कोवळ्या स्वप्नांवर घाला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

‘आयटी हब’ असलेल्या पुण्यात संगणक अभियंता अंतरा देबानंद दास हिच्या निर्घृण खुनामुळे आयटी कंपन्यांतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मूळ पश्‍चिम बंगालची ही तरुणी आधी बंगळूरच्या आयटी कंपनीत होती. सहा महिन्यांपूर्वी ती तळवडेतील कंपनीत रुजू झाली होती. शुक्रवारी रात्री कंपनीतून बाहेर पडल्यानंतर अज्ञात व्यक्‍तीने तिच्यावर शस्त्राने वार केले. ही घटना कंपनीपासून पाचशे मीटर अंतरावर आणि आयटी पार्क पोलिस चौकीपासून केवळ ५० मीटर म्हणजे हाकेच्या अंतरावर घडली. यावरून आयटी हब परिसरातील पोलिस यंत्रणा किती ‘दक्ष’ आहे, हेच स्पष्ट होते.

‘आयटी हब’ असलेल्या पुण्यात संगणक अभियंता अंतरा देबानंद दास हिच्या निर्घृण खुनामुळे आयटी कंपन्यांतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मूळ पश्‍चिम बंगालची ही तरुणी आधी बंगळूरच्या आयटी कंपनीत होती. सहा महिन्यांपूर्वी ती तळवडेतील कंपनीत रुजू झाली होती. शुक्रवारी रात्री कंपनीतून बाहेर पडल्यानंतर अज्ञात व्यक्‍तीने तिच्यावर शस्त्राने वार केले. ही घटना कंपनीपासून पाचशे मीटर अंतरावर आणि आयटी पार्क पोलिस चौकीपासून केवळ ५० मीटर म्हणजे हाकेच्या अंतरावर घडली. यावरून आयटी हब परिसरातील पोलिस यंत्रणा किती ‘दक्ष’ आहे, हेच स्पष्ट होते. आयटी कंपनीने कर्मचाऱ्यांना घरी ये-जा करण्यासाठी वाहनाची सुविधा उपलब्ध केलेली असताना, अंतरा रिक्षाने बाहेर का गेली आणि मारेकऱ्याने तिला कोठे नि कसे गाठले व या खुनामागील हेतू काय, हे अद्याप समजू शकलेले नाही. हा खून दागिन्यांच्या उद्देशाने झालेला नाही, हे नक्की. अंतराला काही दिवसांपासून एका तरुणाकडून त्रास देणारे कॉल्स येत होते. तिने त्याची कल्पना आपल्या बहिणीला दिली होती. हा तरुण बंगळूरपासून तिचा पिच्छा पुरवत होता, असे सांगण्यात येते. ही बाब तिने वेळीच पालकांच्या व पोलिसांच्या कानावर घातली असती, तर त्यांनी योग्य ती पावले उचलली असती. पोलिस या गुन्ह्याचा यथावकाश छडा लावतीलही; मात्र या घटनेने एका २३ वर्षीय निरपराध तरुणीच्या स्वप्नांचा अंत झाला आहे.

 पुण्यात सॉफ्टवेअर अभियंता महिला कर्मचाऱ्यांच्या खुनाच्या घटना याआधीही घडल्या आहेत. नयना पुजारी या संगणक अभियंता तरुणीचा ऑक्‍टोबर २००९ मध्ये खून झाला. नंतर आयटी कंपनीतील दर्शना टोंगारे या युवतीचा एकतर्फी प्रेमातून जुलै २०१० मध्ये खून झाला. या गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट आहे. आता अंतराच्या खुनानंतर आयटी कंपन्यांतील महिला कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. तेव्हा त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपन्यांचे प्रशासन व पोलिस यंत्रणेने आवश्‍यक त्या उपाययोजना करणे आणि कर्मचाऱ्यांनीही  स्वत:च्या सुरक्षेबाबत सावध राहणे गरजेचे आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.

Web Title: it women employee security