रिक्त जागांची समस्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सुमारे तीन दशकांत शिक्षणाच्या खासगीकरणाच्या धोरणातून शहरातले वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अनेक प्रकारचे उच्च शिक्षण ग्रामीण भागापर्यंत पोहोचले. उच्च शिक्षणाकडे ओढा वाढला. तथापि, गुणवत्तापूर्ण, कालसुसंगत, उद्योग-व्यवसायाला अपेक्षित, कौशल्यपूर्ण शिक्षणाची वानवा जाणवू लागली. परिणामी, अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही नोकऱ्यांसाठी भटकंती वाट्याला आली. शिक्षणाच्या मानाने पगार आणि प्रतिष्ठा, नोकरी नाही, याचा प्रत्यय आला. त्यातूनच गेल्या तीन वर्षांत अभियांत्रिकी शाखेकडे ओढा घटत आहे. या वर्षी सव्वा लाख जागांपैकी आजमितीला 60 हजार जागा रिक्त आहेत, कदाचित त्या घटतील, पण रिक्त राहणार, हे निश्‍चित.

सुमारे तीन दशकांत शिक्षणाच्या खासगीकरणाच्या धोरणातून शहरातले वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अनेक प्रकारचे उच्च शिक्षण ग्रामीण भागापर्यंत पोहोचले. उच्च शिक्षणाकडे ओढा वाढला. तथापि, गुणवत्तापूर्ण, कालसुसंगत, उद्योग-व्यवसायाला अपेक्षित, कौशल्यपूर्ण शिक्षणाची वानवा जाणवू लागली. परिणामी, अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही नोकऱ्यांसाठी भटकंती वाट्याला आली. शिक्षणाच्या मानाने पगार आणि प्रतिष्ठा, नोकरी नाही, याचा प्रत्यय आला. त्यातूनच गेल्या तीन वर्षांत अभियांत्रिकी शाखेकडे ओढा घटत आहे. या वर्षी सव्वा लाख जागांपैकी आजमितीला 60 हजार जागा रिक्त आहेत, कदाचित त्या घटतील, पण रिक्त राहणार, हे निश्‍चित. 2017 मध्ये 1.38 लाखांपैकी 56 हजार आणि 2016 मध्ये 1.44 लाखांपैकी 64 हजारांवर जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, काही महाविद्यालये बंद करण्याची नामुष्की संस्थाचालकांवर ओढवली. 

संस्थाचालकांना विद्यार्थ्यांनी आपल्याकडे यावे, यासाठी आमिषे दाखवावी लागली. सवलतीची खैरात करावी लागली. भरमसाट शुल्क नाममात्र करावे लागले. तरीही जागा रिक्त आहेत. या वर्षी तंत्रशिक्षण पदविकेच्याही (डिप्लोमा) 40 हजारांवर जागा रिक्त राहतील, असे दिसते. हे चित्र चिंताजनक आहे. एकीकडे आपण 'मेक इन इंडिया'चा नारा देतोय. जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारत, असे अभिमानाने सांगतो. त्यासाठी कौशल्य शिक्षणावर भर देतोय आणि दुसरीकडे अभियांत्रिकीकडे विद्यार्थी पाठ फिरवत आहेत. याचा गांभीर्याने विचार करायला हवा. अर्थव्यवस्था विस्तारत असली, तरी वस्तुनिर्माण (मॅन्युफॅक्‍चरिंग) क्षेत्राचा वाटा अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. परिणामस्वरूप अपेक्षित नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. 

उद्योगांना अपेक्षित गुणवत्तापूर्ण, कौशल्यपूर्ण अभियंते निर्माण करण्यात आपण कमी पडलोय. जी आघाडीची महाविद्यालये आहेत, ती काळानुरूप अभ्यासक्रम बदलत असल्याने टिकून आहेत. अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांपासून ते विद्यार्थ्यांना त्यांचे शाखेचे थेट कौशल्यपूर्ण ज्ञान, उद्योगांत थेट प्रशिक्षण दिले पाहिजे. महाविद्यालये आणि उद्योग यांच्यात समन्वय साधून, त्यांना अपेक्षित गुणवत्ता कोणत्या आणि त्या विद्यार्थ्यांत येण्यासाठी काय केले पाहिजे, यावर मंथन घडवले पाहिजे. आज उद्योगांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ नाही. काही वर्षांपूर्वी डी.एड. महाविद्यालयांचे पेव फुटले होते. उच्च गुणवत्तेचे विद्यार्थीही तिकडे जात होते. पण, त्याचा फुगा फुटला. पाच-सहा वर्षांत ही महाविद्यालये ओस पडली. त्याच वाटेने अभियांत्रिकी महाविद्यालयांची, विशेषतः ग्रामीण भागात वाटचाल सुरू आहे. ही अधोगती टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना केली पाहिजे. 

Web Title: Issue for empty seats