बाप्पा विमानात; चाकरमाने बशीत! (अग्रलेख)

airplane land chipi airport
airplane land chipi airport

विघ्नहर्त्याचा उत्सव आजपासून सुरू होत असून, सध्या भेडसावत असलेल्या अनेक विघ्नांचे निर्दालन बाप्पा करतील, अशीच तमाम भाविकांची भावना असणार, यात शंका नाही; पण या उत्सवाला काही बाबतीत लागलेले अनिष्ट वळण दूर करण्यासाठी त्यांच्या सक्रिय पुढाकाराची गरज आहे.

श्रीगणेश चतुर्थी यंदा बाप्पाला थेट विमानाने कोकणात घेऊन गेली आहे! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्‍यातील चिपी येथे नव्याने झालेल्या विमानतळावर हरितालिकेच्या मुहूर्तावर पहिले विमान सुखरूप उतरले आणि त्यातून बाप्पाही कोकणात अवतरले. नेहमीप्रमाणेच सगळीकडे गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे; पण यंदाच्या उत्सवाच्या काळाचा विचार करता सभोवताली अनेक विघ्नेही भेडसावताहेत. एकीकडे इंधनाचे दर रोजच्या रोज भडकत असतानाच, रुपयाही विक्रमी नीचांक गाठू पाहत आहे आणि भांडवली बाजारही गडगडला आहे. एकीकडे बाप्पा विमानप्रवास करून कोकणात पोचले; पण त्याच बाप्पाच्या पूजनासाठी कोकणात जाऊ पाहणारे हजारो मुंबईकर चाकरमानी हे मुंबई-गोवा या खडतर प्रवासात जागोजागी अडकून पडले आहेत. या महामार्गाचे रडगाणे आजचे नाही आणि कोकणी माणूस हा सहनशील असल्यामुळेच तो वाट कितीही बिकट असली, तरी धैर्याने आणि निर्धाराने प्रवास करतो, तो कोकणी मेव्याच्या सुखद आठवणींच्या जोरावरच. मात्र, या प्रवासात त्याला अनेकदा अपघातांनाही सामोरे जावे लागते. मंगळवारी सकाळी याच महामार्गावर लांजा तालुक्‍यात झालेल्या भीषण अपघातात श्रीगणेशाच्या भेटीसाठी आतूर झालेले सहा गणेशभक्‍त मृत्युमुखी पडले. तरीही सरकारला जाग येत नाही आणि या महामार्गावरचा प्रवास सुखद होत नाही. त्यातच यंदा पुनश्‍च एकवार गणेशोत्सवाच्या निमित्ताने ध्वनिप्रदूषणाचा, तसेच पर्यावरणप्रेमी उत्सवाचा आणि मुख्य म्हणजे विसर्जनाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या प्लॅस्टिक बंदीचा अडखळत प्रवास चालू असतानाच या उत्सवाच्या निमित्ताने धडाधडा खपणारी थर्मोकोलची मखरे आणि अन्य सजावट पुढच्या पावसाळ्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी महानगरांत कसा विचका करतील, हेच आता बाप्पालाही बघावे लागणार आहे.

अर्थात, ध्वनिप्रदूषण आणि नैसर्गिक जलस्त्रोतात करण्यात येत असलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे होणारी पर्यावरणाची हानी हा मुद्दा काही यंदाच चर्चेत आलेला नाही. चार वर्षांपूर्वी कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात विसर्जन मिरवणुकीच्या वेळी लावण्यात येणाऱ्या "डीजें'मुळे साताऱ्यात इमारतीची भिंत कोसळून एकाला प्राण गमवावे लागले होते. एकीकडे साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोल्हापुरात "डीजे'विना मिरवणूक काढण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जात असतानाच, साताऱ्याच्या गादीच्या वारसांनी मात्र "डीजे'च्या ठणठणाणाचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवला आहे. साताऱ्यातच नव्हे, तर राज्याच्या इतर अनेक भागांत डीजे आणि त्यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर बनला असून, त्याविरोधातील "आवाज' ऐकूच जाऊ नये, अशी खबरदारी घेतली जात आहे. ध्वनिप्रदूषण करणे हीच जणू उत्सव साजरा करण्याची रीत आहे, अशी काहींची समजूत झालेली दिसते. गावोगावचे उत्सवाचे धुरिणच जर अगदी मूलभूत नियमांना, पर्यावरणासाठीच्या निर्बंधांना तिलांजली देणार असतील, तर मग जनसामान्यांना विचारणार तरी कोण? याशिवाय, गणेशोत्सवाच्या निमित्ताने दर वर्षी चर्चेत येणारा मुद्दा हा मिरवणुकीतील अशिष्ट वर्तन आणि ओंगळवाण्या प्रकारांचा असतो. मुंबापुरीत गेल्या शनिवारीच गिरणगावात असे अश्‍लील चाळे करणाऱ्यांनी महिलांना धक्‍काबुक्‍की करत, त्यांची कोंडी केली होती. त्याच वेळी लालबाग-परळ परिसरातील अनेक ठिकाणी या तथाकथित गणेशभक्‍तांनी रस्त्यांवरील शोभिवंत वस्तूंची मोडतोडही केली. या सगळ्याला आवर कसा घालायचा, हा मोठा बिकट प्रश्‍न आहे. आपापल्या मतपेढ्या शाबूत ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी; तसेच राजकीय पक्ष कोणाला शिस्त लावण्याचा साधा प्रयत्नही करीत नाहीत, हे तर केव्हाच स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळेच सत्ताधारी असोत की विरोधी, राजकीय पक्ष उत्सवाच्या या विकृतीकरणाला अप्रत्यक्ष प्रोत्साहनच देत आहेत. तेव्हा लोकांमधूनच आता चळवळीचा रेटा तयार व्हायला हवा. काही ठिकाणी जे चांगले उपक्रम सुरू आहेत, त्यांतील सहभाग वाढायला हवा, त्यांना बळ मिळायला हवे. मग तो नदीप्रदूषणाला आळा घालण्यासाठीचा सामूहिक प्रयत्न असो, पर्यावरणपूरक सजावट असो किंवा कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा किंवा गरजूंना शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम असो. या समाजोपयोगी योजना, उपक्रम आणि कार्याचा व्याप आणि प्रभाव जसजसा वाढेल, तसतशी गणेशोत्सवाची रंगत खऱ्या अर्थाने वाढेल आणि यातूनच आपोआप सर्जनाचा, सौंदर्याचा आणि मांगल्याचा उत्सव ही या ऐतिहासिक उत्सवाची ओळख पुन्हा उजळून निघेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com