कौन बनेगा राष्ट्रपती?

कौन बनेगा राष्ट्रपती?

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षप्रणीत "राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या सरकारला गेल्या शुक्रवारी तीन वर्षे पूर्ण झाली, नेमक्‍या त्याच दिवशी सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या भोजनास 17 प्रमुख बिगर-भाजप पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावणे, हा निव्वळ योगायोग नव्हता. मात्र, त्यामुळेच "कौन बनेगा राष्ट्रपती?' हा प्रश्‍न ठळकपणे समोर आला आहे. या प्रश्‍नाचे उत्तर विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाच परत एक संधी मिळावी वा शरद पवार हे सर्वसहमतीने राष्ट्रपतीभवनात जावेत, असे अनेक जण आपापल्या मगदूरानुसार देत आहेत. मात्र, त्या दोघांनीही त्याचा स्पष्ट इन्कार केला आहे! तरीही हा प्रश्‍न अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या मालिकेतील प्रश्‍नांपेक्षा पेचदार बनत चालला आहे.

या प्रश्‍नाचे उत्तर अद्याप गुलदस्तात ठेवण्यात अद्याप मोदी आणि अमित शहा यांनी जसे यश मिळवले आहे, त्याचबरोबर या 17 पक्षांच्या होऊ घातलेल्या "महागठबंधना'नेही आतापावेतो आपली झाकली मूठ हीच सव्वालाखाची असल्याचे धोरण स्वीकारले आहे. मात्र, खरा प्रश्‍न हा "कौन बनेगा राष्ट्रपती?' हा नसून, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मोदी-शहा यांच्या मनातील उमेदवार राष्ट्रपती होणार की सोनिया आणि त्यांच्या "महागठबंधना'चा उमेदवार बाजी मारणार, हा आहे. अर्थात, सोनियांच्या भोजनास 17 पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावल्यामुळे भाजपच्या गोटाखालील वाळू पायाखालून सरकणे वगैरे प्रकार मात्र होणे कठीणच होते; कारण विरोधकांच्या या "महागठबंधना'च्या हातातील हुकमाचे पान मात्र अलगदपणे काढून घेण्यात भाजप नेत्यांना यश आले होते! सोनियांनी अगदी नेमका मुहूर्त साधून आयोजित केलेल्या मेजवानीस बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केवळ दांडीच मारली असे नव्हे, तर नंतरच्या 24 तासांतच ते मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांसाठी आयोजित केलेल्या भोजनसमारंभास जातीने उपस्थित राहिले. त्यामुळे खरे तर विरोधकांचेच हातपाय गारठले असणार; कारण नितीश हेच या "महागठबंधना'च्या हातातील हुकमाचा एक्‍का आहे. अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत नितीश यांनाच मोदी यांच्या विरोधात उभे करण्याचे डावपेच विरोधक आखत असतानाच, त्यांनी स्वत: मात्र मोदी यांच्या पंक्‍तीत जाऊन बसणे का केले, हाच प्रश्‍न आता पुढचे काही दिवस चर्चेत राहणार आहे.

अर्थात, नितीश यांच्या या पंक्‍तिप्रपंचामुळे आता लगोलग नितीश यांच्या जनता दल (यू) या पक्षाचे सारे आमदार-खासदार राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मोदी-शहा यांच्या पसंतीच्या उमेदवाराच्या पारड्यात आपली मते टाकणे, असा निष्कर्ष काढता येणार नाही. नितीश यांनी सोनियांच्या पंक्‍तीस बसण्यास नकार दिला असला तरी, त्यांनी त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांना या भोजनास आवर्जून पाठवले होतेच! याचाच अर्थ आपले सारे पत्ते दाखवण्यास सध्या तरी कोणीच तयार नाही. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुदत 26 जुलै रोजी संपत असून, त्यापूर्वी नव्या राष्ट्रपतीची निवड होणे आवश्‍यक आहे.

भावी राष्ट्रपती हा सर्वसहमतीचा असावा, असा मुद्दा या वेळी विरोधक पुढे आणत असले तरी, तसे होणे कठीणच आहे. खरे तर आपल्या पसंतीचा उमेदवार राष्ट्रपतीभवनात नेऊन बसवण्यासाठी भाजपप्रणीत रालोआला विरोधकांच्या गोटातील किमान काही कुमक आपल्या छावणीत खेचून घेणे आवश्‍यक असले तरी, ते तितकेसे कठीण असल्याचे चित्र दिसत नाही. भ्रष्टाचाराचे नानाविध आरोपांचे तसेच न्यायालयीन खटल्यांचे सावट असलेला तमिळनाडूनील सत्ताधारी अण्णा द्रमुक तसेच तेलंगणातील सत्ताधारी चंद्रशेखर राव हे ती कुमक मोदी-शहा यांना पुरवण्यास समर्थ आहेत. मात्र, सध्यातरी सगळेच अधांतरी असल्यामुळे यानिमित्ताने होता होईल तेवढी भाजपची कोंडी करावी, अशी रणनीती मग विरोधक आखत असतील तर त्यात नवल ते काहीच नाही. मोदी सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीचा मुहूर्त साधून सोनिया यांनी आयोजित केलेल्या भोजनामागील प्रयोजन नेमके तेच होते. शिवाय, या निमित्ताने भाजप विरोधात महागठबंधन उभे राहिलेच, तर येत्या काही महिन्यांत होऊ घातलेल्या कर्नाटक तसेच गुजरात विधानसभा निवडणुकांत त्याचा लाभ उठवावा, असाही उद्देश त्यामागे असणारच!

त्यामुळेच मग सध्या रतन टाटा, अमिताभ बच्चन अशा काही नावांवरून पतंगबाजी सुरू आहे! अर्थात, मोदी आणि शहा यांनी योगी आदित्यनाथ यांच्या हाती उत्तर प्रदेशची सूत्रे देऊन जो काही जबर धक्‍का सर्वांनाच दिला, त्याहीपेक्षा मोठा "440 व्होल्ट्‌सचा शॉक' द्रौपदी मुर्मू हे नाव आपल्या पोतडीतून बाहेर काढून ते विरोधकांना देऊ शकतात. श्रीमती मुर्मू या सध्या झारखंडच्या राज्यपाल असून, बिजू जनता दल आणि भाजप यांच्या संयुक्‍त राजवटीत त्यांनी ओडिशात मंत्रिपदही भूषवलेले आहे. त्यांच्या हाती राष्ट्रपतीभवनाच्या चाव्या देऊन मोदी एका आदिवासी महिलेला देशातील सर्वोच्च पदाचा सन्मान देऊ शकतात. अर्थात, घटिकापात्र आता जवळजवळ भरतच आले आहे! त्यामुळे येत्या काही दिवसांतच "कौन बनेगा राष्ट्रपती' या प्रश्‍नाचे उत्तर मोदी हे आपल्या समोरील कॉम्प्युटरमधून बाहेर काढतील आणि अनेकांच्या मनातील मांडे हे मनातच राहतील, असे दिसत आहे. तोपर्यंत तरी प्रत्येकाला या लाखमोलाच्या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याची संधी आहेच. ती दवडा कशाला?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com