मोक्षाच्या प्रतीक्षेत एक रात्र...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

गेली वीस वर्षे या कादंबरीने मला अक्षरश: छळले. शेवटी 2012मध्ये मी ती लिहून टाकायची असे ठरवले. कारण "आत्म्याला भिडलेली कादंबरी भयगंडापोटी कधीच लिहू न शकलेला लेखक येथे चिरनिद्रा घेत आहे,' असे कुणी मला माझ्या थडग्यावर लिहिलेले नको होते

अमेरिकी लेखक जॉर्ज सॉंडर्स यांची "लिंकन इन द बार्डो' ही वेगळ्या अर्थाने एकमेवाद्वितीय कादंबरी मानायला हवी. हल्लीच्या मूल्यांच्या बदलत्या जमान्यात ही कादंबरी जन्म-मृत्यू, सत्य-असत्य, चांगलं-वाईट, खऱ्या-खोट्याची परीक्षा करू बघते. त्यांना काळाच्या कसोटीवर घासू बघते. म्हणूनच तिचे महत्त्वही अधोरेखित होते. वास्तविक कादंबरीचे कथानक अगदी छोटेसे. किंबहुना, कथानक म्हणण्यापेक्षा त्याला प्रसंग तेवढा म्हणता येईल. पण संवादांच्या माध्यमातून हा प्रसंग पाहता पाहता कादंबरीचा रूपबंध घेतो आणि वाचकाला घट्ट पकडून ठेवतो.

अमेरिकेचे दिवंगत अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा 11 वर्षांचा विली नावाचा मुलगा विषमज्वराने निधन पावला. वॉशिंग्टनमधल्या दफनभूमीत त्याची शवपेटी दफनासाठी ठेवलेली होती. तेव्हा आपल्या मुलाचे दर्शन घेण्यासाठी अचानक रात्री अध्यक्ष लिंकन दफनभूमीला भेट दिली. तिथून ही कादंबरी सुरू होते. संपतेही तिथेच. पण मधल्या काळातला अवकाश लेखक पॉल सॉंडर्स यांनी अशा काही आशयानं भरून टाकला आहे, की कादंबरी एकदा हातात घेतली की सोडणे कठीण होऊन बसते. यंदाचा मानाचा "मॅन बुकर' हा पुरस्कार सॉंडर्स यांच्या "लिंकन इन द बार्डो'ला मिळाला आहे. "बार्डो' ही तिबेटी संकल्पना आहे. मृत्युपश्‍चात मोक्षाच्या दिशेने प्रवासही सुरू करण्यापूर्वीच्या स्थितीला बार्डो अशी संज्ञा आहे.

""खूप वर्षांपूर्वी माझ्या पत्नीच्या पुतण्याने, लिंकनने अशी दफनभूमीला भेट दिली होती, तो प्रसंग रंगवून सांगितला होता. आपल्या दोन्ही हातांवर मुलाचे कलेवर घेऊन अश्रू ढाळणारे लिंकन यांची प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली. गेली वीस वर्षे या कादंबरीने मला अक्षरश: छळले. शेवटी 2012मध्ये मी ती लिहून टाकायची असे ठरवले. कारण "आत्म्याला भिडलेली कादंबरी भयगंडापोटी कधीच लिहू न शकलेला लेखक येथे चिरनिद्रा घेत आहे,' असे कुणी मला माझ्या थडग्यावर लिहिलेले नको होते,'' अशी प्रतिक्रिया सॉंडर्स यांनी पुरस्काराच्या घोषणेनंतर दिली. ती पुरेशी बोलकी आहे. बुकर निवड समितीची ही निवड योग्यच म्हणावी लागेल. तब्बल 50 हजार पौंडांचा हा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा अमेरिकी लेखकाला मिळतो आहे. गेल्या वर्षी पॉल बेट्टी यांच्या "सेलआऊट' या कादंबरीला "बुकर' सन्मान प्राप्त झाला होता.

Web Title: lincoln in the bardo