बेंग"रूळ' कारभार (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

रेल्वे मंडळाच्या सदस्यासह वरिष्ठ रेल्वे अभियंत्यांना रजेवर पाठविण्याची आणि काहींच्या निलंबनाची कारवाई झाली असली, तरी मूलभूत प्रश्‍न हा यंत्रणांच्या सुधारणेचा आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात उत्कल एक्‍स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर मृत आणि जखमींना मदत, अपघाताच्या कारणांची चौकशी, श्रद्धांजली आणि दुखवटे हे आणि यांसारखे सर्व शासकीय सोपस्कार नेहमीप्रमाणे पार पडताहेत. वाढत्या अपघातांबद्दल रेल्वेमंत्र्यांना विरोधकांनी धारेवर धरणे आणि त्यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, या गोष्टीही पार पडल्या आहेत; पण मृत्युमुखी पडलेल्या 23 प्रवाशांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा जो कठोर आघात झाला आहे, त्यांचे नुकसान यापैकी कशानेही भरून येण्यासारखे नाही.

त्यामुळेच प्रश्‍न निर्माण होतो, तो असे अपघात घडू नयेत, यासाठी आपण व्यवस्थेतील फटी बुजविण्यासाठी काय केले हाच. वास्तविक अपघात म्हणजे ज्याचा अंदाज केला नव्हता, अशा आकस्मिक उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे घडलेली घटना. परंतु, उत्कल एक्‍सप्रेस घसरण्याला कारणीभूत ठरला आहे, तो ढिसाळ कारभार. प्रत्यक्ष वाहतुकीची कार्ये असोत, देखभाल-दुरुस्तीची असोत किंवा पायाभूत संरचना विकासाची, या प्रत्येक बाबतीत "प्रमाणित कार्यपद्धती' निश्‍चित करण्यात आलेली असते. पण ती धाब्यावर बसविण्याची वृत्ती अक्षरशः बोकाळलेली आहे. याचा फटका निरपराध प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भोगावा लागतो. वास्तविक लोहमार्ग दुरुस्तीचे काम करण्यापूर्वी सर्व संबंधितांना कळवावेच लागते. पण जवळच मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, हे खतौलीच्या स्थानक अधीक्षकांनाच ठाऊक नव्हते. त्यामुळे येणाऱ्या रेल्वेगाड्या थांबविण्याचा प्रश्‍न आला नाही. अभियंते आणि कर्मचारी यांच्यातही बेबनाव असल्याची चर्चा आहे. यासंबंधी काही ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यांची सत्यासत्यता अद्याप पडताळायची असली, तरी एक नक्की, की आवश्‍यक अशा संवाद-संपर्काची प्रक्रियाही सुरळीत नव्हती.

दुरुस्तीची कामे अनधिकृतपणे आणि परस्पर उरकून घेण्याच्या सवयीतून ही दुर्घटना घडली आहे, असे प्रथमदर्शनी लक्षात आले आहे. रेल्वे मंडळाच्या सदस्यासह वरिष्ठ रेल्वे अभियंत्यांना रजेवर पाठविण्याची आणि काहींच्या निलंबनाची कारवाई झाली असली, तरी मूलभूत प्रश्‍न हा यंत्रणांच्या सुधारणेचा आहे. तिथल्या परस्परावलंबी कार्यप्रणालींमध्ये कोणतेही दोष राहता कामा नयेत. एक जरी कडी सदोष असेल तर संपूर्ण कार्यसाखळीवर विपरीत परिणाम होतो. सार्वजनिक सेवा वापरणाऱ्या देशातील प्रत्येकाचा जीव अत्यंत मोलाचा आहे, हे तत्त्व सगळ्या कार्यप्रणालीच्या मुळाशी असायला हवे.

Web Title: indian railways