अग्रलेख : मोदींची नवी टीम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या डावातील संघाचा चेहरामोहरा हा पहिल्या संघापेक्षा पूर्ण वेगळा आहे आणि विशेषत: त्यात अमित शहा यांचा समावेश झाल्यामुळे त्यांचेच वर्चस्व मोदी यांच्यानंतर राहणार, हेही स्पष्ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या डावातील संघाचा चेहरामोहरा हा पहिल्या संघापेक्षा पूर्ण वेगळा आहे आणि विशेषत: त्यात अमित शहा यांचा समावेश झाल्यामुळे त्यांचेच वर्चस्व मोदी यांच्यानंतर राहणार, हेही स्पष्ट आहे.

अ वघ्या चार दशकांपूर्वीपर्यंत देशात कुठेही फारसा राजकीय प्रभाव नसताना भिंतीवर ‘जनसंघा’च्या पणत्या रंगविण्याचे काम करण्यात इतिकर्तव्यता मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुशीतून तयार झालेले नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी यांनी आज मात्र संपूर्ण देशावर कसे वर्चस्व प्रस्थापित केले आहे, त्याचेच दर्शन या ‘मोदी टीम’च्या गुरुवारी झालेल्या दिमाखदार शपथविधी सोहळ्यात घडले. एकविसावे शतक उजाडेपावेतो ‘अटल-अडवानी’ ही भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांची जोडी पक्षावर अधिराज्य गाजवत असे. आता ती त्यांची जागा मोदी-शहा यांनी घेतली आहे. मोदी यांच्या अथक प्रचाराला शहा यांनी संघटनकौशल्याची जोड दिली. तळाच्या शेवटच्या पातळीपर्यंत ‘पन्नाप्रमुख’ नावाने संघटन उभे केले आणि त्या बळावर ते सत्तेचे एक अविभाज्य मोहरे बनले आहेत. मात्र, त्यामुळेच त्यांच्याइतक्‍या तडफेने आणि कौशल्याने पक्षाध्यक्षपद कोण सांभाळणार, असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. अर्थात गृह खाते ते आपले सारे पूर्वग्रह बाजूस सारून हाताळतील, अशी आशा आहे. मोदी यांनी आपला दुसरा संघ निवडताना अनेक सुखद धक्‍के दिले आहेत. सर्वांत मोठा धक्‍का मोदी यांच्या पहिल्या पर्वात परराष्ट्र सचिव म्हणून काम बघणारे एस. जयशंकर यांनी शपथ घेतली, तेव्हाच बसला होता. परराष्ट्र सचिव म्हणून काम करतानाच त्यांचे सूर हे मोदी यांच्या सुराशी जुळले होते आणि त्याचेच फळ त्यांना परराष्ट्रमंत्री पदाच्या रूपात मिळाले आहे. दुसरा सुखद धक्‍का हा अर्थ खात्यासंदर्भात आहे. अरुण जेटली हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंत्रिमंडळात सामील होणार नाहीत, असे स्पष्ट झाल्यापासूनच अनेक निर्णयांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या खात्याची धुरा कोणाकडे येणार, याबाबत कुतूहल निर्माण झाले होते. आता त्याची धुरा निर्मला सीतारामन यांच्याकडे आली आहे; तर सीतारामन यांचे संरक्षण खाते राजनाथ सिंह यांच्या हाती आले आहे.
मोदी यांची दुसऱ्या संघाची निवड ही अनेकांना धक्‍के तर अनेकांना बुक्‍के देणारी आहे. सर्वांत मोठा धक्‍का हा सुषमा स्वराज यांच्यापासून सुरेश प्रभू यांच्यापर्यंत आणि मेनका गांधी यांच्यापासून जयंत सिन्हा यांच्यापर्यंतच्या अनेकांना मंत्रिमंडळातून वगळण्यामुळे बसला असणार! गेल्या दोन वर्षांत शेतीची हलाखी स्पष्ट दिसत असतानाही डोळ्यांवर कातडे ओढून बसलेले कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची मंत्रिमंडळातून ‘गच्छन्ति’ अपेक्षितच होती. आता शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी ही मध्य प्रदेशात तळाच्या पातळीवरून काम करत नेतेपदी पोचलेले नरेंद्रसिंग तोमर यांच्यावर आली असून, आता शेतीसंदर्भात काही नव्याने विचार करण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. कडव्या हिंदुत्वनिष्ठ उमा भारती यांनाही गंगाशुद्धीकरणाच्या कामात आलेल्या अपयशामुळे या संघात जागा मिळाली नाही. मात्र, एके काळचे शिवसेनेचे खासदार प्रभू यांना पहिल्या पर्वात भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद बहाल केल्यावरही त्यांना या दुसऱ्या संघात स्थान का मिळू शकले नाही, हा प्रश्‍नच आहे. महाराष्ट्रात तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, त्यांची निवड अपेक्षित होती आणि जेटली यांचे खाते कदाचित या ‘सीए’कडे येऊ शकते, अशी चर्चा होती. मंत्रिमंडळातील अनेक नवे चेहरे बघता देशातील विविध राज्ये तसेच जाती-जमाती यांना स्थान देण्याचा केलेला प्रयत्न प्रकर्षाने दिसतो. कन्हैयाकुमार यांच्यासारख्या कडव्या विरोधकास पराभूत करणारे गिरिराज सिंह यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळणे, हे अपरिहार्यच होते. त्याचबरोबर राहुल गांधी यांची अमेठी या ‘होमपीच’वर विकेट घेणाऱ्या स्मृती इराणी यांना या दुसऱ्या पर्वात अधिक मानाचे खाते मिळणे, ही अपेक्षा मनेका गांधी यांचे महिला आणि बालविकास खाते दिल्याने पूर्ण झाली आहे. नितीन गडकरी यांनी गेल्या पाच वर्षांत धडाडीने काम केल्याचे शिफारसपत्र त्यांना दस्तुरखुद्द मोदी यांनीच दिले होते! त्यामुळे त्यांच्याकडील भूपृष्ठ वाहतूक खाते कायम राहिले आहे, तर प्रकाश जावडेकर यांच्यावर पर्यावरण, वने, हवामानबदल आणि माहिती-प्रसारण याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मोदी यांच्या दुसऱ्या डावातील संघाचा चेहरामोहरा हा पहिल्या संघापेक्षा पूर्ण वेगळा आहे आणि विशेषत: या संघात अमित शहा यांचा समावेश झाल्यामुळे पक्षाप्रमाणेच सरकारमध्येही शहा यांचे दुसऱ्या क्रमांकाचे स्थान अधोरेखित झाले आहे. मात्र, मोदी यांनी देऊ केलेले ‘डील’ कमी प्रतीचे वाटल्यामुळे ते नितीश कुमार यांनी नाकारले आणि त्यांचे जनता दल (यु) मंत्रिमंडळात सामील झाले नाही. अर्थात, ते ‘एनडीए’मध्ये राहणार असले, तरी तीनशेहून अधिक जागा जिंकल्यामुळे मोदी-शहा यांना ते बाहेर पडले असले, तरी काहीच फरक पडला नसता. त्याच वेळी पाच मंत्र्यांची भाषा करणाऱ्या शिवसेनेने मात्र पदरी पडलेल्या एकमेव मंत्रिपदावर समाधान मानत ती माळ अरविंद सावंत यांच्या गळ्यात घातली! मोदी यांचा हा नवा संघ नव्या जोमाने कामास सज्ज झाला आहे. मात्र, आता केवळ पूर्वसूरीच्या चुका उगाळून चालणार नाही, तर काही भरीव काम करून दाखवावे लागणार, हे मोदी-शहा तसेच संघातील अन्य खिलाडी यांच्या लक्षात आलेच असणार, अशी आशा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Key members of Team Modi 2.0 in editorial