गुरूची विद्या गुरूला... (अग्रलेख)

jakarta asian games
jakarta asian games

जाकार्तामध्ये भारतीय कबड्डी संघांचे दम उखडले आणि पुरुष संघाला, तर अंतिम फेरीची रेषाही गाठता आली नाही, ही गोष्ट देशातील क्रीडारसिकांना सलणारी आहे, हे खरेच; पण या अस्सल देशी खेळाने जगात आता कात टाकायला सुरवात केली आहे, ही त्यातील सुखावणारी बाब म्हणावी लागेल. हा जो पराभव झाला, त्यातून खेळापासून प्रशासनापर्यंत साऱ्या गोष्टींची झडझडून चिकित्सा व्हायला हवी. चार वर्षांपूर्वी कोरियात इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कबड्डीची दोन्ही सुवर्णपदके राखली होती. त्या वेळी दोन्ही संघांना इराणचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला होता. भारतीय पुरुष संघ अवघ्या एका गुणाने जिंकला होता. इराणची वाढत चाललेली ताकद पाहून ती भारतीय कबड्डीला मिळालेली तगड्या आव्हानाची घंटा होती. पण, विजयाच्या जल्लोषात तिचा नाद कुणालाच ऐकू आला नाही. ऐकू आला असता, तर चार वर्षांनी जाकार्तात भारताने दोन्ही सुवर्णपदके गमाविली नसती. पुरुष संघ तर अंतिम फेरीदेखील गाठू शकला नाही. उपांत्य फेरीतच इराणने त्यांना गाठले आणि नामोहरम केले. महिलांनी किमान अंतिम फेरी गाठली. सुवर्णपदकाच्या शर्यतीत मात्र त्या इराणकडूनच पराभूत झाल्या. भारताच्या कबड्डीतील मक्तेदारीला इतक्‍या लवकर शह बसेल असे कुणालाच वाटले नसेल. ‘बघू’, ‘करू’, ‘आता कुठे सुरवात आहे’ ‘आपण आपल्या पद्धतीनेच चालायचे’ ही भारतीय कबड्डी प्रशासकांची बेफिकिरीच या सगळ्याला कारणीभूत आहे. इराणची ताकद माहीत असूनही भारताने स्पर्धेसाठी निवडलेला संघ त्या वेळीच अनेकांच्या भुवया उंचावून गेला होता. या उंचावलेल्या भुवयांचे कारण आता तरी कबड्डी प्रशासकांना समजले काय? या वेळी झालेले पराभव हे धोक्‍याची वगैरे कसलीही घंटा नाही. आता या पराभवाचे दूरगामी परिणाम भारतीय कबड्डीला भोगावे लागणार आहेत. समोर खड्डा दिसत असताना बाजूने जाण्याऐवजी आपण त्या खड्ड्यातच उडी मारली आहे. या खड्ड्यातून बाहेर पडायचे असेल, तर अगदी शून्यातून म्हणजे खेळाडूंपासून प्रशासकांपर्यंत प्रत्येकाची मानसिकता बदलण्याची गरज आहे.

आपली मराठमोळी कबड्डी वाढत आहे, ही मात्र समाधानाची बाब आहे. ‘प्रो’ कबड्डीच्या माध्यमातून देशातीलच नव्हे, तर जगातील कबड्डीपटूंना शिकण्याचे व्यासपीठ मिळाले. ‘प्रो’मुळे कबड्डी घराघरांत आणि जगात पोचली. आपण परदेशी कबड्डीपटूंना शिकवले. त्यांचे बोट पकडून आपण त्यांना कबड्डीत घडवले. आज तेच आपल्या पुढे जाऊन पोचले. क्रिकेटचे जनक असलेल्या इंग्लंडवर भारतीयांनी वर्चस्व गाजविण्यासारखेच हे झाले. कबड्डीत भारताच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे आलेले देश आता भारतावर विजय मिळवत आहेत. कबड्डी वाढली आणि आणखी वाढेल यात शंकाच नाही. पण, त्याचबरोबर आपणही अद्ययावत रहायला हवे. पूर्वतयारी कसून करायला हवी. आपल्याकडे आहे तेच अंतिम असे कधीच मानता कामा नये. इराण, कोरियाने आपल्याला तोच धडा शिकविला आहे. त्यामुळे कबड्डी वाढलीय अशी नुसती मनाची समजूत करून न घेता सखोल आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. हरल्यावर प्रशासकांवर चारही बाजूंनी टीका होईल, साहजिक आहे. जी कारणे समोर येत आहेत ती यापूर्वीही होती. फरक इतकाच की ती फक्त खासगीत बोलली जायची. कारण, त्या वेळी आपण जिंकत होतो. आता हरल्यावर तीच कारणे उघडपणे बोलली जात आहेत. ही कारणे त्या वेळी उघडपणे बोलली गेली असती, तर आशियात इतक्‍या लवकर हरण्याची वेळ आली नसती हे नक्की. म्हणूनच शून्यातून सुरवात करताना खेळाडू, प्रशासक, प्रशंसक या प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ. त्यात बराच काळ मैदानावर आपल्या यशाचा झेंडा फडकत होता; परंतु पाहत पाहता इतर देशांनी त्यात मुसंडी मारली आणि आपली मातब्बरी कमी होत गेली. कबड्डीचे तसे होता कामा नये, याचा विचार करण्याची हीच वेळ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com