धारातीर्थी पडलेले जवान डोळ्यांसमोर येतात...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

कारगिल युद्धाला २० वर्षे झाली. एवढा काळ लोटला असला, तरी त्या वेळी धारातीर्थी पडलेले जवान आजही डोळ्यांसमोर येतात. टायगर हिल येथे चढाई करणाऱ्या बटालियनमध्ये मी सहभागी होतो. कारगिलचे युद्ध म्हणजे अगदी कसोटी होती. पाकिस्तानी सैनिक डोंगरांवरून आपल्यावर हल्ला करीत होते. त्या वेळची तेथील परिस्थिती चांगली नव्हती.

कर्नल प्रसाद मिजार
कारगिल युद्धाला २० वर्षे झाली. एवढा काळ लोटला असला, तरी त्या वेळी धारातीर्थी पडलेले जवान आजही डोळ्यांसमोर येतात. टायगर हिल येथे चढाई करणाऱ्या बटालियनमध्ये मी सहभागी होतो. कारगिलचे युद्ध म्हणजे अगदी कसोटी होती. पाकिस्तानी सैनिक डोंगरांवरून आपल्यावर हल्ला करीत होते. त्या वेळची तेथील परिस्थिती चांगली नव्हती. पण, जवानांना चांगले प्रशिक्षण दिले जाते. त्यातून आत्मविश्‍वास दुणावतो. याच आत्मविश्‍वासाच्या जोरावर आम्ही पाकिस्तानबरोबर लढा दिला आणि त्यात यशही मिळाले.

त्या काळात बऱ्याच गोष्टींची कमतरता होती. जवानांची संख्या कमी होती. खाणे-पिणे दैनंदिन गरजांचे प्रश्‍न होते. रस्ते चांगले नव्हते. बऱ्याचदा युद्धसामग्री वा साधनसामग्री पाठीवर घेऊन चालत जावे लागायचे. तसेच काही मोठी घटना घडली, तर जखमींना तत्काळ हवाईमार्गे घेऊन जाण्याची सोय नव्हती. संपर्काची साधने नसायची, दारूगोळा ठेवण्यासाठी जागा नव्हती. आता चित्र बदलले आहे. अत्याधुनिक सामग्रीबरोबरच जवानांना औषधे, दैनंदिन गरजेच्या वस्तू सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. दारूगोळा साठविण्यासाठी जागा आहेत.

पूर्वी गुप्तवार्ता वा माहिती मिळविण्यात खूप अडचणी होत्या. आता इंटेलिजन्स यंत्रणा सक्षम झाली आहे. सीमारेषेवर काही हालचाली झाल्या, तर त्याची माहिती आज तत्काळ मिळू लागली आहे. त्यामुळे कारगिल युद्धावेळी असलेले दडपण आज नाही. 

पण, त्या वेळच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्या काळात भारतीय जनतेने, प्रसारमाध्यमांनी आम्हाला पाठबळ दिले. युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी लाखो हात पुढे आले, याचा आम्हालाही अभिमान वाटतो.
(शब्दांकन - संतोष शाळीग्राम)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kargil War Memories of the war Prasad Mijar