पाकिस्तानातील सत्ता समतोल ?

सारंग खानापूरकर
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

भारत-पाकिस्तान सीमेवर सातत्याने होणारा गोळीबार, जम्मू-काश्‍मीरमधील अशांतता, आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही देशांदरम्यान निर्माण झालेले अविश्‍वासाचे वातावरण आणि कट्टर भारतद्वेषी समजले जाणारे लष्कप्रमुख जनरल राहिल शरीफ यांची उद्या (ता. 29) होणारी निवृत्ती, या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तान सरकारने लेफ्टनंट जनरल कमर जावेद बाज्वा यांची नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. पाकिस्तानात मुलकी सरकारवर कायमच वरचष्मा असलेल्या लष्कराचे भारतविरोध हेच धोरण असते. बाज्वा हे पाकिस्तानी लष्करातील सर्वोत्तम अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. सध्या ते लष्करी प्रशिक्षण विभागाचे महानिरीक्षक आहेत. जनरल शरीफ हेदेखील लष्करप्रमुख होण्यापूर्वी याच पदावर होते. 1980मध्ये बलुच रेजिमेंटमधून बाज्वा यांच्या लष्करी कारकिर्दीला सुरवात झाली. त्यानंतर काही काळ ते सिंध रेजिमेंटमध्येही होते. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या प्रत्यक्ष ताबारेषेवर संरक्षणाची जबाबदारी असणाऱ्या तुकडीचे प्रमुखपद त्यांनी सांभाळले आहे. पाकव्याप्त काश्‍मीरमधील परिस्थितीचा त्यांना मोठा अनुभव आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांना लष्करप्रमुखांकडून सत्ता हिसकाविली जाण्याची कायमच भीती असते; मात्र बाज्वा यांची लोकशाहीकडे झुकणारी विचारसरणी आणि प्रसिद्धीपासून दूर राहण्याची वृत्ती याचा पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर प्रभाव पडल्याचे मानले जाते. लष्करप्रमुखपदी निवड झाल्याचे जाहीर होताच बाज्वा यांनी "भारतापेक्षा पाकिस्तानला मूलतत्ववादाचा धोका अधिक आहे,' असे विधान करत आपला वास्तववादी दृष्टिकोन प्रकट केला आहे. बाज्वा यांच्याबरोबरच या पदासाठी इतर तीन अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. हे चौघे अधिकारी एकाच दिवशी लष्करात दाखल झाले असले, तरी बाज्वा यांनी विविध परिस्थितीत काम केल्याने त्यांचा अनुभव अधिक आहे. लोकशाहीला मानणारा आणि लष्करी सेवेतही उत्कृष्ट असे पंतप्रधान शरीफ यांना हवे असलेले दोन्ही गुण बाज्वा यांच्यामध्ये असल्याने त्यांच्याच नावाची चर्चा अधिक होती. जनरल शरीफ यांच्या कालावधीत लष्कराचा प्रभाव वाढला होता. या पार्श्‍वभूमीवर बाज्वा यांच्या नियुक्तीने सत्ता समतोल साधला गेल्याचे मानले जाते. जनरल शरीफ यांच्या आक्रमक धोरणांमुळे सीमेवरील चकमकी वाढल्या असे सांगण्यात येते. बाज्वा यांचा स्वभाव आणि भूमिका पाहता ते भारताची अकारण कुरापत काढण्याऐवजी पाकिस्तानातील मूलतत्ववादाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करतील, अशी आशा आहे.

Web Title: javed bajwa, pak's power balance