सामाजिक बांधीलकी  मानणारे कायदेपंडित

डॉ. स्नेहल फडणवीस
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

देशाचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून न्या. शरद अरविंद बोबडे यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य यांची ओळख करून देणारा लेख.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतलेले आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून आपल्या वकिली व्यवसायात पदार्पण करणारे न्या. शरद अरविंद बोबडे यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदाची शपथ घेतली आणि असंख्य नागपूरकरांचा ऊर अभिमानाने भरून आला. त्यांच्या रूपाने मराठी माणूस या पदावर पोहोचला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

नागपूरच्या विधी क्षेत्रातील इतिहासात हा सर्वोच्च मानाचा दुसरा तुरा रोवला गेला. यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपद भूषविले होते. न्या. शरद  अरविंद बोबडे यांचा जन्म २६ एप्रिल १९५६ रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे वडील ॲड. अरविंद बोबडे यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे महाअधिवक्ता हे पद भूषविले होते. यामुळे वकिली व्यवसायात येण्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. नागपूरच्या एस. एफ. एस. कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून एल. एल. बी.ची डिग्री घेतली आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली व्यवसायाला सुरुवात केली.

परिश्रम नि जिद्द
सामाजिक बांधीलकीची जाणीव, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबद्दल आस्था, सहकारी वकिलांच्या समस्या सोडविण्यासाठी धडपड, अशा एक ना अनेक गोष्टींसाठी ते ओळखले जाऊ लागले. १९९८ मध्ये ते वरिष्ठ अधिवक्ता झाले आणि २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तिपदावर विराजमान झाले. १२ वर्षे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्य केल्यानंतर सन २०१२ मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तिपदी त्यांची नियुक्ती झाली. २०१३ मध्ये त्यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ ग्रहण केली. आज ते सर्वोच्च न्यायालयाचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून विधी क्षेत्रातील सर्वोच्च पदावर विराजमान झाले. कठोर परिश्रम आणि जिद्द, यामुळे व्यक्ती सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले. युवा वकिलांसाठी आणि वकिली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते निश्‍चितच ‘रोल मॉडेल’ आहेत.

महत्त्वाचे निवाडे
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी बरीच वर्षे वकिली केली. यादरम्यान वंचित, शोषित शेतकऱ्यांसाठी शरद बोबडे यांनी केलेले काम कोणी विसरू शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांवर ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील गेल्या आठ वर्षांतील कार्यकाळातसुद्धा न्या. शरद बोबडे यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले आहेत. अनेक संवेदनशील समस्या हाताळताना त्यांच्यातले कौशल्य आणि कायद्याविषयीचे सखोल ज्ञान, याची निश्‍चितच जाणीव होते. 

फटाक्‍यांमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणावर आधारित याचिका, आधार कार्डावर देण्यात आलेला निकाल आणि नुकत्याच झालेल्या अयोध्येतील श्री रामजन्मभूमी निकालातदेखील न्या. बोबडे यांचा लक्षणीय सहभाग होता. न्या. शरद बोबडे हे सदैव हसतमुख असलेले व्यक्तिमत्त्व आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात काम करीत असताना अतिशय मनममिळाऊ स्वभाव आणि साध्या राहणीमानामुळे ते चटकन सगळ्यांना आपलेसे करीत. ज्युनिअर-सीनिअर असा कोणताही भेदभाव त्यांच्या वागण्यात नसे. त्यांचे हे वैशिष्ट्य त्यांच्या सहकाऱ्यांना नेहमीच प्रभावित करीत असे. आज देशापुढे अनेक संवेदनशील समस्या आहेत. अशा वेळेला न्या. शरद बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती होण्याला वेगळे महत्त्व आहे. न्यायसंस्थेची स्वायत्तता राखणे, लोकांचा या संस्थेवरील विश्‍वास दृढ करणे, ही आव्हाने मोठी आहेत. बोबडे हे आव्हान लीलया पेलतील आणि त्यांच्या विद्वत्तेची छापही सोडतील, यात शंका नाही. आज आपण बघतो, की अनेक मुले शिक्षणासाठी, नोकरीसाठी घर, आई, वडील, देश हे सगळे सोडून परदेशात जातात. तिथेच आपल्याला करिअर करता येईल, अशी त्यांची भावना झाली आहे. त्या सगळ्या मुलांना सांगावसे वाटते की कुशाग्र बुद्धी, ध्येय आणि परिश्रमाची जोड असली, की भारतात राहूनही मोठ्यात मोठे यश संपादन करता येते. भारतातही कर्तृत्व गाजविण्याच्या भरपूर संधी आहेत. न्या. शरद बोबडे हे याचे सार्थ उदाहरण आहे.

(लेखिका नागपूर येथील गोविंदराव वंजारी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Justice Sharad Bobde