जागल्या जेरबंद (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगातील सत्ताधीशांची गुपिते फोडणाऱ्या ज्युलियन असांजच्या मुसक्‍या बांधण्यात अखेर यश आले; पण प्रश्‍न आहे तो सार्वजनिक हितासाठी माहिती मिळविण्याच्या हक्काचा. तो दडपला जाता कामा नये.

माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगातील सत्ताधीशांची गुपिते फोडणाऱ्या ज्युलियन असांजच्या मुसक्‍या बांधण्यात अखेर यश आले; पण प्रश्‍न आहे तो सार्वजनिक हितासाठी माहिती मिळविण्याच्या हक्काचा. तो दडपला जाता कामा नये.

जेम्स बॉंडच्या एखाद्या चित्रपटात उभ्या केलेल्या व्यक्‍तिरेखेशी तुलना व्हावी, अशी कारकीर्द असलेला ज्युलियन असांज अखेर गजाआड गेला आहे! जॉर्ज ऑर्वेल या ख्यातकीर्त लेखकाने 1949 मध्ये लिहिलेल्या "नाइण्टिन एटीफोर' या कादंबरीत "बिग ब्रदर इज वॉचिंग यू!' असे अजरामर झालेले वाक्‍य आहे. त्यात सत्ताधीश कशा रीतीने खासगी जीवनावर देखरेख ठेवून सत्तेची पकड जराही ढिली होणार नाही, हे पाहतात, याचे भेदक वर्णन केले आहे; पण असांजकडे कोणतीही सत्ता नसताना त्याने माहिती-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे उपलब्ध झालेल्या सुविधांचा वापर करून अनेक सत्ताधाऱ्यांची झोप उडवली. त्यांना "समबडी इज वॉचिंग यू' असे वाटायला लावले. तो "जागल्या'ची भूमिका वठवत होता. मिळतील ती गोपनीय कागदपत्रे खुली करण्याचा सपाटा त्याने लावला. "विकिलिक्‍स' या संकेतस्थळाद्वारे अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेची अनेक गुपिते त्यांनी जगजाहीर केली! अफगाणिस्तान आणि इराकविरुद्ध युद्ध करताना अमेरिकेने जगासमोर स्वतःची जी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला होता, तो मुखवटा त्याने टरकावून दिला. अमेरिकी सत्तेलाच एका प्रकारे आव्हान देणाऱ्या या व्यक्तीस कोंडीत पकडण्याचे प्रयत्न दीर्घकाळ चालू राहिले. अखेर तो सापळ्यात अडकला.

उच्चशिक्षित आणि बुद्धिमान असा हा असांज मूळचा ऑस्ट्रेलियाचा नागरिक. गेली सात वर्षे इक्‍वेडोरच्या आश्रयाने त्यांच्याच लंडनमधील दूतावासात राहत होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी केवळ अमेरिकाच नव्हे, तर जगातील अनेक देश जंग जंग पछाडत होते. इक्‍वेडोरने अखेर त्याचा आश्रय काढून घेतला आणि त्यामुळे त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला. आता त्याच्यावर इंग्लंडच्या न्यायालयात रीतसर खटले चालतीलच; मात्र असांज जे काही करत होता, त्यामुळे गोपनीयतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सत्ताधीशांना गोपनीयतेचे कवच कसे आवश्‍यक वाटत असते, हे भारतासह सर्वच देशांच्या बाबतीत अनेकदा आढळले आहे. जगभरातील त्या प्रवृत्तीविरोधात दंड थोपटून असांज उभा आहे, असे चित्र निर्माण झाल्यानंतर तो हीरोही वाटू लागला; पण लवकरच हे वलय विरळ होत गेले. असांजने "विकिलिक्‍स' हे इंटरनेटवरील संकेतस्थळ 2006मध्ये सुरू केले आणि अनेक देशांच्या दूतावासांमधून पाठविल्या जाणाऱ्या गोपनीय केबल्स प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या "हॅक' केल्या. 2012 पर्यंत तो मुक्तपणे हिंडत होता. मात्र, त्याचवर्षी त्याच्यावर स्वीडनमध्ये दोन महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला आणि स्वीडन सरकार त्याला अटक करू पाहत असताना, त्याने इक्‍वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला. असांजवरील सर्वांत मोठा आरोप हा 2016मध्ये अमेरिकी अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्‍लिंटन यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढाईत रशियाला मदत केल्याचा आहे. ट्रम्प यांची या पार्श्‍वभूमीवरील उलटसुलट विधाने ही साऱ्यांनाच बुचकळ्यात टाकणारी आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार असताना, त्यांनी "मला विकिलिक्‍स हे संकेतस्थळ अत्यंत प्रिय आहे!' असे म्हटले होते, तर अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी कानावर हात ठेवले आणि याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. "विकिलिक्‍स' या संकेतस्थळावर 2010मध्ये अफगाणिस्तान, तसेच इराक युद्धाच्या वेळची अत्यंत गोपनीय माहिती प्रसृत झाली आणि तेव्हापासून अमेरिकेने त्याला "आउटकास्ट' केले आहे. त्यामुळेच आता ब्रिटन असांजला अमेरिकेच्या हवाली करणार काय? हा कळीचा मुद्दा आहे. एडवर्ड स्नोडेन यांनी असांजला झालेली अटक हा "वृत्तस्वातंत्र्याच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस असल्याची' प्रतिक्रिया दिली आहे. ती महत्त्वाची आहे. लोकशाही आणि नागरिकांचे हक्‍क यांचे कायम डिंडीम पिटणाऱ्या अमेरिकेतही प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर कशी "नजर' ठेवली जाते, ते दाखवून दिल्यानंतर खुद्द स्नोडेन यांनाही अमेरिकेतून पळ काढून रशियात आश्रय घेणे भाग पडले होते. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्या कार्यालयातील सुमारे वीस हजार "ई-मेल' ट्रम्प समर्थकांनी कशा "हॅक' केल्या, ते असांजने दाखवून दिले होते. त्यामुळेच आता ट्रम्प प्रशासनाचा त्याच्यावर डोळा आहे. त्याला आपल्या ताब्यात मिळविण्यासाठी अमेरिका जंग जंग पछाडणार, हे उघड आहे. आपल्याला माहिती पुरविणाऱ्यांची नावेही जाहीर करून असांजने अनेकांना अडचणीत आणले, हे तर झालेच; परंतु कोणत्याही व्यवस्थेत खुलेपणा आणि नियमन यांचा समतोल आवश्‍यक असतो. कारभारातील गैरप्रकार उघड करणे वेगळे आणि राजनैतिक गुपितांचा गौप्यस्फोट करणे वेगळे, असा मुद्दाही असांज याच्या अटकेमुळे उपस्थित झाला आहे. तरीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागल्याचे काम करणाऱ्याला दडपले जाणार का, हा प्रश्‍न उरतोच. त्यामुळे स्वातंत्र्याचा मुद्दा या प्रकरणात महत्त्वाचा आहे, यात शंका नाही.

Web Title: internet and technology in editorial