Loksabha 2019 : बोरीकाठच्या बाभळी (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण.

पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण.

स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात, याचे ‘याचि देही, याचि डोळा’ दर्शन बुधवारी खानदेशातील अमळनेरमध्ये घडले. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या महिलेच्या पतीने तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला लाथाबुक्‍क्‍यांनी तुडवले. हा सगळा प्रकार राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत घडल्याचा आणि त्या गदारोळात त्या मंत्र्यांनाही धक्‍काबुक्‍की झाल्याचा प्रसंग संपूर्ण देशाने व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवला. हे ज्या पक्षात घडले तो भारतीय जनता पक्ष स्वत:ला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणविणारा आणि ही कळवंड ज्यांना सोडवावी लागली, ते जलसंपदा व वैद्यक शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे तर सध्या पक्षाचे संकटमोचक. महाजनांच्या कर्तबगारीला अलीकडच्या काळात फुटलेले धुमारेही पक्षांतराच्या व सत्ताकांक्षेच्या एका विषण्ण करणाऱ्या प्रक्रियेतून गेले असावेत आणि सोलापुरात मोहिते-पाटील, नगरमध्ये विखे-पाटील ही आयुष्य काँग्रेसमध्ये काढलेली घराणी त्यांच्याच पुढाकाराने भाजपमध्ये यावीत, ही पृष्ठभूमी अमळनेरमधील घटनेच्या अनुषंगाने महत्त्वाची.

जळगावातील भाजपमध्ये संघर्ष सुरू झाला तो लोकसभा उमेदवारीच्या निमित्ताने. हा जिल्हा भाजपचा बालेकिल्ला. दोन खासदार, बहुसंख्य आमदार, जिल्हा परिषद, महापालिका अशा संस्था पक्षाच्या ताब्यात. अर्थात, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यातील संघर्ष त्या जोडीला आहेच. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व सध्याच्या विधान परिषद सदस्या स्मिता वाघ या खडसे गटाच्या म्हणून ओळखल्या जातात. लोकसभेसाठी आधी त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी अर्जही भरला. परंतु, विजयाची शक्‍यता नसल्याचे कारण देऊन ऐनवेळी त्यांच्याऐवजी महाजन गटाचे चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यादरम्यान ज्यांची उमेदवारी कापली ते सध्याचे खासदार ए. टी. पाटील यांनी एक मेळावा घेतला आणि त्यात अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी स्मिता वाघ यांच्यावर नको ती टीका केली. स्मिता वाघ यांचे पती उदय हे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. गिरीश महाजन व शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारच्या मेळाव्यात डॉ. बी. एस. पाटील यांना व्यासपीठावर स्थान दिल्याने वाघसमर्थक संतापले होते. मंचावरच पाटील यांना मारहाणीला सुरवात करून त्या संतापाला वाट करून दिली ती उदय वाघ यांनी. त्यामुळे केवळ भाजपचीच अब्रू गेली असे नव्हे, तर एकूणच राजकारणाची लक्‍तरे वेशीवर टांगली गेली.हे जिथे घडले ते अमळनेर ही खानदेशाची सांस्कृतिक राजधानी. संतसंप्रदायातील सखाराम महाराजांमुळे बोरी नदीकाठावर वसलेले हे ‘प्रतिपंढरपूर’. सेठ मोतीलाल मानेकचंद ऊर्फ प्रतापसेठ यांनी अमळनेरमध्ये केवळ कापडगिरणी सुरू केली नाही, तर १९१६ मध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी’ची स्थापना करून हे शहर तत्त्वज्ञानाचे केंद्र म्हणून समोर आणले. याच शहराने अझीम प्रेमजी यांची ‘विप्रो’ कंपनी जगाला दिली. त्यांच्या वडिलांनी वनस्पती तुपाचा कारखाना उघडून ‘विप्रो’ समूहाची मुहूर्तमेढ अमळनेरमध्ये रोवली. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, जगाला प्रेम अर्पावे असा मानवीय संदेश देणाऱ्या साने गुरुजींची अमळनेर आणि शिक्षक म्हणून इथले प्रताप हायस्कूल ही कर्मभूमी. असा इतिहास असलेल्या गावात गावगुंडाच्या टोळीने राजकीय व्यासपीठावर हैदोस घालावा, हे प्रत्येक संवेदनशील मनाला वेदना देणारे ठरले नाही तरच नवल.

अर्थात, भाजपच्या व्यासपीठावर घडले तो अपवाद आहे, असे नाही. बंद दाराआड एकमेकांची गचांडी धरण्याच्या घटना कोणत्याच पक्षात कमी नाहीत. त्याचे कारण आपल्या एकूणच राजकारणाची बदललेली प्रकृती, हे आहे. पैसा व गुंडगिरीचा वापर करून निवडणुका लढवायच्या, निवडून आले की त्या साधनांमधून उतराई होण्यासाठी भ्रष्टाचारी व गुंडांना आश्रय द्यायचा. त्यातून आणखी पैसा कमवायचा आणि पुढच्या निवडणुकीत तो पाण्यासारखा वापरायचा, अशा राजकारणाच्या दुष्टचक्रात आपण अडकलो आहोत. जोवर हे सार्वजनिक आयुष्याचे आणि जनतेच्या सेवेचे सोंग निर्धोक सुरू आहे, तोवर संबंधित नेते सभ्यतेचे मूर्तिमंत पुतळे असतात. अडथळे आले आणि महत्त्वाकांक्षेला मुरड घालावी लागली, की त्यांची मूळ प्रवृत्ती उसळी मारून बाहेर येते. मुद्दे बाजूला पडतात आणि गुद्दे व गुंडगिरी सुरू होते. राजकारणाचा बीभत्स चेहरा समोर येतो. आता सर्वसामान्य जनतेनेच हे असे चेहरे ओळखले पाहिजेत. सार्वजनिक जीवनातील सभ्यतेचे मूल्य टिकविण्यासाठी लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा वापर करून अशा टोळ्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 and politics in editorial