इस्रोचे विक्रमी शतक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

एकेकाळी भारतावर निर्बंध घालणाऱ्या अमेरिकेने त्यांचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान वापरले, यातूनच "इस्रो'च्या देदीप्यमान कामगिरीचा अंदाज येतो. सरावलेल्या फलंदाजाप्रमाणे केलेली ही कामगिरी पुढील मोहिमांना संजीवनीच ठरेल. 

एकेकाळी भारतावर निर्बंध घालणाऱ्या अमेरिकेने त्यांचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान वापरले, यातूनच "इस्रो'च्या देदीप्यमान कामगिरीचा अंदाज येतो. सरावलेल्या फलंदाजाप्रमाणे केलेली ही कामगिरी पुढील मोहिमांना संजीवनीच ठरेल. 
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी उपग्रह सोडण्याची शतकी मजल मारून विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात ठसा उमटवितानाच जागतिक बाजारपेठेतील आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. "इस्रो'च्या या कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयांची मान निश्‍चितच उंचावली गेली आहे. आता दुसरे शतक झळकावण्याच्या तयारीत "इस्रो' आहे. येत्या दोन महिन्यात "इस्रो' आपला 100 वा उपग्रह तयार करणार आहे. पहिल्या चाचणीसाठी सायकलवरून रॉकेट नेणे, पहिला उपग्रह बैलगाडीतून प्रक्षेपण तळापर्यंत नेणे येथपासून सुरू झालेला प्रवास एकाच वेळी 104 उपग्रह सोडण्यापर्यंत आला आहे. भारताने 1974मध्ये पहिली अणुचाचणी घेतली तेव्हापासून आधुनिक तंत्रज्ञान भारतापर्यंत पोचू नये यासाठी विविध प्रकारचे निर्बंध अमेरिकेने घातले होते. या सर्वांवर मात करत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात भारताने झेप घेतली. एकेकाळी निर्बंध घालणाऱ्या अमेरिकेला त्यांचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी आता भारताचे तंत्रज्ञान वापरावे लागते, यातूनच "इस्रो'च्या कामगिरीचा अंदाज येऊ शकेल. 
एकाच वेळी शंभर किंवा त्याहून अधिक उपग्रह सोडण्याचे आव्हान आतापर्यंत कोणत्याही देशाने स्वीकारले नव्हते. या 104 उपग्रहांपैकी बहुतेक उपग्रह हे नॅनो वा मायक्रो उपग्रह होते. परंतु, सुमारे 27 हजार किलोमीटर प्रतितास या वेगाने प्रक्षेपक जात असताना उपग्रह एकमेकांना धडकू न देता त्यांच्या कक्षेत स्थापन करण्याचे काम अतिशय गुंतागुंतीचे व कौशल्याचे होते. या कामगिरीमुळे जागतिक बाजारपेठेची दारे आपल्यासाठी खुली केली आहेत. "मायक्रो सॅटेलाईट' तयार करण्याचा आणि सोडण्याचा सक्षम पर्याय आपण निर्माण केला आहे. सध्या सुमारे 1100 उपग्रह पृथ्वीभोवती फिरत आहेत. बुटांच्या एखाद्या छोट्या खोक्‍यापासून 24 इंचांच्या दूरचित्रवाणी संचाएवढ्या आकाराचे, प्रत्येकी एक ते 50 किलो वजनाचे सुमारे तीन हजार उपग्रह येत्या पाच वर्षांत अवकाशात सोडण्याचे नियोजन जगभरातील संशोधन संस्थांचे आहे. यातील सर्वांत मोठी योजना "वनवेब' ही संस्था राबवत आहे. जगातील कानाकोपऱ्यात इंटरनेट पोचविण्यासाठी 648 उपग्रह सोडण्याची त्यांची योजना आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर "इस्रो'ला सर्वाधिक संधी आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे छोटे उपग्रह माफक किमतीत अवकाशात सोडण्याची क्षमता कमी देशांकडे आहे, तसेच आपल्या वेगवेगळ्या गरजांसाठी अमेरिका आणि युरोपातील खासगी उद्योगांना उपग्रह सोडण्याची घाई झाली आहे. हवामानाचा अंदाज, दिशादर्शन, इंटरनेट अशा विविध उपयोगांसाठी हे उपग्रह वापरले जाणार आहेत. स्पेस एक्‍स, ब्लू ओरिजिन, रॉकेट लॅब, फायरफ्लाय सिस्टिम्स यांसारख्या कंपन्यांनी अजूनही मोठ्या प्रमाणावर उपग्रहनिर्मितीत पाऊल टाकलेले नाही. दुसरीकडे खासगी उद्योगांशी सहकार्याची भूमिका "इस्रो'ची आहे. उपग्रह निर्मिती, बांधणी, प्रक्षेपण, नियंत्रण यांचे केंद्र भारत व्हावे, अशी "इस्रो'ची इच्छा आहे. जागतिक कंपन्यांनी त्यांचे आराखडे द्यावेत, त्यानुसार उपग्रहाची बांधणी आणि प्रक्षेपण भारतातून होईल, अशा प्रकारची योजना "इस्रो' आखत आहे. खरं तर अशा प्रकारच्या एक-दोन प्रकल्पांवर काम सुरू आहे. "इस्रो' देत असलेली सेवा किफायतशीरही आहे. एखादा उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी "स्पेस एक्‍स' ही कंपनी सहा कोटी अमेरिकी डॉलर एवढा मोबदला घेते, तर तेच काम "इस्रो' 30 लाख डॉलर एवढ्या कमी मोबदल्यात करते. व्यावसायिक प्रक्षेपणांद्वारे गेल्या आर्थिक वर्षांत "इस्रो'ला 230 कोटी रुपये मिळाले होते. आजच्या मोहिमेसाठी 100 कोटी रुपये खर्च आला, तर 200 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. उपग्रहांची जागतिक बाजारपेठ 13 लाख कोटी रुपयांची आहे. त्यापैकी 0.6 टक्केच वाटा भारताचा आहे. आता हा वाटा वाढविण्याची संधी आहे. अवकाश संशोधनावरील खर्चाचा विचार केला तर भारत वर्षभरात साधारण एक अब्ज अमेरिकी डॉलर यासाठी खर्च करतो, तर अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था "नासा'चा 2017साठीचा अर्थसंकल्प 19.3 अब्ज डॉलरचा आहे. "इस्रो'च्या यशात ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचा ("पीएसएलव्ही') वाटा मोठा आहे आणि एका अर्थाने ही मर्यादाही आहे. मोठे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाच्या ("जीएसएलव्ही') पुढील चाचण्या यशस्वी होण्याची गरज आहे. "जीएसएलव्ही'साठी वापरण्यात येणाऱ्या क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी येत्या दोन दिवसांत घेतली जाणार आहे. पुढे चांद्रयान -2, मंगळ मोहीम- 2 असे महत्त्वाचे टप्पेही आहेत. दुसऱ्या मंगळ मोहीमेत तेथे बग्गी उतरविण्याची योजना आहे. यात आता फ्रान्सही भागीदार आहे. याशिवाय गुरू आणि शुक्राच्या मोहिमांची आखणीही सुरू आहे. शुक्र मोहिमेत सहभागासाठी "नासा'ही उत्सुक आहे. 
उपग्रह प्रक्षेपणाची किफायतशीर बाजारपेठ असे भारताचे स्थान टिकविण्याचे आव्हान आहे. फेरवापर करता येऊ शकणाऱ्या प्रक्षेपकांच्या निर्मितीवर अमेरिका आणि युरोपातील मोठ्या कंपन्या काम करत आहेत. भारतही याबाबत "अवतार' या प्रकल्पांतर्गत काम करत आहे. आपल्याला हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आणखी नऊ वर्षांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत इतर परदेशी कंपन्यांनी फेरवापर करता येणारा प्रक्षेपक यशस्वी केला तर त्यांचाही उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च निम्म्याहून कमी होऊ शकेल. या स्पर्धेत टिकण्यासाठी "अवतार'चे यश महत्त्वाचे असेल. 
 

 
 

Web Title: ISRO century