दृष्टीचं व्याकरण

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 22 जून 2017

तुम्ही नीट पाहिलं, तर हे मन दृष्टीच्या तळाशी हमखास सापडतं. दृष्टी जे टिपते, ते सारं मनाच्या सागरात मिसळून जातं. त्यांतलं काही तरंगत राहतं; आणि काही खोल तळाशी जाऊन बसतं

डोळ्यांना त्यांची त्यांची एक भाषा असते. या भाषेला लिपी असते; आणि व्याकरणसुद्धा असतं. ऱ्हस्व-दीर्घ वेलांट्या-उकार, जोडाक्षरं, सामासिक शब्द, जोडशब्द; आणि अर्थातच विरामचिन्हं देखील. व्याकरणशुद्ध लेखन देखणं दिसतं; तसंच डोळ्यांच्या भाषेचं व्याकरण समजलेल्यांची दृष्टीही निवळशंख झऱ्यासारखी भासते. शब्दांच्या उच्चारणात व्याकरणदृष्ट्या चूक झाली, तर ती कानांना चटकन कळते. दृष्टीचं व्याकरण चुकलं, तर ते कळून येण्याआधीच त्याचे परिणाम जाणवू लागतात. दृष्टीच्या भाषेचे शब्दार्थ मनाच्या कोशात उलगडतात. संभाषणांत किंवा कृतींत या शब्दार्थांचा वापर आढळतो. अनेक पर्यायांतून आपण कोणता अर्थ निवडतो, त्यावरून आपलं व्यक्तिमत्त्व स्पष्ट होतं. "दृष्टिकोन' हा शब्द तरी काय सांगतो? तो दृष्टीची मिती सांगतो. काहींच्या दृष्टीचे कोन अगदीच संकुचित असतात; तर काहींचे कोन विशाल असतात. दृष्टीच्या भाषेचं व्याकरण ही मिती आणि कोन निश्‍चित करीत असतं.

मनाचा शोध आपण सगळेच करीत असतो. ते दिसत नाही, असंही आपण म्हणतो. मन उमगत नाही, त्याचा थांग लागत नाही, अशी आपली समजूत असते. शरीरशास्त्राला मनाचं स्थान सांगता येत नाही; पण या शास्त्राला त्याचं अस्तित्व मात्र नाकारणं शक्‍य होत नाही. तुम्ही नीट पाहिलं, तर हे मन दृष्टीच्या तळाशी हमखास सापडतं. दृष्टी जे टिपते, ते सारं मनाच्या सागरात मिसळून जातं. त्यांतलं काही तरंगत राहतं; आणि काही खोल तळाशी जाऊन बसतं. या सागराची भरती-ओहोटी दृष्टीत स्पष्ट दिसते. त्यातली वादळंही तिथं दिसतात. या सागराची अथांगता, त्याची खोली, त्याच्या अंतर्गत सुरू असलेली प्रचंड खळबळ हे सारं काही दृष्टीच्या पृष्ठभागावर येतं. दृष्टीचे शब्दार्थ बिघडले, की तिच्या मागं असलेल्या सागराचे तळही गढूळ होत जातात. समुद्राला अनेक प्रवाह येऊन मिळतात. दृष्टितळाच्या समुद्रालाही दर क्षणी विविध प्रवाहांना सामावून घ्यावं लागतं; कारण त्यातला कुठलाही प्रवाह थोपविता येत नाही. कचरा आणि मोती यांपैकी तळाशी काय साठवायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं.

वाणीतून भलेही साखरपेरणी केली, तरी मनाच्या तळाशी त्यापेक्षा वेगळी खळबळ सुरू असेल, तर ती दृष्टीतही जाणवते. नजरेला नजर भिडवून बोलणं अनेकांना जमत नाही. तिथं आत्मविश्वासाचा अभाव असतोच; पण अशा माणसांच्या शब्दांत आणि कृतींत काहीच ताळमेळ नसतो. दृष्टीचं व्याकरण समजायला सोपं असलं, तरी त्याची अंमलबजावणी मात्र कठीण असते. हे व्याकरण शिकविता येत नाही. ते स्वतःच शिकायचं असतं. व्याकरणशुद्ध दृष्टी सहज कळते. ती स्थिर असते. स्निग्ध असते. ती स्वच्छ असते. प्रसन्न असते. ती तेजोमय असते. ती समन्यायी असते. अर्धविराम, स्वल्पविराम, उद्‌गारवाचक चिन्ह किंवा प्रश्नचिन्ह अशा विरामचिन्हांच्या जागा परिपक्व दृष्टीच्या व्याकरणात योग्य ठिकाणीच असतात. आजची सारी अशांतता ही विरामचिन्हं आणि दृष्टीचं व्याकरण चुकल्याचं निदर्शक तर नसेल?

Web Title: the language of eyes