दस नंबरी कलावंत!

कादर खान
कादर खान

‘जिंदगी में आदमी दोइच टाइम इतना जल्दी भागता है, ऑलम्पिक का रेस हो, या पुलिस का केस हो...’’ मनमोहन देसाई यांच्या सुपरडुपर हिट ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपटातला हा बंबैय्या भाषेतला संवाद ऐकून थिएटरात टाळ्या आणि शिट्यांचा दणदणाट होई. उर्दू जबानमध्ये आणि तालेवार संवादांमध्ये अडकलेल्या हिंदी चित्रपटातील व्यक्‍तिरेखांच्या जिभेवर ‘पब्लिक’ची भाषा चढवणाऱ्या कादर खान यांच्या दमदार लेखणीतून ‘अमर अकबर अँथनी’चे लचकदार संवाद आले होते. अवघे जग ३१ डिसेंबरची रात्र जल्लोषात साजरी करत असतानाच, दूर कॅनडामध्ये कादर खान यांनी वार्धक्‍याने जर्जर झालेला देह ठेवला. गेली काही वर्षे दुर्धर आजाराने ग्रासलेल्या कादर खान यांना वार्धक्‍यानेही जरा लवकरच गाठले म्हणायचे.

पेशाने सिव्हिल इंजिनिअरची प्राध्यापकी करत त्यांना करिअर घडवता आले असते. पण लेखणी आणि अभिनयाचे वारे अंगावरून गेले की बाकी सारे फोल वाटू लागते, तद्वत कादर खान यांच्याबाबत घडले. मूळच्या काबूल-कंदहारच्या पश्‍तुन खानदानातल्या कादर खान यांनी अल्पावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आदराचे स्थान कमावले. खानसाहेबांची लेखणी, त्यातून येणारे फिल्मी ‘डायलॉग्ज’ पिटातल्या प्रेक्षकासाठी प्राणवायूसारखे होते.

मनमोहन देसाई यांच्या ‘रोटी’ या अतोनात गाजलेल्या चित्रपटाचे संवादही कादर खान यांनीच लिहिलेले होते. त्यांच्या लेखणीवर खुश होऊन मनमोहन देसाईंनी त्या काळी त्यांना सव्वा लाख रुपये इतके प्रचंड मानधन दिले होते. दिलीपकुमारसारख्या दिग्गज नटसम्राटानेच प्रारंभी कादर खान यांच्यातील कलावंत हेरला होता. पटकथा आणि संवाद लेखनावर त्यांची हुकूमत होतीच, पण पुढे छोट्या-मोठ्या भूमिका करत त्यांनी अभिनयातही आपली शैली प्रस्थापित केली. भाषेचा उत्तम जाणकार असलेल्या या सज्जन गृहस्थाने खलनायकी भूमिका रंगवल्याच; पण कॉमेडीतही त्यांचा हात धरणारा क्‍वचितच आढळे. ‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’ या चित्रपटात त्यांनी केलेली कॉमेडी धमाल अक्षरश: दस नंबरी होती. शरीराचा एखादा अवयव जायबंदी अथवा दुखरा झाला, तरच त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. त्याच नियमानुसार कादर खान यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीलाही आपण काय गमावले, हे आता कळेल. कादर खान हे या चंदेरी दुनियेचा एक अविभाज्य अवयवच होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com