गैरसमज वितळविणारा 'इस्रो'चा पुरावा

डॉ. श्रीकांत कार्लेकर
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

स्कॅटसॅट-1 या कृत्रिम उपग्रहाने पाठविलेल्या माहितीमुळे, हवामान बदलासंबंधी आणखी एक ठोस पुरावा समोर आला आहे. त्याची दखल जगातील धोरणकर्त्यांना घ्यावी लागेल.

एकविसाव्या शतकाच्या सुरवातीसच जगभरच्या हवामानात व पर्जन्यमानात बदल होत असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. कोळसा व खनिज तेलाचा अतिरिक्त वापर, वाढते नागरीकरण, स्थानिक पातळीवर होणारी उष्णतावृद्धी, हवेचे प्रदूषण, वाढणारे कार्बन डायऑक्‍साइडचे प्रमाण, उष्णता विकिरण व शोषण यात प्रदूषणामुळे होणारे बदल, ढगांच्या निर्मितीप्रक्रियेत येणारे अडथळे या सर्वच गोष्टींचा हवामानबदलाच्या प्रक्रियेशी संबंध आहे. तापमानवाढीस कारणीभूत ठरणाऱ्या मानवी व्यवहारांत कोणते बदल करता येतील, याविषयी जगभर मंथन सुरू असले तरी जागतिक हवामानबदलाचे इशारे म्हणजे बागूलबोवा असल्याची भूमिका अमेरिकी महासत्तेचे अध्यक्षच जाहीरपणे घेत असल्याने पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. महासत्तेची धोरणे जर पुन्हा कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढवू लागली तर आजवर जे थोडेफार साध्य झाले, त्यावर पाणी फिरवले जाण्याचा धोका आहे. या पार्श्‍वभूमीवर "भारतीय अवकाश संशोधन अनुसंधाना'ने (इस्रो) 26 सप्टेंबर 2016 रोजी प्रक्षेपित केलेल्या स्कॅटसॅट- 1 या कृत्रिम उपग्रहाने पाठविलेल्या माहितीमुळे, हवामान बदलासंबंधी आणखी एक ठोस पुरावा समोर आला असून, त्याचे सध्याच्या या चर्चेत महत्त्वाचे स्थान आहे.
"स्कॅटसॅट-1' हा भारताचा प्रामुख्याने हवामानाचे आणि वादळांचे भाकीत करण्यासाठी प्रक्षेपित केलेला उपग्रह आहे. या उपग्रहाने मिळविलेल्या माहितीनुसार 2016 या वर्षात, धृवीय समुद्रांच्या पृष्ठभागावरील बर्फाच्या आवरणात, 2011या वर्षातील आवरणापेक्षा लक्षणीय घट झाली असल्याचे दिसून येते आहे."समुद्राच्या पृष्ठभागावरील बर्फाचे आवरण ' हा हवामान बदलाला ध्रुवीय प्रदेश कसा प्रतिसाद देतात ते समजण्याचा उत्तम निर्देशक मानण्यात येतो. हे हिमावरण म्हणजे विशाल समुद्र आणि वातावरण यातील "संक्रमण प्रदेश' किंवा दुवाच आहे.

"इस्रो'ने 23 सप्टेंबर 2009 रोजी प्रक्षेपित केलेल्या "ओशनसॅट'बरोबर ओस्कॅट ही सूक्ष्म समीक्षक विकिरण प्रणालीही (Scanning scatterometer ) पाठविली होती. या प्रणालीच्या साह्याने आर्क्‍टिक, अंटार्क्‍टिक, त्यावरील रॉस हिमस्तर, वेडेल समुद्र आणि दक्षिण जॉर्जिया बेटाजवळच्या समुद्रातील रोजच्या हिम आवरणाच्या प्रतिमा मिळू शकतात. या प्रणालीच्या साह्याने "स्कॅटसॅट-1'ने अंटार्क्‍टिकच्या किनाऱ्याजवळील भागात नोव्हेंबर 2016मध्ये घेतलेल्या प्रतिमांतून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली, ती अशी, की इथल्या समुद्राच्या पृष्ठभागावर बर्फाने सर्व बाजूंनी सीमित केलेल्या मोकळ्या, हिमविरहित प्रदेशाचा एक मोठा प्रदेश निर्माण झाला आहे. याला "पॉलिन्या' असे म्हटले जाते. असे हिममुक्त प्रदेश आर्क्‍टिक व अंटार्क्‍टिकवर दरवर्षी नोव्हेंबरच्या अखेरीला आणि डिसेंबरच्या सुरवातीला तयार होताच असतात. मात्र या हिममुक्त प्रदेशाचा विस्तार डिसेंबर 2016 मध्ये दरवर्षींपेक्षा खूपच जास्त वाढलेला दिसून आला. ही घटना अंटार्क्‍टिक आणि आर्क्‍टिक या दोन्ही खंडांवर आढळते. नोव्हेंबर 2016नंतर जानेवारी 17पर्यंतच्या काळात बर्फ वितळून गेल्यामुळे त्याचे प्रमाण एकदम घटले आहे. याच काळात आर्क्‍टिक महासागरातील बर्फाच्या प्रमाणातही थोडी घट झाली आहेच!

जगातल्या एकूण हिम आवरणापैकी 90 टक्के केवळ अंटार्क्‍टिकवरच आहे. त्यामुळेच जगातल्या एकूण गोड पाण्यापैकी 70 टक्के याच खंडावर आहे. अंटार्क्‍टिकवरचे सगळे बर्फ वितळले तर आजच्या समुद्राची पातळी 60 मीटरने वाढेल इतके बर्फ या खंडावर आहे. अर्थात अंटार्क्‍टिकचे सगळेच बर्फ वितळण्याची शक्‍यता निदान नजीकच्या भविष्यकाळात तरी अजिबात नाही. अंटार्क्‍टिकवरील हिमस्तरात सातत्याने बदल होत असतात.
अंटार्क्‍टिकवरील बर्फ कमीत कमी चार कोटी वर्षे तरी जुने असावे, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. दीड किमीपेक्षाही जास्त जाडीचे सगळीकडे आढळणारे बर्फाचे आवरण हेच या भूप्रदेशाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या वर्षी इथल्या वॉर्डी आईसशेल्फचा आकार एकाएकी कमी झाला. गेली 6500 वर्षे बर्फाने बंद झालेला प्रिन्स गुस्ताव हा प्रवाह 1995च्या वर्षात एकदम मोकळा झाला होता. लार्सन आईसशेल्फचा काही भाग 1995 च्या जानेवारीत आणि 2001 मध्ये वितळून मागे सरकला होता. अंटार्क्‍टिकच्या दक्षिण अमेरिकेच्या दिशेने जाणा-या द्वीपकल्पीय भागात तापमानवाढ होत असून, त्याच्या पश्‍चिमेला बेलिंगशाउनशेन समुद्रातील हिम आक्रसू लागले आहे.

अंटार्क्‍टिकच्या नेमकी विरुद्ध परिस्थिती उत्तर धृवाकडील आर्क्‍टिक महासागरात आढळून येते आणि इथे बर्फाचे प्रमाण थोडेसे वाढते आहे, असे "इस्रो'चे नवीन निरीक्षण आहे. खरे पाहता आर्क्‍टिकवरचा बर्फ वितळून त्याचे नीचांकी प्रमाण 11 सप्टेंबर 2015 च्या निरीक्षणात दिसून आले होते 1981 ते 2010 च्या तुलनेत आर्क्‍टिकवरचे हिमआवरण 18 लाख चौरस किमी क्षेत्रातून नष्ट झाले होते. 1957 पासूनची अंटार्क्‍टिकवरील हवेची निरीक्षणे असे सांगतात, की इथल्या हिमस्तरांचे तापमान एका दशकात एक दशांश अंश सेल्सिअस या वेगाने वाढते आहे.

अंटार्क्‍टिकच्या किनारी भागातले तापमान वाढत असल्याचे व अंतर्गत भागातले कमी होत असल्याचेही निरीक्षण आहेच. त्यामुळेच अंटार्क्‍टिकच्या एकूण प्रदेशात तापमानवाढ होत आहे, की तापमान घटते आहे आणि आर्क्‍टिक समुद्रपृष्ठावरील हिम वितळते आहे, की त्यावरील बर्फाचे प्रमाण वाढते आहे, या सर्वच गोष्टींचा नीटसा उलगडा होत नव्हता. आर्क्‍टिकच्या प्रदेशात 2016मध्ये बर्फ वितळून जाण्याचा वेग पूर्वीपेक्षा कमी झाला असला, तरी हिमआवरण कमकुवत झाल्याचे दिसून आले आहे. अशा गोंधळ वाढविणाऱ्या निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर "इस्रो'चे हे नवीन निरीक्षण निर्णायक व महत्त्वाचे आहे, असे म्हणायला हरकत नाही.

Web Title: isro's proof clears misunderstanding