स्वप्नवत खेळी (मर्म)

kedar jadhav
kedar jadhav

हातात आलेली संधी साधली, तर त्याचे सोने होते. कुठलाही खेळाडू मैदानात उतरतो, तेव्हा ‘आता नाही, तर परत कधी नाही’ हाच विचार त्याच्या मनात असतो. पुण्याचा क्रिकेटपटू केदार जाधव हाही याला अपवाद नाही. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत अनेक सामने गाजवल्यानंतरही राष्ट्रीय संघातील त्याचे स्थान निश्‍चित नाही. पण म्हणून केदारने प्रयत्न सोडले नाहीत. यष्टिरक्षण करण्याची जबाबदारी आली, तेव्हा ती पार पाडली. गोलंदाजी करण्याची वेळ आली, तेव्हाही त्याने कर्णधाराच्या हाकेला साद दिली. फलंदाजीची संधी मात्र तो साधू शकत नव्हता. अखेर, घरच्या मैदानावर म्हणजे पुण्यातच इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला ही संधी चालून आली. कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्लेल्या इंग्लंडने पहिल्याच सामन्यात भारतासमोर ३५० धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर साठीतच त्यांनी चार फलंदाज बाद केले. अशा नाजूक परिस्थितीत केदार मैदानात उतरला. समोर कर्णधार विराट कोहली ठामपणे उभा होता. गहुंजे मैदानाच्या खेळपट्टीवर चेंडू सहज बॅटवर येत होता. गोलंदाजांना साथ मिळत नव्हती. पण आधीच्या फलंदाजांनी चुका केल्या.

केदारने मात्र त्या टाळल्या. सुरवातीला कर्णधाराला साथ दिली आणि नंतर एक पाऊल पुढे टाकून तो त्याच्याही पुढे निघून गेला. शतक विराटचेही झाले. पण, केदारच्या शतकाचे मोल वेगळेच होते. अर्थात, तंदुरुस्तीच्या आघाडीवर तो कमी पडला. शतकानंतर त्याची दमछाक झाली, पायाचा स्नायूही दुखावला. निर्णायक क्षणी संघाला गरज असताना एका जिगरबाज खेळाडूसाठी अशा सर्व गोष्टी गौण ठरतात. दुखापत विसरून त्याने खेळावर लक्ष केंद्रित केले. बघता बघता अशक्‍यप्राय असणारा विजय भारताच्या आवाक्‍यात आला. कोहली, केदार यांच्या खेळीने प्रेरणा घेत हार्दिक पंड्याने चेंडू आणि धावगती यांचे समीकरण साधून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ‘विजय सांघिक असला, तरी त्याचे श्रेय कुणाला एकाला द्यायचे झाले, तर ते केदारलाच द्यावे लागेल’, अशा शब्दांत कोहलीने केदारच्या खेळीचे कौतुक केले. त्याची खेळी तशीच धमाकेदार होती, यात शंकाच नाही. या खेळीने केदारने त्याच्याविषयीच्या अपेक्षा निश्‍चितच उंचावल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com