कलाबहर : कल्पनाशक्तीची गुरुकिल्ली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलाबहर : कल्पनाशक्तीची गुरुकिल्ली
कलाबहर : कल्पनाशक्तीची गुरुकिल्ली

कलाबहर : कल्पनाशक्तीची गुरुकिल्ली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- जयंत भीमसेन जोशी

व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच व्यक्ती तेवढ्या दृष्टी-परिप्रेक्ष्यांची लयलूट. त्यातही, जितकी तुमची समज, तितकी तुमच्या विचारांची खोली. जेवढा तुमच्या विचारक्षमतेचा परीघ तेवढा तुमच्या जगाचा विस्तार. जितकी तुमची तरल कल्पनाशक्ती तेवढा तुमचा आवाका आणि तेवढ्याच तुमच्या अभिव्यक्तीच्या मर्यादा. परंतु कलावंताच्या रियाझी उत्साही नजरेला तेच दृश्य अजून काही पलीकडचे दाखवते आणि त्यामुळे लोकांना त्या दृश्यातले नवे प्रतल दिसतात, जे सभ्यतेमध्ये भर घालतात. बघणाऱ्याच्या कल्पनाशक्तीला चालना देतात.

कल्पनाशक्ती ही येणाऱ्या युगातल्या सर्व्हायव्हलची गुरुकिल्ली आहे. भौतिकाची समज, आधिभौतिक संदेश, इतिहासाचे ज्ञान, वर्तमानाचे आकलन यातून कल्पनाशक्तीला धुमारे फुटतात आणि नवे शोध, नव्या कलाकृती, नव्या सुरावटी निर्माण होतात. जगण्याची नवी परिमाणे मिळतात, जगण्याचा अर्थ थोडा अजून सुलभ होतो. म्हणून संस्कृतीत कलावंतांचे आणि शास्त्रज्ञांचे महत्व. जर संस्कृती म्हणजेच आपली आयडेंटिटी जपायची असेल तर प्रतिभाशाली लोकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी समाज धुरिणांनी, सामाजिक संस्थांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक ठरते. आता हे प्रतिभावंत कोण ते ठरवायच्या निरपेक्ष फूटपट्ट्या हरवल्या आहेत. त्याचा शोध घ्यायचा आहे. समाज समृद्ध असेल तेव्हाच कलेचे निरोगी संवर्धन होऊ शकते. वरवरची आर्थिक समृद्धी उपयोगाची नाही.

चित्रांमधून, साहित्यामधून, नृत्य संगीतातून, नाट्य-चित्रपटामधून मिळणारा आनंद हा मनात टिकून राहतो. आयुष्यभर सोबत करतो. पण तो कसा घ्यायचा हे व्यक्तिसापेक्ष आहे. सर्व समाज सुजाण रसिक मनाचा होणे ही कविकल्पना/दिवास्वप्न आहे, पण जगण्यात आनंद-रस निर्माण होण्यासाठी कलेचा आस्वाद घेता येणे आवश्यक आहे. मी ज्या शहरात राहतो तिथे समकालीन चित्र-शिल्प कलांना वाहिलेले एकही म्युझियम नाही. कलेचा आस्वाद कसा घ्यावा, हे प्रगत राष्ट्रांमध्ये प्राथमिक इयत्तेपासून मुलांच्या मनावर बिंबवले जाते. त्यांना म्युझियममध्ये शिक्षक घेऊन जातात. तिथे मुलांना रंगछटा, आकार इत्यादींच्या संकल्पनांचे आकलन लहानपणापासून होते. संवेदनांचे, आविष्कारांचे, विचारांचे-उच्चारांचे स्वातंत्र्य जपणे ही निरोगी समाजाची खूण आहे. या गोष्टींचा संकोच होणे सृजनशील कलावंतांसाठी मारक असते. पर्यायाने, वैचारिक झापडे बांधली, अभिव्यक्तीवर बंधने आली तर देशाची प्रगती खुंटते.

कल्पनाशक्तीला आव्हान मिळेल असा वास्तवातला, अतिवास्तवातला प्रश्न घेऊन, निर्मिती करताना, कलावंत सर्व क्षमतेने या आव्हानाला भिडतो. उत्साह असतो, बुद्धीला ताण येतो. कधी उद्वेगही जाणवतो; पण समर्पित होऊन त्यावर काम करत राहणे यातूनच नव्या शक्यता दिसतात. कलेतले कौशल्य हे भाषेतल्या शुद्ध व्याकरणाइतकेच आवश्यक आहे. कौशल्य असायलाच हवे; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा आशय आणि त्यातील सहजता. कलावंताला काय सांगायचंय, याबरोबरच ते किती सफाईदारपणे सांगितलं हे महत्त्वाचं. मग ते वास्तव जगातलं सत्य असेल किंवा नुसत्या आकारांची, रेषांची, रंगछटांची समीकरणे असतील किंवा केवळ फँटसी असेल. खूप संघर्ष असतो निर्मिती करताना आणि त्याच वेळी खऱ्या जगातल्या व्यवहाराला सामोरे जाताना; पण मग नवी पायवाट दिसते, तिचा राजमार्ग बनत जातो आणि कलाकृती घडते. जो समाज प्रतिभावंतांच्या योगक्षेमाबद्दल विचार करतो तिथे प्रगतीच्या अनेक शक्यता तयार होत असतात.

loading image
go to top