कबाली! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938 आषाढ कृष्ण षष्ठी. 

आजचा वार : सोमवार...घातवार ! 

आजचा सुविचार : ऑल द रजनी फॅन्स...! 

 

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938 आषाढ कृष्ण षष्ठी. 

आजचा वार : सोमवार...घातवार ! 

आजचा सुविचार : ऑल द रजनी फॅन्स...! 

 

नमो नम: नमो नम: नमो नम: (105 वेळा लिहिणे.) अवघे जग रविवारी आपापल्या घरी कोंबडीवडे खात होते, तेव्हा मी अक्षरश: एकेका श्‍वासासाठी धापा टाकत होतो. रविवारी सकाळी खरे तर इतका दम कोणाला लागू नये! पण मी बारा हजार फुटांवर, लडाखमध्ये होतो. सोबत ना. रामदासजी आठवले होते. "प्लीज कविता वगैरे नकोत हां, इथे आधीच श्‍वास कोंडलाय!‘ असा इशारा त्यांना आधीच दिला होता... तिथून विमानाने निघालो ते थेट बारामतीत येऊन पोचलो. कोपर्डीला जायचे होते. तसा गेलोही, पण मुद्दा तो नाही... मुद्दा वेगळाच आहे! 

 

लडाखहून (व्हाया दिल्ली) बारामतीला जाताना विमानात हुश्‍श करून बसलो, तेवढ्यात एक जाकिटवाला इसम ताडताड चालत आमच्या दिशेने आला. शेजारच्या सीटवर बसून त्याने दोन्ही पाय दांडपट्ट्यासारखे सपासप बदलले. खिशातून एक सिगारेट काढत उंच उडवून ओठात झेलली. गॉगलची भिंगरी करून पुन्हा डोळ्यांवर बसवली आणि म्हणाला, "येन्न रास्कला!‘‘ 

 

शेजारी बसलेल्या कोणाही इसमाने असे सपासप पाय फिरवले, तर आपण त्याच्या परीघातून दूर व्हावे, ह्यात शहाणपणा आहे. तोंड फुटण्याची शक्‍यता असते. तसेच कोणा अनोळखी माणसाला "रास्कला‘देखील म्हणू नये. त्यानेही तोंड फुटण्याची शक्‍यता असते. 

"विमानात सिगारेट ओढणे गुन्हा आहे. तब्बेतीला वाईट! शिवाय त्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्‍यात येते...,‘‘ मी बजावून सांगितले. 

"मी ती पेटवलेली नाही. नुसती उडवली!,‘‘ त्याने खुलासा केला. खरे होते, सिगारेट पेटलेली नव्हती. बट स्टिल थ्रोइंग सिगारेट ऑल्सो किल्स...असो. 

"गॉगल भिंगरीसारखा फिरवणे ही वाईट सवय आहे...तो मवालीपणा आहे. मी एकदा कॉलेजात असताना असा गॉगल उडवला होता,‘‘ मी म्हणालो. हे सांगताना आमचा आवाज आम्ही उडवलेल्या गॉगलसारखाच पडला होता. 

"आपलं नाव कळेल का?,‘‘ मी नम्रतेने विचारले. मी कधीच नम्रता सोडत नाही. नागपूरचा असलो म्हणून काय झाले? 

"येन्न रास्कला, यू डोंट नो माय नेम?,‘‘ दाढी खाजवत आश्‍चर्याने त्याने विचारले आणि अस्वस्थपणे उजव्या गुडघ्यावर विसावलेला डावा पाय तलवारीसारखा उपसून विजेच्या वेगाने उजवा पाय डाव्या गुडघ्यावर ठेवला. मी डोळे घट्ट मिटून घेतले. 

"तुमचा पाय माझ्या गुडघ्यावर चुकून आला आहे! कृपा करून काढता काऽऽऽ?,‘‘ माझा आवाज मराठवाड्यातल्या विहिरीतून यावा, तसा आल्यासारखे मला वाटले. 

"ओह, सॉरी! नेम चुकला!,‘‘ तो म्हणाला. 

"माय नेम? कबाली डाऽऽऽ...,‘‘ तो म्हणाला. म्हणताना त्याने उजव्या हाताचा पंजा अंगभर वीज खेळावी, तसा फडफडवला. मी सावरून बसलो. 

"तुम्हाला कोणी त्रास देत असेल, तर जस्ट टेल मी!! आय विल सेटल हिम विदिन सेकंड्‌स!,‘‘ दिलदारपणाने त्याने दिलासा दिला. मला कुणाचा त्रास आहे? मी अजातशत्रू माणूस आहे, तरीही कुठेतरी मनाला बरे वाटले, हे मात्र खरे. 

"एका माणसाचा पुढे त्रास होण्याची शक्‍यता आहे. त्याचा बंदोबस्त कराल का कबालीसाहेब?,‘‘ मी खडा टाकला. 

"जस्ट टेल मी द नेम!..किंवा माझं नाव त्याला सांगा!!,‘‘ तो इसम आत्मविश्‍वासाने म्हणाला. 

"नारायणदादा राणे म्हणून आहेत. त्यांचं काही...,‘‘ मी त्याच्या कानात कामगिरी सांगितली. 

"ओह, राणेदादा? माई ग्वाड्‌ड...,‘‘ असे म्हणून तो प्राणांतिक दचकला आणि सपासप दोन्ही पाय हवेत फिरवत उभाच राहिला. दुसऱ्या क्षणाला तो चक्‍क गायब झाला होता. 

मनात आले, आमचे राणेदादा हे खरे कबाली!! 

Web Title: kabali