पतंगाचे दिवस (पहाटपावलं)

डॉ. अरुण मांडे 
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

चौकात पतंगांची दुकानं लागली, की लहानपणीचे पतंगाचे दिवस आठवतात. तेव्हा दुकानातून कुणीही पतंग विकत आणत नसे. घरीच पतंग करायची प्रथा असे. रंगीत कागदांचे ताव आणायचे. बुरूड गल्लीतून कामट्या आणायच्या. चाकूनं त्या तासायच्या. उभी काडी जाड.

चौकात पतंगांची दुकानं लागली, की लहानपणीचे पतंगाचे दिवस आठवतात. तेव्हा दुकानातून कुणीही पतंग विकत आणत नसे. घरीच पतंग करायची प्रथा असे. रंगीत कागदांचे ताव आणायचे. बुरूड गल्लीतून कामट्या आणायच्या. चाकूनं त्या तासायच्या. उभी काडी जाड.

धनुष्यासारखी वाकवायची काडी बारीक तासायची. काड्या चिकटवायला शिजवलेल्या भाताची शितं वापरायची. काटाकाटी करताना पतंग फाटू नये म्हणून चारही काठांना दोर लावून तावाचे काठ दुमडून चिकटवायचे. पतंग तयार झाला, की महत्त्वाचं काम म्हणजे सूत्तर बांधणं. वरून-खालून चार चार बोटं सोडून एक वीत मोजायचं आणि उभ्या काडीच्या उजव्या-डाव्या बाजूला छिद्रं पाडायची. त्यात दोरा ओवायचा. दोऱ्यासकट पतंग उचलून हातावर बॅलन्स करून मग गाठ मारायची, की झाला पतंग तयार. पतंगाचे प्रकार तरी किती! लहान पतंग म्हणजे टुक्कल. मध्यम आकाराचा गणपती; आणि मोठा रबदान. 

मांजा तयार करणं म्हणजे मोठं प्रकरण असे. अंगणात तीन दगडांची चूल मांडून काटक्‍या गोळा करून त्या पेटवून भांड्यात पाणी टाकून सरस वितळवायला ठेवायचा. तो नाही मिळाला तर साबुदाणा पाण्यात उकळायचा. दोरा दाभणात ओवून बाहेर काढायचा. ती दाभण एकानं धरायची. तो दोरा लाल रंगाच्या डब्यातून बाहेर काढायचा. अंगणात भिंतींना खिळे ठोकून दोरा ताणून वाळवायचा. तोपर्यंत सोडा वॉटरच्या बाटल्या दगडावर बारीक कुटायच्या. चाळून घ्यायच्या. तो चुरा सरसात मिसळून दोन्ही हातांवर घ्यायचा. ताठलेल्या दोऱ्या मुठीमध्ये धरून एकेक पाऊल हलकेच पुढं टाकत एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात मांजा लावायचा. वाळला, की त्यावर दुसरं तिसरं पूट लावायचं. मांजा तयार झाला, की तो चक्रीला गुंडाळायचा. येवल्याची चक्री प्रसिद्ध होती. पतंग उडवताना धाकटा भाऊ ती चक्री दोन्ही हातांत धरायचा. दुसरी एक चक्री होती आसारी. ती एका हातात धरायची आणि दुसऱ्या हातानं पतंग उडवायचा. 

गच्चीवर जाऊन पतंग उडवण्यात जे थ्रिल आहे, ते मैदानात जाऊन उडवण्यात नाही. जुनी घरं एकमेकांना लागून असायची. कटलेला पतंग खाली यायला लागला, की एका गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर उड्या मारत पतंग पकडायला मजा यायची. वरच्यावर पतंग पकडण्यासाठी बांबूला काटेरी फांदी लावायची किंवा बाभळीची फांदीच वापरायची. एखादा पतंग कटला, की गच्चीवरची पोरं व्हयकाप्या करून जोरात ओरडत. 

कटलेला पतंग पकडला, की काहीतरी मोठा पराक्रम केल्यासारखं वाटे. पतंग पकडता आला नाही तर दुसऱ्यानं पकडलेला पतंग फाडून टाकण्याची प्रथा होती. मग जोरदार भांडणं, मारामाऱ्या. जन्माचं वैर. 

रेडिओ सिलोनवर पतंगाच्या दिवसांत "चली चली रे पतंग मेरी चली रे' हे गाणं हमखास लागायचं आणि मुंबई केंद्रावर आशा भोसलेंचं "चढाओढीनं चढवत होते, ग बाई मी पतंग उडवीत होते' हेही गाणं ठरलेलं. 

आताच्या मुलांना पन्नास रुपयांचा पतंग आणि त्याला चिनी मांजा लावून मैदानात जाऊन एकट्यानं पतंग उडवावा लागतो. काय मजा येत असेल माहीत नाही. 

पांडुरंगशास्त्री आठवल्यांनी म्हटलंय, आकाशात पतंग विहरण्याची मजा उडवणाऱ्याच्या हातात त्याची दोरी आहे, तोपर्यंतच असते. दोरी तुटली, की संपलं सगळं. म्हणून परमेश्‍वराच्या हातात आपल्या आयुष्याची दोरी द्यावी. 

Web Title: Kite day