कलगीतुरा! (ढिंग टांग!)

कलगीतुरा! (ढिंग टांग!)
कलगीतुरा! (ढिंग टांग!)

आमचे एकेकाळचे मित्र आणि सांप्रत काळचे दुश्‍मन श्रीमान नाना फडणवीस यांसी, कोपरापासून नमस्कार! गेले काही दिवस आपण सभांमध्ये तोडत असलेले तारे बघत आहोत. हेच तारे तेवीस तारखेला तुमच्या डोळ्यांसमोर चमकणार आहेत, हे बरीक ध्यानी ठेवावे. हल्ली फार बोलायला लागला आहात असे दिसते. आमच्या घरी कोळंबी आणि पापलेट खायला आलेले असताना किती कमी बोलत होता, तेव्हा हाता-तोंडाशी गाठ होती म्हणून गप्प होता की बाजूच्या खुर्चीत पत्नी बसल्यामुळे बोलती बंद होती? सभांमध्ये तुम्ही आमच्याविरोधात वाट्टेल ते बरळता आहात. आमच्या नादाला लागले ते संपले, हा इतिहास विसरू नका.

तुम्ही आणि तुमचे ते दिल्लीत बसलेले मोदीजी एक नंबरचे थापाडे आहात. आम्हीही पंचवीस वर्षं तुमच्या थापांना बळी पडलो; पण आता चूक सुधारली आहे. मर्द मावळ्याशी पंगा घेतल्यावर काय होते, हे तुम्हाला आता कळेलच. पंचवीस वर्षं दोस्ती बघितलीत, आता पुढली पंचवीस वर्षे आमची दुश्‍मनी बघा. सर्कशीतला वाघ चाबकाच्या फटकाऱ्यानिशी आगीच्या रिंगणातून उड्या मारून टाळ्या वसूल करतो; पण शेवटी तो वाघ असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्या पिंजऱ्यात जाऊन जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा करणे सोपे आहे; पण प्रत्यक्षात वेगळे काही घडेल!! असो.

होय, नोटाबंदीचा आम्हाला फटका बसला!! नोटा...नोटा...नोटा...बंदीचं नाव घेतलं तरी आमच्या अंगाची आग होते. आमचा मर्द मावळा तलवारीला धार लावायचे सोडून एटीएमच्या रांगेत उभा राहिला, हा फटका नाही तर काय लॉटरी म्हणायची? नॉन्सेन्स.

"एकमेकांवर टीका करता तर सत्तेत कशाला राहता?' असे बारामतीकरकाकांनी फोन करून विचारले आहे. त्यांना म्हटले, की आता तेवीस-चोवीस तारखेला आमच्या विजयसभेला तुम्हीही या!! तुमचे मित्र मोदीजीं यांनाही आम्ही बोलावलं आहे. बारामतीकरकाकांना रीतसर बोलावणं करावं की नाही, ह्यावर आमचा विचार चालू आहे. निर्णय झाला की कळवीन; पण तुम्हाला बोलावणार नाही. तुम्ही मैदानाच्या कोपऱ्यात उभे राहून आमचा सोहळा बघावा आणि स्वत:च्या पैशाने वडापाव खावा!! बाकी नंतर बघूच काय करायचं ते!! इतकं होऊनही अजून आपलाच. उधोजी.
* * *

प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, कसे आहात? मजेत ना? छान! बारामतीकरकाकांनाही तुम्ही विजयसभेला बोलवावे, असे मलाही वाटते. ते स्वभावाने खूप चांगले आहेत. विरोधात राहून टीका करण्याच्या आविर्भावात ते योग्य सल्लाच कायम देत असतात, असे माझे प्रामाणिक मत आहे. कारण तसे मला आमचे गुरुवर्य श्रीमान नमोजी (नमो नम:) ह्यांनीच बजावून सांगितले आहे. मी विजयसभेला येणार आहे. तुम्ही बोलावले नाही तरी!! नुसता येणार नाही, पेढासुद्धा खाणार आहे. असो.

वाघावरून आठवले. आमचे एक मित्र वाघाचे (लांबून) फोटो काढण्यात वाक्‌बगार आहेत. त्यांना एकदा कचकड्याचा वाघ आमच्या पार्टीतर्फे भेट देण्यात आला. हा वाघ त्यांच्या बंगल्यावर होम डिलिवरी करण्यात आला; पण हा फोटोग्राफर मित्र "खाली वाघ आलाय' म्हणून दुसऱ्या मजल्यावरून उतरता उतरेना!! हाहाहा!! पुन्हा असो.

आम्ही थापाडे आहोत, हे शतप्रतिशत मान्य आहे म्हणूनच आमच्या केंद्रातल्या सरकारने मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक असल्याची थाप मारली आहे!! हे तुमच्या लक्षात आले आहे का? आमच्या बाकी सगळ्या थापा, ही एवढी एक खरी, असे काही आहे का? बघा बुवा!!

नोटाबंदीचा उल्लेख तुम्हाला चांगलाच झोंबला आहे, असे दिसते; पण मी म्हंटो, एकदाचे खरे काय ते सांगून टाका. लोकांना असल्या बातम्यांमध्ये इंटरेस्ट असतो. पारदर्शकतेचे प्रमाणपत्र म्हणून इकॉनॉमिक सर्व्हेचे चोपडे घेऊन फिरता, तर हा हिशेबही घेऊन फिरा. चांगला परिणाम होईल.
बाकी निवडणुकीनंतर मी बंगल्यावर येईनच. एकत्र जेवूच. शेवटी मित्र ते मित्र. काय? आपलाच. नाना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com