'नाममुद्रा' : बार्बाडोसची अष्टावधानी

३० नोव्हेंबर १९६६ रोजी बार्बाडोसला स्वातंत्र्य मिळाले, पण त्यावर अंमल राणी एलिझाबेथचा होता. त्यानंतर आता सुमारे ५४ वर्षांनी बार्बाडोस प्रजासत्ताक होणार आहे.
'नाममुद्रा' : बार्बाडोसची अष्टावधानी
'नाममुद्रा' : बार्बाडोसची अष्टावधानीsakal

कॅरेबियन बेटांवरचा बार्बाडोस हा अवघा ४३२ किलोमीटर क्षेत्रफळाचा देश. तेराव्या शतकापासून तिथे कलिनागो जमातीची वस्ती होती. त्यानंतर स्पॅनिश, पोर्तुगीज अशा विविध समूहांनी इथे राज्य केले. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला या बेटावर ब्रिटिशांनी पाऊल ठेवले आणि मग ती त्यांचीच वसाहत बनली. त्यानंतर अनेक वर्षे ब्रिटिशांची सत्ता असल्याने हा देशही जणू ब्रिटिश बनून गेला. ३० नोव्हेंबर १९६६ रोजी बार्बाडोसला स्वातंत्र्य मिळाले, पण त्यावर अंमल राणी एलिझाबेथचा होता. त्यानंतर आता सुमारे ५४ वर्षांनी बार्बाडोस प्रजासत्ताक होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे डेम सॅंड्रा मॅसन या पहिल्या अध्यक्ष होणार आहेत. येत्या ३० नोव्हेंबरला त्या देशाची सूत्रे स्वीकारतील. सॅंड्रा प्रुनेला मॅसन या देशाच्या पहिल्या महिला अध्यक्षही ठरणार आहेत.

मॅसन यांनी बार्बाडोसमध्ये अनेक बाबतीत पहिल्या असण्याचा जणू विक्रमच केला आहे. त्यामुळेच कदाचित त्यांनी याही पदावर पहिला हक्क सांगितला आहे. त्यांचा जन्म १९४९चा. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ शिक्षिकेचे काम केले. नंतर मग बार्कलेस बॅंकेत कारकून पदावर काम सुरू केले. तिथे त्यांना उपजत हुशारीमुळे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. नोकरी सुरू असतानाच त्यांनी वेस्ट इंडीज विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्या सुमारास, म्हणजे १९७३ मध्ये त्या या विद्यापीठातील पहिल्या कायदा पदवीधर महिला ठरल्या होत्या. नंतर त्या पहिल्या महिला अॅटर्नी झाल्या. त्याच वर्षी त्यांना बार्बाडोस बार असोसिएशनचे सदस्यत्व देण्यात आले. तिथेही त्या पहिल्या महिला सदस्य ठरल्या. त्यांना बालक आणि कुटुंब न्यायालयाच्या मॅजिस्ट्रेट पदाची जबाबदारी देण्यात आली. तिथेच त्या थांबल्या नाहीत. त्यांनी लंडनमधून न्यायिक प्रशासनाचा अभ्यास केला. संयुक्त राष्ट्रांच्या बाल अधिकार समितीचे काम त्यांनी अनेक वर्षे पाहिले. काही काळ या समितीच्या त्या उपाध्यक्षही होत्या.

सँड्रा मॅसन यांची व्हेनेझुएलाच्या राजदूत पदावर नियुक्ती करण्यात आली होती. नंतर चिली, कोलंबिया, ब्राझील अशा अनेक देशांमध्ये त्यांनी राजदूत पदावर काम केले. तेथून परतल्यावर त्यांची बार्बोडोसच्या मुख्य मॅजिस्ट्रेटपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्या सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार झाल्या. त्यांच्या यशाची मालिका पुढे सुरूच राहिली. २००८ मध्ये राणीने त्यांची बार्बाडोसच्या क्वीन्स कौन्सिलमध्ये नियुक्ती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या अपिलीय न्यायाधीश पदाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला. त्या पदापर्यंत पोचणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. २०१२ मध्ये त्यांनी तीन दिवसांसाठी बार्बाडोसच्या गव्हर्नर जनरलपदाचा कार्यभार सांभाळला होता. २०१७ मध्ये बार्बोडोसच्या आठव्या गव्हर्नर जनरलही त्या बनल्या. गेल्या वर्षी बार्बाडोसचे पंतप्रधान मिया मोटेली यांनी देश प्रजासत्ताक होणार असल्याची घोषणा केली. राणी एलिझाबेथची राजवट संपुष्टात येईल आणि देश स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून ओळखला जाईल. या प्रजासत्तकाच्या पहिल्या अध्यक्ष सँड्रा मॅसन होणार आहेत. तेथील पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहांनी मॅसन यांना पाठिंबा दिला आहे. अनेक संस्थांनी सॅंड्रा मॅसन यांना प्रभावशाली, बलशाली महिला म्हणून गौरविले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. भारताचे आणि बार्बोडोसचे संबंध १९६६ पासूनच सौहार्दाचे आहेत. २०१२ मध्ये संयुक्त राष्र्टांच्या सुरक्षा समितीत सदस्यत्वासाठी बार्बोडोसने भारताला पाठिंबा दिला होता. नव्या नेतृत्वाखाली हे संबंध वृद्धिंगत होतील, अशी अपेक्षा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com