‘इस्रो’ची शतकी खेळी (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

‘इस्रो’ची कामगिरी अभिमानास्पद आहे. यशस्वीरीत्या प्रक्षेपित झालेल्या ‘कार्टोसॅट-२’मुळे स्वदेशी बनावटीच्या ‘जीपीएस प्रणाली’ला अधिक बळ मिळणार आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) स्वदेशी बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपणाचे शतक पूर्ण केल्यामुळे प्रत्येक भारतीयाची मान उंचावली गेली आहे. अमेरिकेपासून दक्षिण कोरियापर्यंत सर्व देशांचे उपग्रह सोडणारी विश्वासू व किफायतशीर संस्था म्हणून जग ‘इस्रो’कडे पाहत आहे. अपयशाचे काही प्रसंग सोडले, तर ‘इस्रो’च्या यशाचा आलेख कायम उंचावता राहिल्याचे दिसते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये प्रक्षेपण अयशस्वी झाल्याने ‘इस्रो’वर टीकेची झोड उठली होती. त्या अपयशामागे घातपात असल्याचा आरोप झाला होता. या टीकेवर मात करत नवे शिखर गाठण्याची कृती अभिनंदनीय आहे. भारताचा शंभरावा उपग्रह असलेला ‘कार्टोसॅट-२’मुळे स्वदेशी बनावटीच्या ‘जीपीएस प्रणाली’ला अधिक बळ मिळणार आहे. लष्करी आणि नागरी अशा दोन्ही सेवांसाठी हा उपग्रह वापरण्यात येऊ शकेल. भारताचा अवकाशातील डोळा म्हणून या उपग्रहाकडे पाहिले जाते. या उपग्रहामुळे ५०० किलोमीटर अंतरावरून सीमाभागात भागात नेमके किती शत्रू सैन्य आणि शस्त्रास्त्रे तैनात आहेत, याचीही माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळेच शेजारी पाकिस्ताननेही नव्या मोहिमेची धास्ती घेऊन मोहिमेला विरोध करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. वास्तविक पाकिस्तानने आपला अवकाश कार्यक्रम १९६१मध्ये म्हणजेच ‘इस्रो’च्या स्थापनेच्या आधी आठ वर्षे सुरू केला. परंतु, पाकिस्तान अजून या क्षेत्रात चाचपडतो आहे, तर भारताने केव्हाच गगनभरारी घेतली आहे.

भारताची जीपीसी प्रणाली ‘नाविक’ अचूक होण्यासाठी या प्रणालीतील सर्व उपग्रहांवरील आण्विक घड्याळ व्यवस्थित असण्याची गरज आहे. मात्र ‘आयआरएनएसएस-१ए’ वरील तीन आण्विक घड्याळे नादुरुस्त झाली आहेत. त्यामुळे नव्या घड्याळांची गरज होती. त्या दृष्टीनेही ‘कार्टोसॅट-२’चे महत्त्व आहे. ‘कार्टोसॅट-२’ सह आणखी तीस उपग्रह सोडण्याची किमया ‘इस्रो’ने केली आहे. अशा प्रकारची कामगिरी त्यांनी दुसऱ्यांदा केली. याआधी एकाच वेळी १०४ उपग्रह सोडण्याची विक्रमी कामगिरी पार पाडली आहे. भारताची अवकाश संशोधनाची तरतूद सुमारे चार अब्ज डॉलर आहे. जपान, जर्मनी, इटली आणि चीनची अवकाश संशोधनाची तरतूद यापेक्षा जास्त आहे. शास्त्रज्ञांच्या संख्येची तुलना करायची झाली तर ‘इस्रो’कडे सुमारे १६ शास्त्रज्ञ आहेत, तर अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’कडे साडेसतरा हजार व रशियाकडे सुमारे २४ हजार. भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळमोहीम यशस्वी केली होती. अमेरिकेला पहिली मंगळमोहीम यशस्वी करण्यासाठी पाच आणि रशियाला आठ प्रयत्न लागले  होते, यावरून भारतीयांच्या प्रतिभेची चुणूक दिसून येते. ‘इस्रो’ने गेल्या ४७ वर्षांत २५ देशांचे २७८ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, तर अमेरिकेने ७२ वर्षांत १३६९ व रशियाने ८० वर्षांत १४९२ उपग्रह अवकाशात सोडले आहेत, तसेच गेल्या दहा वर्षांत अवकाशात सोडण्यात आलेल्या उपग्रहांपैकी ३८ टक्के उपग्रहांचे प्रक्षेपण भारताने केले आहे, यातून प्रगतीची दिशा दिसून येते. या यशामुळे ३०० अब्ज डॉलरच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या उद्योगापैकी मोठा हिस्सा भारताकडे वळायला मदत होईल. शतकी यशामुळे ‘चांद्रयान-२’च्या तयारीसाठी आता हुरूप वाढला आहे. मार्चपर्यंत हे प्रक्षेपण होणे अपेक्षित आहे. त्या वेळी चंद्रावर बग्गीही पाठविण्याची योजना आहे. उपग्रह प्रक्षेपणाच्या बाबतीत महासत्ता होण्याच्या दिशेने टाकलेले ते पाऊल असेल. स्वदेशी शंभर उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर ‘इस्रो’ची जबाबदारी अधिक वाढली आहे. आतापर्यंतच्या यशात ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचा (‘पीएसएलव्ही’) मोठा वाटा आहे. भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (‘जीएसएलव्ही’), स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन, फेरवापर करता येणारे अवकाश यान अशा अनेक गोष्टींवर प्रगती करण्याची गरज आहे. नव्या वर्षांत नव्या जबाबदाऱ्या पार पाडून ‘इस्रो’ची व पर्यायाने भारताची मान अधिक उंचावली जाईल, हीच अपेक्षा.

Web Title: ISRO launches 100th satellite editorial