कन्हैया कुमार ते गुरमेहर....

कन्हैया कुमार ते गुरमेहर....

कारगिल युद्धातील हुतात्मा कॅप्टन मनदीपसिंग यांची कन्या गुरमेहर कौर हिला अखेर दिल्ली सोडून जाणे भाग पडले आहे. मात्र, त्यामुळेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे( अभाविप)च्या कार्यकर्त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटणे स्वाभाविक असले, तरी केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यापासून या एकेकाळी मवाळ असलेल्या संघटनेच्या सदस्यांमध्ये कशा प्रकारचा ‘जोश’ आला आहे, यावर लख्ख प्रकाश पडला आहे! महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी संघटनांच्या कामकाजातून खरे तर विद्यार्थी संघटनांना लोकशाहीचे धडे मिळायला हवेत; पण त्याऐवजी गेल्या दोन-अडीच वर्षांत विद्वेषाचे वातावरणच उभे राहू पाहत आहे. डाव्या, साम्यवादी, तसेच समाजवादी विचारांच्या विद्यार्थी संघटना आणि उजव्या विचारांच्या संघटना यांच्यातील लढा हा पुरातन असला, तरी एकीकडे लोकशाहीचे डांगोरे पिटणारे सर्वच राजकीय पक्षांचे नेते या संबंधात कशी सोईस्कर भूमिका घेतात आणि त्यामुळे विरोधी विचारांची कशी गळचेपी केली जाते, याचे गुरमेहर हे एक उदाहरण आहे. अर्थात, भाजपची सत्ता आल्यापासून असा प्रकार काही पहिल्यांदाच घडलेला नाही. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कन्हैया कुमारची मुस्कटदाबी करण्याचा झालेला प्रयत्न आणि हैदराबादेत रोहित वेमुला या विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या यामुळे एक विशिष्ट विद्यार्थी संघटना आपल्या विचारांच्या प्रसारासाठी कोणते डाव खेळत आहे, हे जगजाहीर झाले होतेच. आता गुरमेहर प्रकरणामुळे त्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. त्याशिवाय, देशाच्या राजकारणाला नवे वळण देण्याची ताकद असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ज्या पद्धतीने ध्रुवीकरणाचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत, ते बघता गुरमेहर प्रकरण जाणीवपूर्वक पेटते ठेवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशीही शंका घेण्यास जागा निर्माण झाली आहे. 

कारगिल युद्धात गुरमेहरचे वडील मनदीपसिंग यांना हौतात्म्य प्राप्त झाले, तेव्हा ती अवघ्या दोन वर्षांची होती आणि बालपणी तिच्या मनात मुस्लिमांविषयी तिरस्कार होता. पण पुढे ती जशी मोठी होत गेली, तशी ती विचारांनी परिपक्‍व होत गेली. आपल्या वडिलांचा बळी पाकिस्तानने नव्हे, तर ‘युद्धा’ने घेतला आहे, अशी तिची धारणा झाली. त्यामुळेच दिल्लीच्या रामजस महाविद्यालयात ‘जेएनयू’मधील दोन विद्यार्थी उमर खलिद व शेहला रशीद यांना चर्चासत्रासाठी बोलावण्यावरून अभाविप आणि ऑल इंडिया स्टुडंट्‌स असोसिएशन यांच्या सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्यानंतर गुरमेहर ही ठाम भूमिका घेऊन उभी राहिली आणि तिने ‘स्टुडंट्‌स अगेन्स्ट एबीव्हीपी’ अशी चळवळ सोशल मीडियावरून सुरू केली. खरे तर हा विचारांचा लढा आहे आणि त्यास वैचारिक पातळीवर प्रत्युत्तर देण्याचा अभाविपचा अधिकार कोणीही नाकारलेला नाही. मात्र, त्याऐवजी तिच्या नावाने अत्यंत अश्‍लाघ्य असे ‘ट्रोलिंग’ सुरू झाले. तिला बलात्काराच्या धमक्‍या देण्यापर्यंतची मजल काहींनी गाठली. विद्यार्थ्यांमधील लढाईत भाजपची नेतेमंडळीच नव्हे, तर वीरेंद्र सेहवागसारखा क्रिकेटपटू आणि रणदीप हुडा हा सुमार अभिनेताही उतरला! त्यामुळे साऱ्यांचेच हेतू स्पष्ट झाले. किरण रिजीजू या केंद्रीय राज्यमंत्र्याची कुवत आपण समजू शकतो; पण वेंकय्या नायडूंसारखा मुरब्बी नेताही त्यात सामील झाला आणि त्यांनी थेट गुरमेहरच्या देशभक्‍तीबद्दलच शंका व्यक्‍त केली. कारगिल युद्धातील विजयाची टिमकी वाजवतच खरे तर भाजपने १९९९ मधील लोकसभा निवडणुकीत मैदान मारले होते. त्यामुळे त्या युद्धातील हुतात्म्याच्या कन्येचा खरे तर भाजपने गौरवच करायला हवा होता. प्रत्यक्षात भाजपचे म्हैसूरमधील खासदार हे तर गुरमेहरची तुलना थेट दाऊदशी करून मोकळे झाले. उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हे सारे चर्वितचर्वण भाजपला हवे हवेसे वाटणे स्वाभाविक होते. मात्र, त्याचे लोण आता देशभरातही पसरू पाहत आहे, हे पुणे, औरंगाबादमध्ये घडलेल्या प्रकारांमुळे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने गुरमेहरच्या लेडी श्रीराम महाविद्यालयातील विद्यार्थी मात्र तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. तरीही झालेल्या मनस्तापामुळे अखेर तिने दिल्लीतून काढता पाय घेतला आहे.

‘तुम्ही काय बोलायचे, काय वाचायचे, कोणते कपडे घालायचे, ते सारे आम्हीच ठरवणार!’ अशी मनोवृत्ती समाजाच्या एका मोठ्या समूहात गेल्या दोन-अडीच वर्षांत वाढू लागली आहे. या शक्‍तींना सध्या मिळणारा पाठिंबा मोठा आहे. लोकशाही समाजव्यवस्थेतील निकोप विचारांच्या वाढीस हे हानिकारक आहे. तात्कालिक राजकीय लाभापोटी नेतेमंडळी अशा प्रकारांना चिथावणी देत असतील, तर ते अधिकच हानिकारक आहे. गुरमेहर असो की आणखी कोणी, प्रत्येकास आपली ‘मन की बात’ जाहीरपणे सांगण्याचा हक्‍क राज्यघटनेनेच नागरिकांना दिला आहे. त्याऐवजी केली जाणारी ही मुस्कटदाबी ही अत्यंत घातक आहे, एवढेही भान राज्यकर्त्यांना उरलेले नसणे, ही खरे तर लोकशाहीची शोकांतिकाच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com