करिष्मापर्वातील नायिका (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

राजकारणातील अनेक वादळे आणि भोवरे यांना तोंड देतही पुढे जात राहिलेल्या जयललिता यांनी लोकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजविले. त्यांच्या करिष्म्याची ही करामत होती. 
 
रामस्वामी पेरियार यांनी तमिळनाडूत 1925 मध्ये सुरू केलेल्या द्रविड चळवळीतून पुढे उदयास आलेल्या एका पक्षाचे नेतृत्व एका ब्राह्मण व्यक्‍तीकडे जाणे... त्यातही ती व्यक्‍ती महिला असणे आणि पुढे तीच महिला अनेक आरोपांच्या झंझावाती वादळातून पुन्हा पुन्हा उभी राहत त्याच राज्याची अनेकवार मुख्यमंत्री होणे... जे. जयललिता यांचे सारे जीवन कोणत्याही प्रतिभाशाली चित्रपटकाराला मोहिनी घालावे, असेच होते.

राजकारणातील अनेक वादळे आणि भोवरे यांना तोंड देतही पुढे जात राहिलेल्या जयललिता यांनी लोकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजविले. त्यांच्या करिष्म्याची ही करामत होती. 
 
रामस्वामी पेरियार यांनी तमिळनाडूत 1925 मध्ये सुरू केलेल्या द्रविड चळवळीतून पुढे उदयास आलेल्या एका पक्षाचे नेतृत्व एका ब्राह्मण व्यक्‍तीकडे जाणे... त्यातही ती व्यक्‍ती महिला असणे आणि पुढे तीच महिला अनेक आरोपांच्या झंझावाती वादळातून पुन्हा पुन्हा उभी राहत त्याच राज्याची अनेकवार मुख्यमंत्री होणे... जे. जयललिता यांचे सारे जीवन कोणत्याही प्रतिभाशाली चित्रपटकाराला मोहिनी घालावे, असेच होते.

तमीळ चित्रपटसृष्टीनेच त्यांची गाठ एम. जी. रामचंद्रन यांच्याशी घालून दिली आणि रुपेरी पडदा गाजवताना, त्यांचे पाऊल राजकारणात पडले. सारेच अद्‌भुत. एकेकाळची पडद्यावरची ही रसिकमोहिनी बघता बघता तमीळ जनतेची 'अम्मा' होऊन गेली! -आणि त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर तमिळनाडूतील लक्षावधी अम्मांना आपल्या घरातीलच माणूस गेल्यासारखे दु:ख झाले आहे.

त्या मृत्यूशी गेले 75 दिवस देत असलेली झुंज पाहून अवघे तमिळनाडू निश:ब्द झाले होते. अखेर त्यांच्या निधनानंतर तमीळ जनतेने अश्रूंवाटे आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.

पेरियार यांच्या द्रविड चळवळीचा वारसा घेऊन अण्णादुराई यांनी स्थापन केलेला पक्ष फुटला आणि 'अण्णा द्रमुक' या नावाने एम. जी. रामचंद्रन तथा 'एमजीआर' यांनी तमिळनाडूच्या राजकारणात नवा रस्ता शोधण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून तमीळ राजकारण अण्णा द्रमुक आणि एम. करुणानिधी यांचा द्रमुक याच दोन पक्षांभोवती केंद्रित झाले. वैचारिक वारसा, संघटन वगैरे मागे पडून वैयक्तिक करिष्मा हेच त्या दोन्ही पक्षांचे वैशिष्ट्य बनले. या दोन ध्रुवांवरच राज्याचे राजकारण हिंदोळत राहिले. जयललिता यांच्या निधनामुळे त्यातला एक ध्रुव निखळून पडला असल्याने निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा फायदा उठवण्याचे प्रयत्नही होणार, यात शंका नाही. सध्या केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाबरोबरच कॉंग्रेसही त्या दृष्टीने प्रयत्न करणार हे उघड आहे. 

'एमजीआर' यांनी नवी वाट शोधली तेव्हा जयललिता त्यांच्यासोबत जाणे हे साहजिकच होते. नव्या पक्षाच्या त्या प्रचारप्रमुख होणे, हेही केवळ तमिळनाडूच नव्हे, तर त्यांची जन्मभूमी असलेल्या कर्नाटकासह संपूर्ण दक्षिण भारतावर असलेली त्यांची मोहिनी लक्षात घेता स्वाभाविक होते. आपले पूर्वसंस्कार बाजूला ठेवून त्या द्रविड जनतेशी एकरूप झाल्या. मात्र, चित्रपटसृष्टी आणि पुढे राजकारण या दोन्ही क्षेत्रांत कमालीची लोकप्रियता लाभलेल्या जयललिता यांचे व्यक्‍तिगत जीवन एकाकी होते. या एकाकीपणातूनच त्यांच्यात एकारलेपण नि अहंकार शिरला. पण तरी त्यांनी दोन-अडीच दशके तमिळनाडूवर अधिराज्य गाजवले, ते करिष्म्याच्या जोरावर. एखाद्या व्यक्तीला देवत्व बहाल करायचे ही आपल्याकडची सर्वसामान्यांची प्रवृत्ती. तमिळनाडूत तर ती जास्तच. त्यामुळे रुपेरी पडदा गाजविणाऱ्या अम्मा पाहता पाहता जनतेच्या गळ्यातल्या ताईत बनल्या. त्याच आपल्या तारणहार असे जनता मानू लागली. हा करिष्मा आणि त्यांची झुंझार वृत्ती यामुळे अनेक संघर्षांना त्या यशस्वीरीत्या सामोरे गेल्या. 
द्रमुक नेते करुणानिधी यांच्यासारख्या बलदंड नेत्याशी कडवी लढाई देत जयललितांनी अवघा तमिळनाडू कवेत घेतला. आमदार म्हणून त्यांची कामगिरी आक्रमक होती. एकदा अर्थसंकल्पी भाषण त्यांनी रोखले, तेव्हा द्रमुक सदस्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्या वेळी 'आता सभागृहात येईन ते मुख्यमंत्री म्हणूनच', असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आणि तो तडीसही नेला. मात्र, त्या वेळी करुणानिधी यांनी जयललिता यांच्यावर अमाप संपत्ती जमवल्याचे आरोप केले आणि त्यांना अनेक न्यायालयीन लढतींना तोंड द्यावे लागले. त्यापैकी डझनभर खटल्यात त्यांना निर्दोष सोडले गेलेही; मात्र त्यापूर्वी काही काळ त्यांना कारावासात काढावा लागला. पण त्यांच्या लोकप्रियतेवर तसूभरही परिणाम झाला नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांनी राबवलेल्या अनेक लोकप्रिय योजना. त्यांचे अम्मा कॅन्टीन गरिबांना दहा रुपयांत पोटभर जेवण देते, तमीळ अम्मा नेसतात त्या साड्या असतात 'अम्मा साड्या' आणि आपल्या घरांत 'अम्मा मिक्‍सर'वरच जेवण करतात! तमीळ जनता पाणी पिते तेही 'अम्मा वॉटर' असते आणि शाळेतली मुले वह्या-पुस्तके नेतात ती 'अम्मा दप्तरा'तूनच! 

तमिळनाडू पादाक्रांत केल्यानंतर मग अम्मांच्या मनात राष्ट्रीय पातळीवर जाण्याची मनीषा निर्माण होणे, हेही स्वाभाविकच. 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'एनडीए' सरकारातून बाहेर पडून, त्यांनी अचानक कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबरोबर साजरी केलेली 'टी पार्टी' गाजली होती. त्यानंतरच वाजपेयी सरकारही कोसळले. मात्र, दिल्लीत वर्चस्व गाजवायचे असेल तर त्यासाठी आपले राज्य सोडून दिल्लीत बस्तान बसवावे लागते. तमीळ जनतेवरील अलोट प्रेमापोटी त्यांनी ते केले नाही आणि आज लोकसभेत 37 खासदारांचा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही त्यांनी तमिळनाडूच आपले सर्वस्व मानले. आता त्यांच्या निधनानंतर ओ. पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. तरीही त्यांना शशिकला, तसेच तम्बीदुराई कितपत साथ देतात, यावरच तमिळनाडूचे भवितव्य अवलंबून आहे. एका अर्थाने अण्णा द्रमुकचे भवितव्यच जयललिता यांच्या निधनामुळे पणास लागले आहे, असे त्यामुळेच म्हणता येते.

Web Title: Jayalalitha concurred the political world in Tamilnadu