जंगलराज अन्‌ योगी सरकार 

जंगलराज अन्‌ योगी सरकार 

सत्तेत आल्यापासून योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार या ना त्या कारणासाठी नेहमी चर्चेत असते. अर्थात, ही चर्चा राज्यातील सुशासन, मूलभूत सुधारणांवर न होता. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, वाढती गुन्हेगारी, भडकाऊ वक्तव्यांवरच जास्त बेतलेली असते. आता चर्चेत येण्याचे कारण मात्र या सर्वांपेक्षा वेगळे ठरले. ते म्हणजे बुलंदशहरमधील एका मंदिराशी निगडित प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तिखट शब्दांत केलेली कानउघाडणी. 

या प्रकरणात सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलास राज्यात मंदिर, धर्मादाय ट्रस्ट आणि दिल्या जाणाऱ्या देणग्यांच्या व्यवस्थापनासंबंधी कोणता कायदा आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली होती. मात्र, त्यावर संबंधित वकिलास उत्तर देता आले नाही. हा धागा पकडत असे प्रकार नित्याचेच झाले असून, त्याला आम्ही कंटाळलो असल्याची संतप्त प्रतिक्रिया न्यायालयाने व्यक्त केली. देणग्यांतून मिळणाऱ्या रकमेचा दुरुपयोग रोखण्यासाठी एखादा कायदा करण्याची इच्छाशक्तीही या सरकारकडे नसल्याचे यावरून स्पष्ट होते, असा शेराही न्यायालयाने या वेळी मारला. सरकारची बाजू मांडणारे वकीलच अशा मुख्य माहितीपासून अनभिज्ञ आणि अशा घटना वारंवार घडतात, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानेच नोंदविल्याने एकूण कामकाज कसे चालते, याबाबतही प्रश्न उपस्थित झाला आहे. 

"बीआरडी'सारख्या दुर्घटनेनंतरही या सरकारला आरोग्य सुविधेप्रती किती आस्था आहे, हे वरचेवर समोर येणाऱ्या घटनांवरून दिसून येते. तिजोरीवरील ताण वाढेल म्हणून, 25 हजार होमगार्डना पर्यायी मार्ग शोधण्याऐवजी तडकाफडकी कामावरून कमी करण्याचा निर्णय या सरकारने नुकताच घेतला. राज्यातील महिला व बालविकासासंबंधी हे सरकार गंभीर नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी सुनावले होते. मात्र, याकडे डोळेझाक करीत हे सरकार जातीय राजकारणाला प्राधान्य देत असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहेत. राज्यात गुन्हेगारी घटल्याचा दावा योगी सरकार व पोलिस करताना दिसतात; मात्र योगी आदित्यनाथ यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून बलात्कार, हत्या अशा गंभीर गुन्ह्यांत वाढ झाली असून, त्याची माहिती जाणीवपूर्वक लपवली जात असल्याचा दावा विरोधक करीत आहेत. मध्यंतरी समोर आलेले उन्नाव सामूहिक बलात्कार आणि स्वामी चिन्मयानंदप्रकरणी कारवाईत झालेल्या दिरंगाईवरून या सरकारची मानसिकता काय आहे, हे अधोरेखित केले. 

सोनभद्र जिल्ह्यातील आदिवासींचे अलीकडील काळात घडलेले भूमाफियांकडून हत्याकांड, झाशीत एका कुटुंबातील चौघांना जिवंत जाळण्याचे प्रकरण, हापूडमध्ये पोलिस कोठडीत असलेल्या शेतकऱ्याचा मारहाणीत मृत्यू या घटना, ते अगदी परवा दिवसाढवळ्या हिंदू समाज पक्षाचे कमलेश तिवारी यांची गळा कापून, गोळ्या घालून केलेली हत्या राज्यातील गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे दर्शवते. अशात सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच केलेल्या टिप्पणीची नैतिक जबाबदारी स्वीकारत योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांमधून जोर धरू लागली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com