टंचाईवर उतारा जलसाक्षरतेचा

टंचाईवर उतारा जलसाक्षरतेचा

पाणीवापराबाबत आपण गंभीर नाही, किंबहुना आपण जलनिरक्षरच आहोत. आज बाटलीबंद पाणी वीस रुपये प्रतिलिटर व पेट्रोल ऐंशी ते पंचाऐंशी रुपये प्रतिलिटर आहे. पुढील काही वर्षांत हेच गणित उलटे झाले, तर आश्‍चर्य वाटायला नको. परंतु, हे गणित कसे ठेवायचे हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी गरज आहे ती जलसाक्षरेतची.

लोकसंख्या वाढ, विविध कामांसाठी पाण्याची वाढणारी मागणी आणि अनियमित व अपुऱ्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात 28,500 ग्रामपंचायतींना, 86,681 वस्त्यांपैकी 25,500 वस्त्यांना पुरेसे पाणी उपलब्ध नव्हते. सरासरी वीस हजार वस्त्यांना दरवर्षी पाणीटंचाईची झळ पोचते. दरवर्षी सरासरी साडेपाच हजार वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा होतो. यावर्षी अकरा हजार वस्त्यांना टॅंकरने पाणी पुरवावे लागत आहे. 

आपल्याकडे जलसाक्षरतेचे प्रमाण तीस टक्‍क्‍यांच्या आसपास आहे आणि पर्जन्यमान चांगले असतानाही पाणीटंचाई अथवा महापुरासारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. साधारणतः साठ वर्षांपूर्वी पाणी मुबलक होते व लोकसंख्या मर्यादित होती. आज पाणी आहे तेवढेच आहे, लोकसंख्या मात्र चार पटीने वाढली. म्हणजे एका व्यक्तीऐवजी आता चार व्यक्ती वाटा मागू लागल्या. पाण्याची मागणी वाढली, परंतु पुरवठा मात्र तितकाच आहे आणि त्यासाठीच जलसाक्षरता गरजेची आहे, तीसुद्धा लहान वयापासून. 

नियोजनाअभावी टंचाई 

जगातील एकूण पाण्यापैकी 97.5 टक्के पाणी समुद्रात खाऱ्या पाण्याच्या रूपाने आहे. उरलेले 2.5 टक्के पाणी गोडे आहे. या गोड्या पाण्यापैकी 70 टक्के पाणी बर्फाच्या स्वरुपात, तर 27 टक्के पाणी भूगर्भात आहे. म्हणजे राहिलेले तीन टक्के पाणीच भूपृष्ठावर आहे. या तीन टक्के पाण्याचे नियोजन आजपर्यंत शक्‍य झालेले नाही. म्हणूनच दिवसेंदिवस पाण्याची कमतरता भासू लागली आहे. जागतिक प्रमाणानुसार जेथे पाणी भरपूर आहे, तेथे दरदिवशी दरमाणशी दोनशे लिटर पाणी वापरले जाते.

भारतीय प्रमाणानुसार शहरी भागात दर दिवशी दरमाणशी 135 लिटर पाणी पुरते. तेच प्रमाण ग्रामीण भागात 60 लिटर आहे. परंतु, घरोघरी शौचालय योजनेमुळे हे प्रमाणही आता वाढले आहे. शहरातील 135 लिटर पाण्यापैकी स्वयंपाक व पिण्यासाठी 15 लिटर, आंघोळीसाठी 20 लिटर, कपडे धुण्यासाठी 20 लिटर, भांडी घासण्यासाठी 20 लिटर, फरशी, गाडी धुणे 20 लिटर व संडास फ्लश करण्यासाठी 45 लिटर असे वाटप होईल. परंतु, तेच पाणी आपणास मुख्यत्वे शहरी भागात 10 ते 20 रुपये प्रतिहजार लिटर दराने मिळत असल्याने म्हणजे जवळजवळ फुकट मिळत असल्याने त्याच्या काटकसरीच्या पर्यायाबाबत आपण विचार करतो; परंतु अंमलात आणण्याच्या मानसिकतेत राहात नाही. 

महापालिकेने पाणीपुवठा केला नाही, तर आपण पाण्याचा टॅंकर विकत घेतो. त्याचा दर सरासरी 100-120 रुपये प्रतिहजार. तेच 1500 ते 2000 रुपये प्रतिहजार लिटर दराने दिले, तर आपण आणखी बचतीचे मार्ग अवलंबतो. म्हणजेच वर उल्लेख केलेले 135 लिटर दरदिवशी दरमाणशी प्रमाण कमी होते. हेच पाणी 20 रुपये प्रतिलिटर असे बाटलीबंद दिले, तर निश्‍चितच आपला पाणी वापर आणखी कमी होईल. म्हणूनच पाण्याचे आर्थिक मूल्य जितके वाढेल, तेवढी त्याची बचत होईल. 

काटेकोर वापर होण्याची गरज

पाण्याचा काटेकोरपणे वापर होण्यासाठी पुढील बाबी अपरिहार्य आहेत. घरात बाथरुम, टॉयलेट, किचन, अंगण, फिल्टर, पिंप अशा अनेक ठिकाणी नळ असतात. यापैकी एखादा तरी नळ अनेकदा थेंब थेंब गळत राहतो, तो वायसर खराब झाल्याने किंवा व्यवस्थित बंद न केल्याने. आपण त्याकडे बहुतेक वेळी दुर्लक्ष करतो. कारण त्यामुळे काहीच फरक पडत नाही, असे आपले मत असते. एखाद्या धरणाचा साठा थेंबाथेंबाने संपतो हे लक्षात घेतले, तर ताबडतोब नळ दुरुस्त करून घ्याल ना? आता हाच हिशेब वाहणाऱ्या नळासाठी करून पाहा.

अनेकदा दिवसाकाठी एक मिनिटासाठी का होईना नळ वाहतो. एका मिनिटात किमान दहा लिटर पाणी वाहत असेल? मग आपल्या घरातून वर्षाला दहा गुणिले 365 असा हिशोब केला आणि देशातले सगळे लोक अशी चूक करीत असल्यास शुद्ध केलेल्या पाण्याचे काय होईल? जगातील जलशास्त्रज्ञांनी पाण्याची नवीन व्याख्या केली आहे. ते पाण्यासाठी water हा शब्दप्रयोग न वापरता wash हा शब्दप्रयोग वापरत आहेत.

Water in relation to sanitation and hygine. आरोग्य आणि स्वास्थ्य या दोन संकल्पना त्यांनी पाण्याशी जोडल्या आहेत. मानवाला खरोखरच जलसाक्षर व्हायचे असेल, तर जलसाक्षरतेची पुढील पंचसूत्री वापरावी लागेल. 1. पाणीवापरात काटकसर. 2. जलपुनर्भरणाची कास. 3. पाण्याचा पुनर्वापर. 4. पाण्याचे प्रदूषण टाळणे. 5. शुद्ध पाण्याचे प्राशन. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com