कारवाईनंतरची समझोता एक्‍स्प्रेस! (अग्रलेख)

Narendra Modi
Narendra Modi

पाकव्याप्त काश्‍मीरमधील कारवाईनंतरही आपण पाकिस्तानातील सर्वसामान्य जनतेच्या विरोधात नाही, हे दोन्ही देशांदरम्यानचे दळणवळण सुरळीत सुरू ठेवून भारताने दाखवून दिले आहे. भारताची जगभरातील प्रतिमा उजळवून टाकणारीच ही कृती आहे. 

भारतीय सैन्याने पाकिस्तानव्याप्त काश्‍मिरातील दहशतवादी तळांवर बुधवारी मध्यरात्रीनंतर केलेल्या हल्ल्याचे प्रतिसाद 48 तास उलटून गेल्यावरही वेगवेगळ्या प्रकारे जगात उमटत आहेत. कांगावखोर पाकिस्तानी माध्यमे "असे काही झालेच नाही‘ येथपासून ते "ही भारतानेच रचलेली एक कहाणी आहे‘, इथपर्यंत वेगवेगळ्या सुरात बोलताहेत. एकाही देशाने वा संस्थेने या संदर्भात भारताला दूषणे दिलेली नाहीत. त्यामुळे तर या "धडक हल्ल्यां‘चे महत्त्व अधिकच ठळकपणे प्रतीत होते. भारताने पाकिस्तानविरुद्ध थेट युद्ध पुकारलेले नाही, हे जसे या नियंत्रित कारवाईने स्पष्ट झाले; त्याचबरोबर भारत हा पाकिस्तानातील सर्वसामान्य जनतेच्या विरोधात नाही, हेही या दोन्ही देशांदरम्यानचे दळणवळण सुरळीत सुरू ठेवून भारताने दाखवून दिले आहे. बुधवारी मध्यरात्री भारताने हल्ले केल्यानंतर अवघ्या काही तासांतच गुरुवारी दुपारी पाकिस्तानी जनतेसाठी लागणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तू घेऊन 39 ट्रक पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये जाऊन पोचले. हे खरे तर अघटित म्हणावे अशीच कृती होती! दोन देशांमधील संबंध इतके विकोपाला गेले असतानाही भारत पाकव्याप्त काश्‍मिरातील आम आदमीची काळजी घेऊ इच्छितो, हीच भावना त्यामुळे जगभरात पोचली. खरे तर "हिज्बूल‘चा म्होरक्‍या बुऱ्हाण वणी चकमकीत मारला गेल्यानंतर तीन महिने या शेजारी देशांमधील व्यापार कोलमडून पडला होता. ताज्या हल्ल्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे मंगळवारी तो सुरू झाला आणि सीमा पार करून विविध प्रकारच्या जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक सुरू होती. हल्ले होताच हे व्यापारी आदान-प्रदान बंद होईल, या संबंधिताच्या मनांत उभ्या राहिलेल्या शंकांचे निरसन पाकव्याप्त काश्‍मिरात जाऊन पोचलेल्या 39 ट्रकमुळे झाले असणार! 

जगभरातील भारताची प्रतिमा उजळवून टाकणारेच हे काम आहे आणि एकाच वेळी हल्ल्याच्या रूपाने पाकपुरस्कृत दहशतवादी कारवायांना चोख उत्तर देऊनही भारताच्या प्रतिमेवर यामुळे एकही शिंतोडा उडालेला नाही. हे अर्थातच सहजासहजी घडलेले नाही. त्यासाठी राजकीय, तसेच प्रशासकीय पातळीवर मोदी सरकारने केलेले चोख नियोजनच कारणीभूत आहे. एकीकडे 18 सप्टेंबरला उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर संयुक्‍त राष्ट्रांच्या आमसभेत सुषमा स्वराज यांनी रोखठोक भाषण करून आणि त्याचवेळी सिंधू पाणीवाटप आयोगाच्या बोलण्यांना स्थगिती देणे, आदी मार्गांने राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी करण्याचे मार्ग मोदी सरकार चाचपून पाहत होते. त्यानंतर "सार्क‘ परिषदेवर बहिष्कार टाकण्याचे पाऊल उचलण्यात आले आणि अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान यांच्याबरोबरच आता श्रीलंकेनेही तोच मार्ग अनुसरत भारताला साथ दिली. दरम्यान, नेमक्‍या याच कालावधीत अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तानला "दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त करायलाच हवेत,‘ असा सज्जड दम दिला. हे सारे डावपेच आखताना, पाकिस्तानातील सामान्य माणसालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीने कोझीकोडे येथील भाषणातून साद घातली. "आम्ही पाकिस्तानचे राजकीय नेतृत्व, तसेच लष्करशहा यांच्या विरोधात आहोत; पाकिस्तानी जनतेच्या नाही!‘ हे स्पष्टपणे दाखवून दिल्यावरच अखेर ही "धडक हल्ल्या‘ची कारवाई झाली आहे, हे ध्यानात घ्यायला हवे. मोदी, तसेच त्यांचे सल्लागार यांच्या मुत्सद्देगिरीतूनच हे सारे घडून आले आहे. 

भारताला लाभलेले हे मोठेच यश आहे आणि पाकिस्तानबरोबरचे संबंध चर्चा-परिसंवादातूनच सुधारू शकतात, असे मानणाऱ्या देशातील वर्गालाही या कारवाईमुळे फार काही गैर वाटण्याजोगे नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे उरी हल्ल्यानंतरही पाकिस्तानी घुसखोरांनी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. 
मोदी सरकारने उभ्या केलेल्या या साऱ्या नेपथ्याच्या पार्श्‍वभूमीवर "इम्पा‘ या भारतीय चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेने पाकिस्तानी कलाकारांवर घातलेल्या बंदीच्या निर्णयाकडे बघावे लागेल. कलेच्या माध्यमातूनच या दोन्ही देशांमधील सर्वसामान्य जनतेमध्ये आपुलकीची भावना निर्माण होऊ शकते आणि तसे होण्याची सध्याच्या टोकाच्या तणावाच्या काळात नितांत गरज आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजवटीत सुरू झालेली "समझोता एक्‍स्प्रेस‘ त्यामुळेच अधिक वेगाने पुढे जाऊ शकेल, हे साऱ्यांनीच ध्यानात घ्यायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com