झारखंड : भाजप सत्ता राखणार?

अरविंद रेणापूरकर
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्र, हरियाना विधानसभा निवडणुकीनंतर आता झारखंड विधानसभेचे वेध लागले आहेत. झारखंड विधानभेची निवडणूक पाच टप्प्यांत होत असून, त्याचा निकाल २३ डिसेंबरला लागणार आहे. राज्यातील ८१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महाराष्ट्र, हरियाना विधानसभा निवडणुकीनंतर आता झारखंड विधानसभेचे वेध लागले आहेत. झारखंड विधानभेची निवडणूक पाच टप्प्यांत होत असून, त्याचा निकाल २३ डिसेंबरला लागणार आहे. राज्यातील ८१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

विविध पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर होत असून, प्रमुख पक्षांकडून प्रचारकही निश्‍चित केले जात आहेत. गेल्या वेळी भाजप आणि ऑल झारखंड स्टुडंट युनियन आघाडीने ४१ जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. त्या वेळी अन्य पक्षांच्या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करून रघुवर दास यांचे सरकार सत्तारूढ झाले. 

उत्तर प्रदेश, बिहारसारखी राजकीयदृष्ट्या जागरूक राज्ये शेजारी असतानाही झारखंड आता पूर्वीइतका सक्रिय राहिला नाही. झारखंडची निर्मिती झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य होते. कालांतराने राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षाच्या मदतीने पाय रोवले. म्हणूनच मागच्या वेळी भाजपला सरकार स्थापन करताना ऑल झारखंड स्टुडंट युनियनची (आजसू) मदत घ्यावी लागली. गेल्या वेळी भाजपने ७२ जागा लढल्या आणि त्यापैकी ३७ जागा जिंकल्या होत्या. मित्रपक्षाने ९ जागांवर निवडणूक लढविली आणि पाच जागांवर विजय मिळवला. भाजप आता सलग दुसऱ्यांदा राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कामाला लागला आहे.

असे असले तरी तिकीट वाटपावरून भाजपमध्ये ताणातणी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. भाजप आणि ‘आजसू’ यांच्यात जागावाटपावरून ताणातणी सुरू आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्रतोदला तिकीट नाकारल्याने ते ‘आजसू’त दाखल झाले. झारखंड अस्तित्वात आल्यापासून भाजप आणि आजसू यांच्यात आघाडी आहे. त्यामुळे निवडणुकीत ते स्वबळावर जातात की, तडजोड करत निवडणुकीला सामोरे जातात, हे पाहणे रंजक ठरेल. दुसरीकडे काँग्रेसमध्येदेखील बंडखोरीची शक्‍यता वर्तविली जात आहे. काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, त्यात प्रियांका गांधी यांचे नाव नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. झारखंडमध्ये काँग्रेस हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि राजद यांच्याशी आघाडी करून मैदानात उतरली आहे. झामुमोच्या महाआघाडीतून बाहेर पडल्यानंतर झारखंड विकास मोर्चाचे बाबूलाल मरांडी यांनी झारखंडमधील ८१ जागा लढण्याचा निर्णय घेतला.

झारखंडमध्ये भाजपवर प्रत्येक घटक नाराज असल्याचा विरोधकांचा दावा आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जेडीयूनेदेखील झारखंडमध्ये खाते उघडण्याची तयारी केली आहे. बिहारमध्ये भाजपसमवेत युती असली तरी झारखंडबाबत अद्याप विचार झालेला नाही. एकंदरीत बहुतांश पक्षांत राजकीय गोंधळाचे वातावरण असल्याने विकासाच्या मुद्‌द्‌यावर कोणीही बोलायला तयार नाही. आपल्याकडे निवडणुकीत नेहमीच विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून भावनिक राजकारण केले जाते, त्यास झारखंडदेखील अपवाद राहील, असे वाटत नाही.

झारखंड निवडणूक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jharkhand Vidhansabha election bjp politics