भारतीय बॅडमिंटनची पताका

संजय घारपुरे
सोमवार, 17 एप्रिल 2017

हा दिवस ऐतिहासिक

भारतीय बॅडमिंटनमध्ये 15 एप्रिल 2017 हा दिवस ऐतिहासिक ठरेल. प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद, साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांना जे शक्‍य झाले नव्हते, ते किदांबी श्रीकांत आणि बी साईप्रणीतने करून दाखवले.

जागतिक बॅडमिंटन इतिहासात सुपर सीरिज स्पर्धेत प्रथमच दोन भारतीय अंतिम लढत खेळले. चीन, डेन्मार्क व इंडोनेशियाबाबत हे याआधी घडले होते. भारतीय बॅडमिंटनची ओळख गेल्या काही वर्षात सिंधू, साईना या महिला खेळाडूंमुळे झाली होती. त्याला भारतीय बॅडमिंटनमधील "एस इफेक्‍ट "म्हटले जात असे. आता हाच "एस एफेक्‍ट' साईप्रणीत आणि श्रीकांतच्या रूपाने पुरुष एकेरीतही दिसला. या दोघांतील अंतिम लढत साईप्रणीतने जिंकल्यामुळे भारतास नवा सुपर विजेता गवसला.

साईप्रणीत आणि श्रीकांत यांच्यात एकप्रकारचे साम्य आहे. दोघांचेही जागतिक मानांकन एकमेकांपाठोपाठ आहे. किदांबी 29, तर साईप्रणीत तीस. गोपीचंद अकादमीत हे दोघे रोजच्या सरावातील सहकारी आहेत. श्रीकांतचा खेळ वेगावर भर देणारा. तो दीर्घ रॅलीज खेळू शकतो, तसेच संधी मिळाल्यावर ताकदवान स्मॅश मारतो. कारकिर्दीच्या सुरवातीस दुहेरी खेळल्यामुळे कोर्टचा अंदाज त्याचा चांगला आहे. कमालीचे सातत्य ही त्याची खासियत, तर साईप्रणीतचे खेळातील कौशल्य जबरदस्त. त्याच्याइतके स्ट्रोकचे वैविध्य आपल्याकडेही हवे असे जवळपास प्रत्येकाला वाटते. मनगटाचा खुबीने वापर करीत शटलची दिशा ऐनवेळा तो बदलू शकतो. तो बहरात असेल तर त्याच्या क्रॉसकोर्ट शॉट्‌स अथवा हाफ स्मॅशला तोड नाही. या काहीशा परस्परविरोधी शैलीचा दोघांना फायदाच होतो. बॅडमिंटन हा खेळ केवळ तंदुरुस्ती किंवा कौशल्याचा नाही. दोन्हींचा समतोल साधावा लागतो. साईप्रणीतने त्यावर लक्ष केंद्रित केल्याने त्याची कामगिरी उंचावत गेली. सिंगापूरला त्याने ते दाखवले.

एक मात्र खरे साईप्रणीत तसेच किदांबी श्रीकांतला आपल्यात लढत व्हावी असे वाटत नव्हते. सरावातील सहकाऱ्याबरोबर स्पर्धा करणे जास्त अवघड असते. दोघांत सरावात रोज सामना होत असेल, पण प्रत्यक्ष स्पर्धेतील सामना आणि तोही सुपर सीरिजच्या अंतिम लढतीत खेळणे सोपे नसते. हे केवळ खेळाडूंबाबतच नसते, तर त्यांच्या मार्गदर्शकांबद्दल, सपोर्ट स्टाफबद्दलही असते. त्यांच्यासाठी कोणाची बाजू घ्यावी हा खडतर प्रश्न होतो; पण ही किंमत चुकवण्यास आम्ही तयार आहोत, असेच गोपीचंदसह सर्वच मार्गदर्शकांचे मत असेल. भारतीय स्पर्धा जिंकत आहेत, असतील तर हा त्रास सहन करण्याची आमची तयारी आहे, हे पारुपली कश्‍यपचे मतच आत्ता योग्य ठरते.

Web Title: indian badminton achievement