अपमान भरपाई! (ढिंग टांग)

अपमान भरपाई! (ढिंग टांग)

फिर्यादी कम वकील : (काळा कोट सावरत टेचात) माय लॉर्ड...अत्यंत विषण्ण मनाने मी ही अब्रुनुकसानीची आणखी एक केस आपल्या सन्माननीय कोर्टापुढे मांडतो आहे. प्रतिवादी आणि प्रतिवादीच्या वकिलांनी वारंवार अपमान केल्याने माझ्या अशिलाची, म्हंजे माझीच, मानसिक स्थिती भयंकर ढासळली आहे.

प्रतिवादीचे वकील : (हेटाळणीच्या सुरात) हॅ:!! अब्रुनुकसानी म्हणे!! एक पैसा देणार नाही तुम्हाला!!
जज्जसाहेब : ऑर्डर ऑर्डर! काय झालं? कुठवर आली केस?
फिर्यादी कम वकील : (घड्याळ पाहात) जेवणाच्या वेळेपर्यंत आपण येऊन ठेपलो आहोत, माय लॉर्ड!!
प्रतिवादीचे वकील : (वाकुल्या दाखवत) बघा, बघा!! हे लोक असेच लोकांवर अब्रुनुकसानीचे दावे लावून पैसे उकळतात आणि जेवणं सोडवतात!!
वकील : (टेबलावर मूठ आदळत )आता मात्र हद्द झाली माय लॉर्ड! प्रतिवादीच्या विद्वान वकिलांनी आमचं आज जेवण काढलं? हा अपमान आहे!!
जज्जसाहेब : (समजुतीच्या सुरात) भूक लागलीये का तुम्हाला?
वकील : (पडेल आवाजात) मी घरून डबा आणलाय माय लॉर्ड!!
प्रतिवादी : (चेष्टेच्या सुरात) चोरून आणलाय की घरून?
प्रतिवादीचे वकील : (आक्रमकपणे) घरून चोरून आणला असेल! हाहाहा!!
वकील : (रडकुंडीला येत) अरे, किती अपमान कराल, किती अपमान कराल! काही लिमिट!!
जज्जसाहेब : (गंभीर होत) ऑर्डर ऑर्डर!! वकीलसाहेब, तुम्ही डब्यात काय आणलंय?
प्रतिवादीचे वकील : (चिडखोरपणानं) न्यायमूर्ती महाराज, आमचे विद्वान वकील कम फिर्यादी मित्राचा एकही दावा कोर्टाने स्वीकारू नये! अत्यंत धूर्त, मतलबी आणि स्वार्थी अशा ह्या लोकांचा दावा आणि डबा दोन्हीही पोकळ आहे, हे मी आत्ताच तुम्हाला सांगतो!!
प्रतिवादी : (टपून बसल्याप्रमाणे) कपटी हा शब्द राहिला हां वकीलसाहेब!
फिर्यादी कम वकील : (संतापून) धूर्त, मतलबी, स्वार्थी आणि कपटी ह्या चाऱ्ही अपशब्दांखातर मी प्रत्येकी दहा कोट रुपयांचा दावा ठोकतो आहे!! एकूण साठ कोटी झाले!!
प्रतिवादीचे वकील : (हिणवत) हु:!! गणित कच्चं आहे, म्हणून एलेलबी केलंत वाटतं!!
फिर्यादी कम वकील : (कुत्सितपणाने) माझे गणित चांगलं आहे की नाही, ते कोर्ट ठरवेल, पण आमच्या विद्वान वकील मित्रांना मात्र गणितात भोपळा देणे भाग आहे. चार शब्दांचे चाळीस आणि आधीचे दोन दावे, असे एकूण साठ कोट होतात, ह्याकडे मी न्यायालयाचे लक्ष वेधू इच्छितो!!
जज्जसाहेब : (वैतागून) ऑर्डर, ऑर्डर! अरे, हे कोर्ट आहे की टॅक्‍सी? मीटर डाऊन केल्याप्रमाणे तुम्ही धडाधड आकडे वाढवत कसे जाता? दावे करण्यालाही काही लिमिट?
प्रतिवादीचे वकील : (काडी घालत) कोर्ट कोणाचं? मीटर कोणाचं डाऊन? ह्याला काय न्याय म्हंटात का, न्यायमूर्ती महाराज? पाहा बिचाऱ्या ह्या माझ्या अशिलाकडे पाहा!! किती भोळा, साधा आणि गरीब आहे!! प्रकृतीदेखील बरी नाही त्याची माय लॉर्ड!
प्रतिवादी : (खोकत खोकत) न्यायमूर्ती महाराज, मी गरिबांसाठी ही कायद्याची लढाई लढत आहे! केवळ माझ्या शोषणासाठी फिर्यादी पक्षाने माझ्यावर कोट्यानुकोटीचे दावे लावले आहेत!!
प्रतिवादीचे वकील : (खवचटपणाने) आणि फिर्यादी डांबिस आहे!! खीखीखी!!
फिर्यादी कम वकील : (शांतपणे) सत्तर कोटी!!
प्रतिवादीचे वकील : (उसळून) वारेवा! सत्तर कोटी म्हणे! बापाचा माल वाटला का?
फिर्यादी कम वकील : (आणखी शांतपणे) ऐंशी कोटी!
प्रतिवादी : (गोंधळून) खॉक खॉक खीक खीक खीक...
फिर्यादी कम वकील : (लिलाव पुकारल्यासारखं) नव्वद कोटी...नव्वद कोटी एक...नव्वद कोटी दोन...
जज्जसाहेब : (हतबल होत) जरा सबुरीनं घ्या रे!!
प्रतिवादीचे वकील : (माघार घेत) बरं, फिर्यादीबद्दल आमच्या मनात अपार आदर आहे!! ते अत्यंत मनमिळाऊ, सज्जन आणि स्वच्छ प्रतिमेचे सद्‌गृहस्थ आहेत, असे आम्ही जाहीर करतो!!
फिर्यादी कम वकील : (विजयी मुद्रेने) शंभर कोटी!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com