढवावी, असे सांगणारा एक वर्ग आहे. ती भूमिका रास्तही आहे; परंतु टाळी एका हाताने वाजत नाही, हाच अनुभव भारताला पुन्हा पुन्हा आला.

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानच्या पुलवामातील आगळीकीस आपण दिलेले ठोस उत्तर अनेकार्थांनी महत्त्वाचे आणि आवश्‍यक असेच होते. जागतिक नेतृत्वाला पाकिस्तानचा मुखवट्यामागचा चेहेरा किती विद्रूप आणि द्वेष, मत्सर यांनी भेसूर झालाय, हे लक्षात आले आहे. हीच वेळ आहे दहशतवादाविरोधाची लढाई अधिक तीव्र करण्याची. सध्या वाढलेला दबाव कायम ठेऊन पाकिस्तानला दहशतवाद गाडण्यास भाग पाडण्यासाठी राजनैतिक पातळीवर मोहीम हाती घेतली पाहिजे. मात्र ती दीर्घकाळ चालणारी आहे, याची जाणीव सर्वांनीच ठेवायला हवी. तो संयम बाळगला आणि मुत्सद्देगिरीच्या आघाडीवर सातत्याने प्रयत्न केले तरच सध्या मिळालेल्या यशाला टिकाऊ आणि ठोस रूप मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com