हवा प्रदूषणाचे ‘लाइव्ह अपडेट’

सम्राट कदम
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

वाढत चाललेल्या हवा प्रदूषणामुळे जगातील अनेक शहरांचा श्‍वास गुदमरला आहे. विशेष म्हणजे जगातील पहिली सात प्रदूषित शहरे ही भारतातील आहेत. यामध्ये पहिला क्रमांक पटकावला तो कानपूर शहराने! त्यानंतर अनुक्रमे फरिदाबाद, गया, वाराणसी, पाटणा, दिल्ली, लखनौ या प्रामुख्याने उत्तर भारतातील शहरांचा क्रमांक लागतो. प्रदूषणकारी कणांचे हवेतील प्रमाण या शहरांत सर्वाधिक आहे. 

वाढत चाललेल्या हवा प्रदूषणामुळे जगातील अनेक शहरांचा श्‍वास गुदमरला आहे. विशेष म्हणजे जगातील पहिली सात प्रदूषित शहरे ही भारतातील आहेत. यामध्ये पहिला क्रमांक पटकावला तो कानपूर शहराने! त्यानंतर अनुक्रमे फरिदाबाद, गया, वाराणसी, पाटणा, दिल्ली, लखनौ या प्रामुख्याने उत्तर भारतातील शहरांचा क्रमांक लागतो. प्रदूषणकारी कणांचे हवेतील प्रमाण या शहरांत सर्वाधिक आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

प्रत्येक वर्षी हिवाळ्यामध्ये राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरतो, धुरक्यामुळे होणारी तडफड आपण नेहमी पाहतो. शाळा, महाविद्यालयांना सुटी, सम-विषम वाहन वापराच्या योजनेची अंमलबजावणी, अशा विविध उपाययोजनांचा अवलंब करण्यात येतो. पण, राजधानीमध्ये अशी आणीबाणीसारखी स्थिती येणे आपल्यासाठी भूषणावह नाही. तसेच प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे नागरिकांच्या आरोग्याबरोबरच प्राणी-पक्ष्यांच्या जीवनाचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. राजधानीतच ही स्थिती असेल तर इतर शहरांचे बोलायलाच नको.

हवेतील प्रदूषणकारी घटकांची पातळी, कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण, हवेच्या वहनाची दिशा, रासायनिक घटक यांची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणेची आवश्‍यकता आहे. ही माहिती मिळाल्यास प्रशासनाला आवश्‍यक उपाययोजनाही करता येतील आणि योग्य ती खबरदारी घेता येईल. हीच गरज लक्षात घेऊन प्रदूषणाच्या वाढत्या पातळीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संशोधन संस्थेने (आयआयटीएम) विकसित केली आहे. सध्या राजधानी दिल्लीसह चार शहरांत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभाग, अमेरिकेतील हवामान संशोधन संस्थेच्या सहकार्याने ‘आयआयटीएम’चे शास्त्रज्ञ डॉ. सचिन घुडे यांच्या नेतृत्वाखाली ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. प्रदूषणाच्या वाढत्या पातळीचे योग्य विश्‍लेषण या यंत्रणेतून दिल्ली सरकारसह सामान्य नागरिकांना मिळत आहे. यासाठी दिल्ली शहरात ४३ नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. हवेतील रासायनिक प्रदूषक, चारशे मीटरपर्यंतचे रिझॉल्यूशन, हवेचे अचूक पृथक्करण, तीन किलोमीटर रिझॉल्यूशन असलेल्या हवेचा दर्जाची आवश्‍यक माहिती याद्वारे मिळत आहे. पूर्वसूचना देण्यासाठी अवकाशातील उपग्रहांचा आणि जमिनीवरील नियंत्रण कक्षाचा समन्वित वापर करण्यात आला आहे. दिल्लीतील हवेचा दर्जा, वहनाची दिशा, वेग, प्रदूषके यासंबंधीचे लाइव्ह अपडेटसाठी https://ews.tropmet.res.in/ हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.

संकेतस्थळावर संपूर्ण दिवसभराचे प्रत्येक तासाला हवेचा दर्जा कसा असेल, याची पूर्वसूचना देण्यात आली आहे. हवेची पारदर्शकता, प्रदूषणाची पातळी, धूलिकणांचे प्रमाण, कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण, ज्वलनातून बाहेर पडणारा कार्बन अशा विविध घटकांची लाइव्ह माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तसेच पुढील दहा दिवसांचा अंदाजही देण्यात आला आहे. शहराच्या माहितीबरोबरच चांदणी चौक, लोधी रस्ता, दिल्ली विद्यापीठ, पुसा, विमानतळ, मथुरा रस्ता, नोएडा अशा विविध ठिकाणच्या परिस्थितीचे लाइव्ह अपडेटही उपग्रह छायाचित्रांद्वारे देण्यात आले आहे. दिल्ली शहरात होणाऱ्या प्रदूषणाला प्रामुख्याने पंजाब आणि हरियाना या शेजारच्या राज्यातील प्रदूषणही कारणीभूत असते. येथील शेतकरी हिवाळ्यामध्ये शेतातील परळी जाळतात त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडतो. हा बाहेर पडणारा धूर हवेसोबत वाहत दिल्ली शहरात येतो. त्यातून दिल्लीमधील हवा प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. यासंबंधीची पूर्वसूचना मिळावी म्हणून चंडीगड, पतियाळा, रोहतक आदी शहरांतील प्रदूषणाची माहिती संकेतस्थळावर मिळते. तसेच हवेच्या वहनाची दिशा, वेग यांसंबंधीची पूर्वसूचनाही मिळते. दिल्लीसह लखनौ, वाराणसी, कोलकाता आदी शहरांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. दिल्लीमध्ये या यंत्रणेसाठी चारशे मीटरपर्यंतचे रिझॉल्यूशन मिळते, तर इतर शहरांत दहा किलोमीटरच्या रिझॉल्यूशनने हवेतील प्रदूषणाची पूर्वसूचना यंत्रणेच्या माध्यमातून मिळेल.

यंत्रणेचे फायदे
हवा प्रदूषणामुळे दिल्लीसह इतर शहरांत उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्‍यक पूर्वसूचना यंत्रणेच्या माध्यमातून मिळतील. त्यामुळे आवश्‍यक उपाययोजना प्रशासनाला करता येतील. तसेच हवेतील प्रदूषक घटकांची माहिती मिळणार असल्यामुळे त्यांचे उत्सर्जन प्रामुख्याने कोणत्या स्रोतांतून होते याची माहिती मिळेल. त्या आधारावर उपाययोजना प्रशासनाला करता येतील. तसेच सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असल्यामुळे सामान्य नागरिकालाही आवश्‍यक ती खबरदारी घेता येईल.

यंत्रणेची वैशिष्ट्ये
हवेतील प्रदूषणकारी घटकांची पातळी आणि दृश्‍यता यांची प्रत्यक्ष माहिती
नेमक्‍या कोणत्या कारणामुळे प्रदूषण याची माहिती उपग्रहाद्वारे मिळणार.
पूर्वसूचना देणारे संदेश, तसेच आवश्‍यक खबरदारीचे उपाय सुचविले जाणार
आजूबाजूच्या शहरांतील हवेतील प्रदूषणाची माहिती देणार
थंडीमध्ये पडणाऱ्या धुक्‍याची पूर्वसूचना मिळणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Live Update of Air Pollution