esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

या जगण्यावर

या जगण्यावर... : जीवनाची मैफल रंगवूया...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-स्वानंद बेदरकर

जीवन जगणे ही एक मोठीच गुंतागुंतीची प्रकिया आहे आणि खरं तर तो तसा साधा-सोपा प्रवास आहे, ही दोन्ही परस्परविरोधी विधाने. दोन्हींमध्ये तथ्य आहे; पण कोणते विधान जास्त बरोबर हे त्या त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. वाट्याला ज्या क्षणी जो भाग येईल, तो आनंदाने जगायचा. यातच खरी इतिकर्तव्यता सामावलेली आहे. त्याकरिता आनंद नेमका कुठे आणि कशात आहे, हेदेखील समजून घ्यायला हवं. आनंद ही ऐल नाही, तर पैलतीरावरची गोष्ट आहे. तो सुख आणि दुःख यांच्या पलीकडे आहे. तो मिळवायचा हीच खरं तर आयुष्याची मागणी असते. क्षणाक्षणाला उमलत जाणारी, फुलत राहाणारी एखाद्याची जीवनमैफल ही जशी त्याची ‘आनंदयात्रा’ असते, तशी ती त्याच्या भोवतालच्या लोकांचीही असते.

नदी वाहताना जसे दोन्ही तीर समृद्ध करीत जाते, तशीच आनंदयात्री असणारी माणसं संपन्नता प्रदान करीत पुढे जात राहातात. त्यात कुठलाही अभिनिवेश नसतो वा मी देतो आहे, अशी अहंताही नसते. ज्याला आनंद कळतो त्याच्याकडून त्याच्याही नकळत होणारी ही अनाहूत क्रिया आहे. अशा व्यक्तींना दुःखाचंही गाणं करता येतं. मग साहजिकच प्रश्न पडतो की, आपल्याला जमेल का असं? या प्रश्नाचं उत्तर सकारात्मक देता येतं; पण त्यासाठी नुसते डोळे असून चालत नाही. दृष्टीसुद्धा असावी लागते. नुसता आवाज ऐकता येऊन उपयोग नाही, तर स्वर कळणारा कान असावा लागतो. हे मिळवण्यासाठी पुन्हा कुठेही जाण्याची गरज नाही. त्यासाठी आपला आपल्याला शोध घ्यावा लागतो. आत वळावं लागतं. बाहेर बघून चालत नाही आणि इथेच आत्तापर्यंत सोपी वाटणारी आनंदयात्रा अवघड वाटायला लागते.

मग वाटते जगणे इतके सोपे नाही. आपलेच फुत्कार जेव्हा आपल्याला ऐकू येऊ लागतात, तेव्हा स्वतःमुळेच स्वतःची मान खाली जाते. आपला पराभव आपल्याला दिसू लागतो आणि गणित चुकल्याची जाणीव होते. अशी जाणीव होणे म्हणजे एक पाऊल पुढे पडणे होय. प्रामाणिक होत जाणे. आरस्पानी व्हायला होणे. असे वारंवार घडले की, जीवनातला सच्चा सूर ऐकू येऊ लागतो. अशा पथिकांचे संप्रदाय, मठ वा मोहल्ले नसतात. ते ‘अपनीही धूनमें’ गात गात पुढे जातात. ना कसला आग्रह, ना कसले आव्हान. अशा धूनवेड्या माणसांची संख्या नेहमीच कमी असते.

काचलेल्या, कावलेल्या आणि कावऱ्याबावऱ्या झालेल्या माणसांचा कल्लोळच आपले मखर होण्याचा काळ अनेकांच्या आयुष्यात येतो; त्यापासून सुटता येणं म्हणजे खरं जगणं. ‘रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ याचा अर्थ यापेक्षा वेगळा नाही. ‘सुटणं’ ही प्रक्रियाच जीवनाला उन्नत करते. अडकून पडणं आणि अडकण्याची कारणं तयार करणं यातच फार वेळ जातो आपला. फार वेळ जातो म्हणण्यापेक्षा आयुष्य निघून जातं. अविनाशी असं काहीही हाती न लागल्याची वा आल्याची शेवटाला होणारी जाणीव फार अंधारी असते. मग उर्वरित दिवसांत ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी अवस्था होते. आपलेच जगणे आपल्याला डंख मारीत राहाते. म्हणूनच साध्यापर्यंत जाण्यासाठी साधन सापडायला हवं. पुन्हा साध्य हे करिअरिस्टिक असता कामा नये. म्हणजे काय, तर आयुष्यात अमुकतमुक होणं, मिळवणं हे साध्य नाही. आनंदाप्रत पोहोचणं हेच खरं साध्य. त्या दिशेने पाऊल टाकूया. जीवनमैफल रंगवूया...

loading image
go to top