उद्योगांची सरकती भूमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुजरात

उद्योगांची सरकती भूमी

अवघ्या दीड-पावणेदोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढच्या दोन महिन्यांत होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा जाहीर करण्यास निवडणूक आयोगाला मुहूर्त का सापडत नाही, या प्रश्नाची अनेक उत्तरे गेल्या काही दिवसांत पुढे येऊ लागली आहेत! खरे तर गुजरातच्या निवडणुकांच्या तारखा या हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांची घोषणा झाली, त्याचवेळी जाहीर होणे अपेक्षित होते. तसे ते झाले नाही आणि त्यामुळेच गुजरातसंबंधात काही मोठ्या घोषणा होणार, अशीही चिन्हे दिसू लागली आहेत.

आधी महाराष्ट्रात होऊ घातलेला ‘टाटा एअरबस’ हा २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातने पळवल्याच्या बातम्या गेल्या आठवडाअखेरीस आल्या, तेव्हाच या प्रश्नाचे उत्तर अप्रत्यक्षरीत्या मिळून गेले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजनही पार पडल्यामुळे आता आज-उद्या या निवडणुकांना मुहूर्त मिळण्याचा मार्ग खुला तर झाला आहेच; मात्र या प्रकल्पाच्या पळवापळवीवरून महाराष्ट्रात सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अनेकार्थांनी महत्त्वाच्या आहेत.

‘टाटा एअरबस’ प्रकल्प आता गुजरातेत बडोदा परिसरात होणार, हे निश्चित झाले आहे आणि त्यापूर्वीच महाराष्ट्रात होऊ घातलेला सुमारे एक लाख कोटींचा आणि त्यामुळे अनेकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न सोडवणारा ‘वेदान्ता-फॉक्सकॉन’ या प्रकल्पालाही अखेर गुजरातेतच जावे लागले होते. शिवसेनेत मोठी फूट पाडून राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर झालेल्या या दोन घटनांमुळे खरे तर एकेकाळी ‘उद्योगप्रेमी राज्य’ अशी केवळ देशातच नव्हे तर जगभरात प्रतिमा असलेल्या महाराष्ट्राकडे अनेक उद्योग पाठ का फिरवत आहेत, असे भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मात्र, ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातेत गेल्यामुळे विरोधकांच्या,विशेषत: उद्धव ठाकरे यांच्या हातात आयतेच कोलित पडले आहे. आधी ‘वेदान्त- फॉक्सकॉन’ आणि नंतर टाटा एअरबस हे दोन प्रकल्प गुजरातेत जाण्याचीच वाट निवडणूक आयोग बघत आहे,’ असा आरोप राज्याच्या माजी उद्योगमंत्र्यांनी केला, तो त्यामुळेच.

विद्यमान सरकारला अर्थातच त्यामुळे काहीसे बॅकफूटवर जाणे भाग पडल्याचे दिसत आहे. त्यामुळेच भाजपची ढाल आणि तलवार, दोन्हीही असलेले फडणवीस यांच्याऐवजी सरकारची वकिली करण्याचे काम यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सोपवले गेलेले दिसते. हे दोन्ही महाकाय प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच महाराष्ट्रातून गेले, असा दावा उच्चरवात करत अहेत. पण याच महोदयांनी अलीकडेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना, ‘टाटा एअरबस प्रकल्प हा महाराष्ट्रातच होणार असल्याची’ ग्वाही दिली होती! तेव्हा कदाचित त्यांना असा काही निर्णय वर्षभरापूर्वीच झाल्याचे ठाऊक नसेल असे गृहीत धरून संशयाचा फायदा देता येईल. मात्र, गेली जवळपास तीन दशके राजकारण कोळून प्यायलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही ‘टाटा एअरबस’ने गुजरातेत आपले बस्तान बसवण्याचा निर्णय झाल्याचे ठाऊक नव्हते, हे कोणी मान्य करणार नाही.

आठवड्यांपूर्वी गडकरी यांनी टाटा समूहाला त्यासंबंधात एक पत्रही लिहिले होते. त्या पत्राचा तपशील प्रसिद्ध झाला असून, गडकरी यांनी दोन दिवस उलटल्यानंतरही त्याचा इन्कार केलेला नाही. याचा अर्थ विद्यमान उद्योगमंत्री सामंत यांचे महाविकास आघाडी सरकारवरील आरोप हे तथ्यहीन तरी आहेत वा ते एक तर सारवासारवीपोटी खोटेच बोलत आहेत, असा असू शकतो. आता यासंबंधात नेमके काय झाले याबाबत सरकार श्वेतपत्रिका प्रसिद्ध करणार असल्याचे सांगत आहेत. त्यानंतर तरी यासंबंधातील सत्य बाहेर यावे, एवढीच अपेक्षा आहे.

मात्र, या राजकीय वादापेक्षाही महाराष्ट्र या एकेकाळी उद्योगस्नेही असलेल्या राज्यातून बडे उद्योग काढता पाय का घेत आहेत, हा प्रश्न मूलभूत नि महत्त्वाचा आहे. दोष कोणाचा,याबाबत नुसतेच एकमेकांना गालिप्रदान करण्यातून काहीच साध्य होणार नाही. उद्योजकांना आर्थिक सवलती तर हव्या असतातच, पण उद्योगानुकूल वातावरणही अपेक्षित असते. ते पुरविण्यात आपण कमी पडतो आहोत का, हा प्रश्न सर्वच राजकीय नेत्यांनी स्वतःला विचारायला हवा. सत्तेच्या खेळात आत्मपरीक्षण ही गोष्ट वर्ज्य नसते, हे कधीतरी समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्र हे उद्योगाच्या दृष्टीनेच नव्हे तर राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे.

त्याला सापत्नभावाची वागणूक देणे, हे केंद्रात कोणीही सत्तेवर असो, त्यांना परवडणारे नाही. त्यामुळेच आता मुख्यमंत्री ‘टाटा एअरबस’पेक्षाही अधिक रोजगारनिर्मिती करणारा महाकाय प्रकल्प महाराष्ट्रात आणू, असे सांगू पाहत आहेत. हेच आणि असेच आश्चासन त्यांनी ‘वेदान्ता फॉक्सकॉन’ हातातून गेला तेव्हाही दिले होतेच, हे विसरून चालणार नाही. प्रश्न महाराष्ट्राच्या विकासाचा आहे. त्यात खरे तर राजकारण न आणता, सर्वपक्षीय राजकारण्यांनी एकत्र येऊन लढा द्यायला हवा, एवढाच या घटनांचा अर्थ आहे.

समृद्धीकडे नेणाऱ्या अनेक वाटा असतात; पण त्यापैकी एक निवडून त्यावरून वाटचाल करणे महत्त्वाचे असते.

- रॉबर्ट झॉएलिक