भाष्य : पुतीनशाहीचे सत्ताप्रयोग

भाष्य : पुतीनशाहीचे सत्ताप्रयोग

रशियाच्या शेजारील बेलारूसमधील जनता लोकशाहीच्या स्थापनेसाठी रस्त्यावर उतरली आहे.  रशियातही पुतीन यांच्या लोकशाहीविरोधी भूमिकेबद्दल लोक बोलायला लागले आहेत. पुतीन आणि बेलारूसचे अध्यक्ष यांच्यातील मैत्रीमागे आहे तो फक्त सत्तास्वार्थ.

शेजारील राष्ट्रात घडणाऱ्या घटनांचा परिणाम केवळ त्या देशापुरताच मर्यादित नसतो. तो इतर देशांतही प्रभाव पाडतो. रशिया व बेलारूसमध्ये सध्या जे घडते आहे, त्यामळे या वास्तवाचे ठळक प्रत्यंतर येत आहे. जेव्हा एखाद्या राष्ट्रातील लोक हुकूमशहाच्या विरोधात लढा देतात, तेव्हा त्या राष्ट्राच्या शेजारील देशातील लोकांमध्येदेखील लोकशाहीची भावना अधिक तीव्र होते. खऱ्या लोकशाहीची आवश्‍यकता त्यांना प्रकर्षाने जाणवते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बेलारूस देशातील लोेकशाहीसाठीच्या आंदोलनाचा साहजिकच रशियात परिणाम जाणवतो. बेलारूस हा रशियाचा शेजारील देश. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्‍झांडर लुकाशेन्को आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात चांगले संबंध आहेत. सोमवारी उभय नेत्यांत रशियातील सोशी येथे चर्चा झाली. बेलारूस आधी सोव्हिएत महासंघाचाच भाग होता. बेलारूसच्या निवडणुकीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लुकाशेन्को परत एकदा विजयी झाल्याची घोषणा ९ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने केली आणि लगेच लोकांनी रस्त्यावर उतरून त्याला विरोध सुरू केला. खरा निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केला नाही आणि लुकाशेन्कोच्या दबावामुळे आयोगाने त्यांना अनुकूल असा निर्णय जाहीर करून टाकला, असा लोकांचा आरोप आहे.  राजधानी मिन्स्क आणि इतर शहरात प्रचंड संख्येने लोक रस्त्यावर उतरायला लागले. लुकाशेन्कोच्या विरोधात निवडणूक लढवणारी स्वेतलाना शिकानोवस्क्‍या हिला शेजारील लिथुआनिया देशांत आश्रय घ्यावा लागला. आंतरराष्ट्रीय समुदायाने बेलारुसच्या जनतेच्या संघर्षाचे कौतुक केले. युरोपातल्या अनेक राष्ट्रांनी लगेच बेलारूसच्या जनतेच समर्थन केले. रशियाच्या विस्तारवादी धोरणावर यामुळे नियंत्रण येईल, असा विचार त्यामागे असण्याची शक्‍यता दिसते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुतीनविरोधाला धार
रशियात अध्यक्ष व्लादिमीर पुतीन सर्वशक्तिमान आहेत. त्यांचे वागणे हुकूमशहासारखेच आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जनमत घेऊन २०३६पर्यंत आपल्याला अध्यक्षपदी कायम राहता येऊ शकेल, अशी तरतूद पुतीन यांनी करून घेतली. त्यांच्या वर्तमान अध्यक्षपदाची मुदत २०२४पर्यंत आहे. त्यानंतरही दोनदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येईल, अशी दुरुस्ती घटनेत करण्यात आली आहे. ७८ टक्‍क्‍यांहून अधिक मतदारांनी पुतीन यांच्या सरकारने सुचवलेल्या प्रस्तावाच्या समर्थनात मतदान केल्याचे सांगण्यात आले. लोकांच्या मनात सहाजिकच याबद्दल अनेक प्रश्न आहेत. आधी पुतीन गुप्तचर संस्था ‘केजीबी’चे अधिकारी होते. ते १९९९ पासून अध्यक्ष किंवा पंतप्रधान पदावर आहेत. रशियाला आर्थिक आणि लष्करी सत्ता म्हणून उभा करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. रशियाच्या राजकारणात त्यांनी आपली निरंकुश सत्ता स्थापित केलेली आहे. त्यांच्या तोडीचा आज रशियात दुसरा नेता नाही. स्वतःच्या प्रेमात मग्न असलेल्या राजकीय नेत्यांत हुकूमशाही प्रवृत्ती असते आणि पुतीन त्याला अपवाद नाहीत. अशा प्रकारची मानसिकता असलेले नेते दुसऱ्या कोणालाही पुढे येऊ देत नाहीत.

रशियातील विरोधी नेते एलेक्‍सी नवलनी यांना अलीकडे विष देण्यात आल्याचे उघडकीस झाले आहे. सायबेरियाहून मॉस्कोला परत येत असताना विमानातच नवलनी आजारी पडले. नवलनी यांची लोकप्रियता वाढत होती. पुतीन यांचा युनायटेड रशियन पार्टी हा पक्ष बदमाषांचा असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तेरा वेळा त्याला सरकारने तुरुंगात टाकले आहे. नवलनीवर जर्मनीत औषधोपचार सुरू आहेत. त्याला चहातून `नोबिचोक’ नावाचे विष देण्यात आल्याचे म्हटले जाते. रशियन सरकारने विषप्रयोगाशी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले. परंतु विरोधी नेत्यांचे रशियात ज्या स्वरूपाने अचानक मृत्यू होत किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न होतो, त्यामुळे संशयाची सुई पुतीन आणि रशियन सरकारकडे जाते. पाच वर्षात किमान सहा विरोधी नेत्यांची हत्या झाली आहे किंवा त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला आहे. २०१५ च्या फेब्रुवारीत बोरीस येल्तसिनच्या काळातल्या माजी उप-पंतप्रधान बोरीस नेमस्तोव यांची मॉस्कोत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. २०१५ आणि २०१७ मध्ये ब्लादिमीर कारामुरझा नावाच्या पत्रकाराच्या चहात विष टाकण्यात आले होते. तो जेमतेम वाचला. शेवटी त्याने रशिया सोडला. पूर्वेकडील खबारोवस्क येथील लोकप्रिय गवर्नर फर्जी फुरगलला अटक करण्यात आली, तेव्हापासून तिकडचे लोक फुरगलच्या अटकेच्या विरोधात निदर्शने करत आहेत. ही निदर्शने पुतीनच्या विरोधात आहेत. त्यांच्या घोषणा आहेत ’बेलारूसच्या लोकांना आमचा पाठिंबा’, ’पुतीन राजीनामा द्या’. एकाने सांगितलं, ‘मी बेलारूस आणि खबारोवस्कमध्ये खूप साम्य पाहतो. आम्ही सर्व आंदोलका आहोत म्हणूनच नव्हे, तर आमच्यात समानता आहे. मुक्त वातावरणात न्याय्य पद्धतीने निवडणुका व्हाव्यात अशी आमची साधी सरळ मागणी आहे. ‘याचा अर्थ रशियात निवडणुका योग्य आणि मुक्त वातावरणात होत नाहीत, असा होतो. रशियाचा एकमात्र नेता पुतीन आहे असे चित्र उभे करण्यात पुतीनना यश मिळाले आहे.

लोकशाही मूल्यांचा कस
प्रत्येक हुकूमशहाच्या मनात लोक कधीतरी आपल्याविरुद्ध बंड करतील, याची भीती असते. इतिहास हुकूमशहांच्याविरुद्धच्या बंडाचा आहे. हुकूमशहा फार काळ सत्तेत राहात नाही, असे आपल्याला इतिहास सांगतो. बेलारुस येथे आंदोलन सुरू आहे. युक्रेनमध्ये २०१४ मध्ये झालेली क्रांती रशियाच्या विरोधात आणि पाश्‍चात्य देशाच्या बाजूने होती. बेलारूसमध्ये किमान तसे नाही. मिन्स्क येथील आंदोलन रशियाच्या विरोधात नाही आणि पाश्‍चात्य देशाच्या समर्थनात नाही. लुकाशेन्को आणि पुतीन यांच्यात जवळचे संबंध आहेत. सोमवारी लुकाशेन्को यांनी सोशीला जाऊन पुतीनची भेट घेतली आणि मदतीची विनंती केली. रशियाला जाण्यापूर्वी रशियन टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत लुकाशेन्कोनी म्हटलेले, ‘कदाचित यापुढे रशियाला राजकीय तणाव सहन करावा लागेल. तुम्ही सावध राहिले पाहिजे. काहीही कारण नसताना तुमच्या देशात काही राजकीय घडामोडी घडू शकतात. जर आता बेलारुस पडलं, तर पुढचा नंबर रशियाचा असणार.’ त्यांनी पुढे म्हटले, ‘तुम्हाला जर असे वाटत असेल की, रशियासारखा श्रीमंत देश अशा गोष्टींना पुरून उरेल, तर तो तुमचा गैरसमज आहे.’

सर्वसामान्य रशियनांची सहानुभूती बेलारूसच्या लोकांसोबत आहे. आश्‍चर्य म्हणजे, पुतीन यांनी लुकाशेन्कोला सांगितले की, रशियन पोलिस तयार आहेत. बेलारुसची परिस्थिती चिघळली तर रशियन पोलिस मध्यस्थी करणार. रशिया बेलारुसला १.५ अब्ज डॉलर एवढे कर्ज देणार, असेही सांगण्यात आले. पुतीन हे अत्यंत धूर्त राजकारणी असल्यामुळे त्यांना माहीत आहे की, जर बेलारुसमध्ये लोकांच्या दबावामुळे लुकाशेन्को यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला तर त्याचे रशियात मोठ्या प्रमाणात परिणाम होतील आणि रशियात लोकशाहीवादी आंदोलनाला बळ मिळेल. जर बेलारुसमध्ये लोकांच्या आंदोलनाला यश मिळाले नाही तर रशियातील लोकशाहीवादी नेत्यांमध्ये नैराश्‍य निर्माण होईल आणि त्या अर्थाने पुतीनविरोधी आंदोलन कमकुवत होईल. मात्र वाणी आणि प्रत्यक्ष कृती यात खूप फरक असतो. रशियात पुतीन यांच्या लोकशाहीविरोधी भूमिकेबद्दल लोक बोलायला लागले आहेत. बेलारूसमधील आंदोलन हा एकप्रकारे पुतीन यांनाही इशाराच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com