पाकिस्तानात लष्कर किंगमेकर

जतीन देसाई
गुरुवार, 12 जुलै 2018

माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शिक्षा झाल्याने पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी त्यांच्या पक्षाला कमकुवत करण्याचे षडयंत्र यशस्वी ठरले आहे. तेथील निवडणुकीत लष्कराची भूमिका नेहमीच कळीची राहिली आहे. या वेळीही त्याचा प्रत्यय येत आहे.

माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शिक्षा झाल्याने पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी त्यांच्या पक्षाला कमकुवत करण्याचे षडयंत्र यशस्वी ठरले आहे. तेथील निवडणुकीत लष्कराची भूमिका नेहमीच कळीची राहिली आहे. या वेळीही त्याचा प्रत्यय येत आहे.

पा किस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ येत्या शुक्रवारी मायदेशी परतत आहेत. लाहोर विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग(एन)चे हजारो कार्यकर्ते जमणार आहेत. दुसरीकडे त्यांना आणि त्यांची मुलगी मरियम यांना अटक करण्यासाठी पोलिस आणि इतर यंत्रणा सज्ज असतील. या घडामोडींमुळे २५ जुलैला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण अत्यंत तणावपूर्ण होणार आहे. पाकिस्तानच्या निवडणुकीत लष्कराची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे आणि या वेळचीही निवडणूक त्याला अपवाद नाही. ‘अकाउंटिबिलिटी कोर्ट’ आपल्या विरोधात निकाल देईल, याचा अंदाज शरीफ यांच्यासारख्या हुशार राजकारण्याला आधीच आला होता. त्यांच्या पत्नीवर लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते आणि मरियम निवडणूक प्रचार सोडून लंडनमध्ये आहेत. न्यायालयाने शरीफ, मरियम आणि जावई सफदर यांना दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
आज शरीफ यांच्या विरोधात लष्कर जी खेळी करत आहे, ती ८० आणि ९० च्या दशकात लष्कराने बेनझीर भुट्टो आणि त्यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी(पीपीपी)च्या विरोधात केली होती. बेनझीर यांच्या प्रचंड लोकप्रियतेची लष्कराला आणि ‘आयएसआय’ला भीती होती. आपली पकड ढिली होऊ नये, यासाठी लष्कराने प्रयत्न केले. तेव्हा लष्कराने शरीफ यांचा प्यादे म्हणून वापर केला. शरीफ यांनी आधी लष्कराला ज्या स्वरूपाची मदत केली, जवळपास तशीच मदत आता माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तेहरिक-ए इन्साफ(पीटीआय)चे सर्वेसर्वा इम्रान खान करीत आहेत. त्यांना लष्कराचे पाठबळ आहे, ही बाब लपून राहिलेली नाही.  एकेकाळी लष्कराला मदत करणारे शरीफ अनुभवातून शिकले. लोकशाही वाचविण्यासाठी तुरुंगात जाण्याकरिता आपण पाकिस्तात परतत आहोत, असे त्यांनी लंडनमध्ये सांगितले. ते लढाऊ आहेत. तुरुंग त्यांच्यासाठी नवीन नाही. त्यांना तुरुंगवासाचा अनुभव असला तरी मरियमसाठी हा अनुभव कठीण असणार. मरियम यांना शरीफ आपली राजकीय वारसदार मानत असल्याने तिलाही आता तुरुंगाचा अनुभव घ्यावा लागेल. शरीफ १९९९ नंतर उघडपणे लष्कराच्या विरोधात बोलत असतात. काही महिन्यांपूर्वी ‘द डॉन’ या इंग्रजी दैनिकाच्या सिरिल आल्मेडा या पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यावरून पाकिस्तानात वाद निर्माण झाला. तेव्हा शरीफ यांनी आपण जे सांगितले ती वस्तुस्थिती असल्याचा पुनरुच्चार केला. ‘द डॉन’ हे उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष विचारांना वाहिलेले वर्तमानपत्र आहे. लष्कराच्या विरोधातदेखील त्यात बातम्या, लेख असतात. ‘द डॉन’ अडचणीचे ठरत असल्याने पाकिस्तानात अनेक ठिकाणी त्याचे वितरणच होऊ दिले जात नाही. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानात खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष लोकशाही यावी याबद्दल लिहिणाऱ्या पत्रकारांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

न्यायसंस्थेची मोठ्या प्रमाणात लष्कराला मदत होत आहे. किंबहुना न्यायसंस्थेच्या मदतीने लष्कर शरीफ आणि त्यांच्या पक्षाला कमकुवत करत आहे. ‘पनामा पेपर्स’नंतर सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. नंतर त्यांना पक्षाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्या संपूर्ण खटल्यात शरीफ यांच्यावर अन्यायच झाला. अशा स्वरूपाच्या घटना घडत असल्या तरी शरीफ यांनी आपला लढाऊ बाणा सोडलेला नाही. पाकिस्तानच्या राजकारणात पंजाब प्रांत निर्णायक भूमिका बजावतो. २०१३ च्या निवडणुकीत पंजाबच्या ताकदीवर शरीफ यांचा पक्ष सत्तेत आला. इतर तीन प्रांत म्हणजे सिंध, खैबर-पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानात त्यांचे अस्तित्व किरकोळ आहे. २०१३ च्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाने जमात-ए-इस्लामी आणि काही धार्मिक पक्षांच्या मदतीने खैबर-पख्तुनख्वामध्ये सरकार बनविले होते.

बेनझीर भुट्टोनंतर ‘पीपीपी’ प्रामुख्याने सिंध आणि दक्षिण पंजाबपुरता मर्यादित झाला आहे. बेनझीर यांचे पुत्र बिलावल हे मुख्यत्वे सिंध आणि दक्षिण पंजाबात प्रचार करत आहेत. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सिंधमध्ये ‘पीपीपी’चे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, याबद्दल कोणाच्याही मनात संदेह नाही. बलुचिस्तानचा पाकिस्तानच्या राजकारणावर फारसा परिणाम होत नाही. खैबर-पख्तुनख्वा प्रांतात ‘पीटीआय’ची ‘तालिबान’ला आणि ‘तालिबान’ची ‘पीटीआय’ला मदत होत आली आहे. बाहेरून धर्मनिरपेक्ष दिसणारे इम्रान खान धर्माच्या आधारावर राजकारण करतात, ही वस्तुस्थिती आहे. खान अब्दुल गफार खान ‘सरहद्द गांधी’ यांची परंपरा पुढे चालवणारी अवामी नॅशनल पार्टी या भागात इम्रान आणि ‘तालिबान’च्या विरोधात संघर्ष करत आहे.

नवाज शरीफ २०१३ मध्ये पंतप्रधान झाले, तेव्हापासूनच त्यांच्या विरोधात लष्कराने इम्रान आणि ताहिर उल काद्री या सुन्नी धर्मगुरूच्या मदतीने मोर्चेबांधणी सुरू केली. २०१४ मध्ये ‘पीटीआय’ आणि ताहिर यांनी स्वतंत्ररीत्या, मात्र एकाच वेळी इस्लामाबादमध्ये धरणे धरले. त्यांना त्यात लष्कराने उघडपणे मदत केली होती. शरीफ यांना पदच्युत करून लष्कर सत्ता काबीज करते की काय, अशी परिस्थिती तेव्हा निर्माण झाली. परंतु, आता लष्कराला सरळ सत्ता काबीज करणे सोपे नाही. आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांच्या विरोधात आहे. लष्कराने सत्ता हाती घेतली तर अमेरिका काय करेल, हे सांगता येत नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या बाजूने उभे राहणाऱ्याला पंतप्रधान करणे लष्कराला अधिक सोपे आहे.

इम्रान खान यांच्याबद्दल तरुणांमध्ये आकर्षण आहे. त्यांनीही पंजाबात अधिक लक्ष घातले आहे. दुसरीकडे चौधरी निसार खानसारख्या प्रभावी नेत्यांनी शरीफ यांचा पक्ष सोडून स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचे ठरविले आहे. पंजाबात पीएमएल(एन)ला निवडणुकीच्या आधीच कमकुवत करण्याचे षडयंत्र यशस्वी ठरले आहे. शरीफ यांचे धाकटे भाऊ आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री शाहबाज शरीफ हे आता नवाज यांच्या गैरहजेरीत निवडणूक प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहेत. नवाज आणि मरियम परत आल्यामुळे सहानुभूतीची लाट निर्माण होईल, अशी त्यांना आशा आहे. इम्रान आणि त्यांच्या समर्थकांना वाटते की शरीफ यांच्या विरोधात न्यायालयाने दिलेल्या निकालांमुळे ‘पीएमएल’चे कार्यकर्ते निराश झाले आहेत आणि त्याचा त्यांच्या निवडणूक प्रचारावर परिणाम होईल. नवाज आणि शहाबाज यांना याची जाणीव आहे आणि म्हणूनच ते शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करतील. शरीफ हे लढाऊ आणि जनसामान्यांचे नेते आहेत. या पूर्वीही त्यांनी कठीण परिस्थितीला तोंड दिले आहे. पुढचे दिवस सोपे नसणार याची जाणीव असतानाही ते पाकिस्तानात परतत आहेत. मागच्या वेळी त्यांना सौदी अरेबियाने मदत केली होती. या वेळीही सौदी अरेबिया व इतर काही देश त्यांच्या मदतीसाठी उभे राहतील. प्रचंड दबावाखाली होणारी ही निवडणूक पाकिस्तानच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. पाकिस्तानचे पुढचे धोरण काय असेल? इम्रान खान पंतप्रधान झाल्यास त्याचे भारत-पाकिस्तान संबंधांवर काय परिणाम होतील, हा मुद्दा लक्षणीय ठरेल.

Web Title: journalist jatin desai write pakistan army kingmaker article in editorial