कलाबहर : चिंतन आणि रियाजाचे शिंपण

जगणं, जगण्याचा प्रवास ही व्यामिश्र संकल्पना आहे. बाळबोध सुभाषितांचा वरवरचा आधार घेतला तर सरळमार्गी जिणे सोपेआहे असे दिसते.
कलाबहर : चिंतन आणि रियाजाचे शिंपण

- जयंत भीमसेन जोशी

जगणं, जगण्याचा प्रवास ही व्यामिश्र संकल्पना आहे. बाळबोध सुभाषितांचा वरवरचा आधार घेतला तर सरळमार्गी जिणे सोपेआहे असे दिसते. हे लहान मुलांना सांगायला ठीक आहे; पण उपजीविकेसाठी फक्त कलेवर अवलंबून असणाऱ्यांसाठी ते सोपे नव्हते आणि नाही. अर्थार्जनासाठी नोकरी किंवा दुसरा व्यवसाय करत कलासाधना करणे निश्चितच स्पृहणीय आहे; परंतु यात कुठेतरी एका तडजोडीचा भाग आहे. संपूर्ण वेळ स्वतःच्या कलानिर्मितीला मिळेलच, असे यात होत नाही. आपल्या समाजात अभिजात कलेच्या संवर्धनासाठी मोठे निधी उपलब्ध नाहीत. आणि असले तरीही त्या संस्थांसमोर आत्मसन्मान राखून समोर येणे हे सगळ्या कलावंतांसाठी सहज नाही. आपल्याकडे मोठ्या शहरातल्या नामवंत क्युरेटर्सनी, आर्ट-गॅलरीजनी स्वतःहून समकालीन नव्या कलावंतांचा शोध घेतल्याची उदाहरणे बोटावर मोजण्याइतकीही नाहीत. सर्वच कलावंतांना प्रसिद्धीची भूक असेलच असेही नाही. पण वर्तमानात स्वतःचे मार्केटिंग करणे हा महत्त्वाचा गुण आहे.

समाजाला कलेमधलं तर-तम समजावून देणे हे खरं म्हणजे समीक्षकांचे कर्तव्य आहे; परंतु गेल्या या शतकात कला-समीक्षकांची भूमिका प्रसार माध्यमांमधून जवळजवळ हद्दपार झाली आहे असे दिसते. येनकेन प्रकारे उरलेल्या जागेत थातुरमातुर समीक्षणे कोंबायची, असे सारे चित्र दिसते. त्यामुळे कला म्हणजे करमणूक असे समीकरण लोकांनी स्वतःच बनवून घेतले आहे. अशा मर्यादित चौकटीत राहिलो तर अनेक प्रश्न झाकलेलेच राहतील. समस्या दिसल्या नाहीत म्हणून त्या अस्तित्वातच नाहीत असं कसं म्हणणार? प्रश्न समजलेच नाहीत म्हणून ते अनुत्तरित राहिले, ही सबब नाही होऊ शकत. काय घडू शकेल, काय अडचणी येऊ शकतात आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार, याची समग्र तयारी असायला हवी. कलेची समज व्यक्तीला अधिक तरल आणि प्रगल्भ बनवते.

कलाही फक्त तिच्या इतिहासात सामावलेली नाहीये, तर भविष्यातदेखील तिचं आस्तित्व आहे, त्या उद्याच्या अस्तित्वाचा कलावंत त्यांच्या निर्मितीतून जो वेध घेतात. त्यांचे हे योगदान वर्तमानातल्या विज्ञानासाठीही महत्त्वाचे ठरू शकते. शुद्ध आनंद देणे, वास्तवाकडे नव्या दृष्टिकोनातून बघायला शिकवणे, संवेदनांची नव्याने जाणीव करून देणे याबरोबरच कल्पनाशक्तीला अधिक तरल बनवणे हे कलेचे/कलावंतांचे मोठे काम आहे.

कलावंत म्हणून जगताना स्वतःमधलं जग, त्यातली शिदोरी सगळ्यात महत्त्वाची. कलाविश्वात घडणाऱ्या घडामोडींबद्दल सजग असलंच पाहिजे; पण त्यात रोज काही नवे घडत नाही, हे प्रकर्षानं जाणवतंय. छाप ठेऊन जाणाऱ्या घटना घडल्या त्या चाळीसपन्नास साठसत्तरच्या दशकात. सध्याच्या काळात मात्र सगळ्याच कला-आविष्कारांमध्ये स्टॅण्डर्डायझेशन आणि सपाटीकरण पाहायला मिळतंय, याच कारण असू शकेल - उर फाटेपर्यंत वाढलेला तंत्रज्ञानामधल्या शोधांचा ओघ. हा ओघ पचण्यासाठी हवी आहे प्रचंड भौतिक साधनसंपत्तीची रसद. खरी नवी कल्पना चिंतनातून आणि रियाजातून प्रसवते. ओढूनताणून मॅन्युपलेट करण्याचा तो विषय नाही. मनामध्ये प्रचंड विशाल भावविश्व आहे. जाणीवा आणि प्रेरणा आहेत. पण त्यांचे तरंग आणि जगाचा वेग यांचा मेळ बसत नाहीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com