कुरापतींना कडवे उत्तर (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे; पण सीमेवरील परिस्थितीवर खऱ्या अर्थाने नियंत्रण आणावयाचे असेल तर त्यासाठी भारताला अन्य मार्गांचाही अवलंब करावा लागेल.

लष्कर दिनाच्या मुहूर्तावर भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत पाकिस्तानला सुनावत असलेल्या खड्या बोलांचे प्रत्यंतर त्याच दिवशी भारतीय जवानांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला आणून दिले! भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानी लष्कराचा एक मेजर आणि किमान तीन सैनिक ठार झाले आणि नेमक्‍या त्याच दिवशी ‘जैशे महंमद’ या संघटनेच्या आत्मघातकी पथकातील पाच दहशतवाद्यांचाही खातमा केला. गेले काही दिवस सीमेवर सातत्याने सुरू असलेल्या चकमकीत अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाले असले तरी, या वेळी प्रथमच पाकिस्तानने आपले सैनिक मारले गेल्याची कबुली दिली आहे. गेले काही महिने सीमेवर पाकिस्तानची घुसखोरी सुरू असून, भारताने त्यांना जबर तडाखा देऊन आपल्या संरक्षणसज्जतेचा प्रत्यय दिला आहे. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतीला चोख उत्तर दिले त्याचे कारण म्हणजे त्याला पार्श्‍वभूमी होती ती लष्करप्रमुख जनरल रावत यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेची. त्यांनी लष्करदिनीच पाकिस्तानला कडक इशारा दिल्यामुळे भारतीय सैन्याचे मनोबल वाढले असणार. ‘पाकिस्तान सातत्याने दहशतवाद्यांना फूस देऊन नियंत्रण रेषेचा भंग करून जम्मू-काश्‍मीरमध्ये अतिरेकी घुसवू पाहत असले तरी, भारतीय सैन्य त्यांना ठोस जवाब देऊ शकते,’ असे जनरल रावत यांनी म्हटले होते. मात्र, या एका चकमकीमुळे पाकिस्तान स्वस्थ बसेल, असे समजण्याचे कारण नाही. त्यामुळे भारतीय लष्कराला आता यापुढे डोळ्यांत तेल घालून सज्ज राहावे लागणार आहे. जनरल रावत हे आपल्या स्पष्टोक्‍तीबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी थेट राजकारण्यांच्या शैलीत पाकिस्तानला सुनावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, पाकिस्तानने आपल्या कुरापतखोर स्वभावाची चुणूक घुसखोरी करून लगेचच दाखवून दिली आणि त्यामुळे रावत यांच्या विधानाची प्रचितीही आली. खरे तर पाकिस्तान आपल्याबरोबर नेमके कसे संबंध ठेवू इच्छितो, ते हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानने ताब्यात घेतलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची, त्यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली तेव्हाच स्पष्ट झाले होते. जाधव कुटुंबीयांना अत्यंत अवमानित करून या भेटीचा उपचार घडवून आणत, त्याचे भांडवल करण्याचा डाव पाकिस्तानने रचला होता. त्यामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला कडक इशाराही दिला होता. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानचे डावपेच ‘पहिले पाढे पंचावन्न’ याच खेळानुसार सुरू आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद्यांना पाकिस्तान देत असलेल्या आश्रयाबद्दल अलीकडेच कडक शब्दांत समज दिल्यामुळे भारताने हुरळून जाण्याचे काहीच कारण नव्हते, हेच पाकिस्तानच्या ताज्या कुरापतीमुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही लढाई अखेरीस भारताला स्वबळावरच लढायची असली, तरी त्यामुळे जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थिती सुरळीत होईल, असे समजण्याचे काहीही कारण नाही. लष्करप्रमुख जनरल रावत यांना त्याची कल्पना आहे, त्यामुळेच त्यांनी गेल्या आठवड्यात आपल्या स्पष्टोक्‍तीचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून देत काश्‍मिरी तरुणांना योग्य आणि आधुनिक शिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले होते. अपेक्षेप्रमाणेच त्यांच्या या भूमिकेने वादळ उठले आणि जम्मू-काश्‍मीरच्या शिक्षणमंत्र्यांनीच त्याला आक्षेप घेतला. मात्र, तो निव्वळ राजकीय हेतूंनी प्रेरित होता. रावत यांच्या या भूमिकेत निश्‍चितच तथ्य आहे. योग्य त्या व्यावसायिक शिक्षणाअभावी या तरुणांना रोजगार मिळत नाही आणि त्यामुळे आलेल्या नैराश्‍यात त्यांना चिथावणी देण्याचे काम मग फुटीरतावादी नेते करत असतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एकीकडे पाकिस्तानी कारवायांना चोख उत्तर देतानाच या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अन्य काही मार्गांचाही अवलंब करण्याची गरज आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे २००५ पासून पाकिस्तान करत असलेल्या कारवायांमध्ये प्रत्येक दिवशी भारताचा एक जवान धारातीर्थी पडल्याचे आकडेवारी सांगते. लष्कराकडे असलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी २००५ ते डिसेंबर २०१७ या काळात पाकिस्तानने सीमारेषेचे उल्लंघन करून केलेल्या कारवायांमध्ये १६८४ जवान हुतात्मा झाले आहेत. हे कुठेतरी थांबवायला हवे आणि त्यासाठी केवळ युद्ध हाच उपाय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यादृष्टीने बरेच प्रयत्न केले. मात्र, ते विफल ठरल्याचेच आता पाकिस्तान रोजच्या रोज करत असलेल्या घुसखोरीमुळे स्पष्ट झाले आहे. जनरल रावत यांनी पाकिस्तानला सज्जड दम भरला, हे रास्तच झाले; पण परिस्थितीवर खऱ्या अर्थाने नियंत्रण आणावयाचे असेल, तर त्यासाठी भारताला अन्य मार्गांचाही अवलंब करावा लागेल, हाच या साऱ्या घटनांचा मथितार्थ आहे.

Web Title: Indian jawans killed pakistani soldiers editorial