ई-कॉमर्सचा 'अलिबाबा' जॅक मा 

Jack Ma
Jack Ma

प्रबळ आत्मविश्‍वासाच्या जोरावर केवढी मोठी झेप घेता येऊ शकते, हे चीनची जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी "अलिबाबा'चे संस्थापक जॅक मा यांनी दाखवून दिले. प्रारंभीच्या काळात तीस ठिकाणी नोकरीसाठी केलेल्या प्रयत्नांना मिळालेला नकार पचविणाऱ्या जॅक मा यांनी पुढच्या दोन दशकांतच थेट "जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक' अशी बिरुदावली प्राप्त केली. अलिबाबा ई-कॉमर्सचे संस्थापक जॅक मा यांनी आपण सोमवारी निवृत्त होणार असल्याची घोषणा केल्याने त्यांच्याविषयी चर्चा होणे स्वाभाविक आहे. चोपन्नाव्या वाढदिवसानिमित्त सोमवारी उत्तराधिकारी नेमण्याबाबतची योजना ते जाहीर करतील, असे "अलिबाबा'ने म्हटले आहे. जॅक मा यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल, असेच आहे. बिल गेट्‌सप्रमाणे कोणतीही संगणक विज्ञानाची पार्श्‍वभूमी नसलेले जॅक मा यांचा लहानपणी कधीही संगणकाशी संपर्क आला नाही. एकदा त्यांना गणितात 120 पैकी केवळ एकच गुण मिळाला होता. 1980 च्या दशकात त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. 

कालांतराने त्यांनी शिक्षकी पेशा सोडून अनुवाद करणारी स्वत:ची कंपनी सुरू केली. 1994 रोजी व्यवसायानिमित्त ते अमेरिकेला गेले आणि तेथे पहिल्यांदा इंटरनेटच्या तंत्रज्ञानाचा अनुभव घेतला. इंटरनेटचे मायाजाल पाहून ते अचंबित झाले आणि या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा त्यांनी निर्धार केला. 21 फेब्रुवारी 1999 रोजी त्यांनी अलिबाबा कंपनीची पायाभरणी केली. यासाठी पंधराहून अधिक मित्रांचे त्यांनी सहकार्य घेतले. या कंपनीसाठी त्यांना कर्जाची गरज भासणार होती. म्हणून त्यांनी जपानच्या बॅंकेकडे अर्ज केला. अवघ्या पंधरा मिनिटांत त्यांनी कंपनीची योजना बॅंकेच्या अधिकाऱ्यांना पटवून सांगितली आणि कर्ज पदरात पाडून घेतले. आजघडीला 2.71 लाख कोटी रुपयांची मालमत्ता त्यांच्या नावावर आहे.

"अलिबाबा : द हाऊस दॅट जॅक मा बिल्ट' या पुस्तकात जॅक मा यांची वाटचाल कळते. 1999 मध्ये हांगत्झू येथे एका अपार्टमेंटमध्ये त्यांनी "अलिबाबा स्टोअर' सुरू केले. सुरवातीला त्यांच्या कामावर संशय घेतला गेला; परंतु लवकरच तो दूर झाला. जॅक मा यांनी अलिबाबा इ कॉमर्स, ऑनलाइन बॅंकिंग, क्‍लाउड कॉम्प्युटिंग, डिजिटल मीडिया, मनोरंजन क्षेत्रात काम केले आहे. निवृत्तीनंतर ते शिक्षणक्षेत्राकडे आणि सामाजिक कामांकडे लक्ष देणार असल्याचे सांगण्यात येते. शिक्षक ते शिक्षक, असा जॅक मा यांचा प्रवास चिकाटीचे दर्शन घडवतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com