बेजबाबदारपणाचा 'रिऍलिटी शो' (अग्रलेख)

बेजबाबदारपणाचा 'रिऍलिटी शो' (अग्रलेख)

संसद भवनाच्या सुरक्षेतील त्रुटींचे चित्रण करून त्याचा व्हिडिओ "फेसबुक‘वर टाकण्याचे "आप‘चे खासदार भगवंत मान यांचे कृत्य बेजबाबदारपणाचे आहे. त्यांच्या या "दुःसाहसा‘ची दखल घेऊन "आप‘नेही त्यांच्यावर कारवाई करायला हवी.

आम आदमी पक्षाचे पंजाबमधील खासदार भगवंत मान यांनी संसद भवनाच्या सुरक्षेतील त्रुटींचा एक व्हिडिओ आपल्या "स्मार्ट फोन‘च्या माध्यमातून चित्रित करून तो "फेसबुक‘ या सोशल मीडियातून जगजाहीर केल्यामुळे प्रचंड खळबळ उडणे साहजिकच होते. पंधरा वर्षांपूर्वी संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे व्रण अजूनही बुजलेले नसताना, मान यांच्या या कृत्यामुळे संसदेचे कामकाज भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी रोखून धरले आणि अखेर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मान यांनी जाहीर माफीही मागितली. मात्र, यामुळे या प्रकरणावर पडदा टाकून चालणार नाही. एका प्रस्थापित राजकीय पक्षाचे सदस्यच असे कृत्य करत असतील, तर त्याबाबत त्यांना केवळ समज देऊन भागणार नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या व्हिडिओमुळे संसद भवनावर पुन्हा हल्ला करावयाचा झाला, तर काय करावयाचे याची मार्गदर्शिकाच दहशतवाद्यांच्या हाती लागली असे म्हणता येईल. अर्थात, आता या त्रुटींवर तातडीने कार्यवाही होईल आणि अतिरेक्‍यांसाठी ही मार्गदर्शिका बिनकामाची ठरेल, याची काळजी लोकसभा अध्यक्ष महाजन आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घेतली, तरच झाल्या प्रकारापासून आपण काही धडा घेतला, असे म्हणता येईल.
आम आदमी पक्ष हा आपल्या स्थापनेपासूनच काही ना काही खळबळजनक उद्योग करून बातम्यांत राहण्याचा प्रयत्न सदैव करत आला आहे. त्यात अर्थातच त्या पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवालही मागे नाहीत. मान यांनी हा व्हिडिओ चित्रित केला, यात गैर काहीच नव्हते. मात्र, तो सोशल मीडियावरून जगजाहीर करून त्यांनी संसदेच्या सुरक्षाविषयक शिष्टाचाराचाच केवळ भंग केला, असे नव्हे तर त्यामुळे संसद सदस्यांनाही आपण काय करतो आहोत, याचे भान उरले नसल्याचे निदर्शक आहे. मान यांनी हा व्हिडिओ लोकसभा अध्यक्षांकडे दिला असता, तर त्यात काही गैर मानले गेले नसते. मात्र, त्याऐवजी त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून "येनकेनप्रकारेण, प्रसिद्धपुरुषो भवेत‘ हा मंत्र जपला! त्यामुळे आता अशा "अतिरेकी‘ खासदारांमुळे त्यांना स्मार्ट फोन घेऊन संसदेत प्रवेश करू द्यावा की नाही, असाही प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. पंजाबमधील विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना केलेल्या या "कामा‘मुळे मान यांना अमाप प्रसिद्धी मिळाली आणि जगभरात त्यांचे नाव जाऊन पोचले, हे खरे! परंतु, आपल्याला मिळालेली ही प्रसिद्धी "निगेटिव्ह पब्लिसिटी‘ आहे, हे आता तरी त्यांना उमजले असेल तर बरे. एकीकडे आपल्या देशातील काही विघातक प्रवृत्ती दहशतवाद्यांशी संधान बांधू पाहत असल्याचे वारंवार निष्पन्न होत आहे. त्यास नेमका कसा प्रतिबंध करावयाचा या चिंतेत सारा देश आहे. मात्र, त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे मान यांनी हे प्रकरण उघड झाल्यावर दाखवलेली मस्ती. "आपण असे परत परत करू,‘ अशी त्यांची भाषा होती. त्यामुळेच लोकसभा अध्यक्षांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आणि मान यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. मान हे पुढे सुतासारखे सरळ आले आणि त्यांनी माफी मागितली असली, तरी ही कारवाई थांबता कामा नये. ही घटना इतकी गंभीर आहे की "आप‘नेही झाल्या प्रकाराची दखल घेऊन मान यांच्यावर पक्षपातळीवर कारवाई करायला हवी. त्याचे कारण म्हणजे अन्य कोण्या पक्षाच्या खासदाराने हे केले असते, तर केजरीवाल आणि कंपनीने त्याचे निश्‍चितच भांडवल केले असते. आता झाले ते झाले; पण त्यामुळे "आप‘ची प्रतिष्ठा धुळीस मिळाली, हेच खरे. 

 
क्रिकेटच्या मैदानावरील फलंदाजीपेक्षा टीव्हीच्या छोट्या पडद्यावरील "कॉमेडी शो‘मुळे अधिक नावारूपाला आलेले नवज्योतसिंग सिद्धू भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आम आदमी पक्षात प्रवेश करणार, असे वृत्त आल्यापासून त्या पक्षाचे वर्णन आणखी एक "कॉमेडी शो‘ असे केले जाऊ लागले आहे! मात्र, या अशा "कॉमेडी शो‘पेक्षा "आप‘चेच पंजाबातून निवडून आलेले खासदार भगवंत मान यांनी सादर केलेला "रिऍलिटी शो‘ हा अधिक गंभीर असून, त्यामुळे केवळ "आप‘च्याच नव्हे, तर देशाच्या प्रतिमेस धक्‍का पोचला आहे, हेच खरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com