Loksabha 2019 : बंगालचा बदसूर (अग्रलेख)

political flags
political flags

राजकीय हिंसाचार हा लोकशाहीला असलेला मोठा धोका. त्याची एक पठडीच पश्‍चिम बंगालमध्ये तयार झाली आहे. आता तर भाजपही आक्रमक भूमिका घेत तेथील मैदानात उतरल्याने त्यातील संघर्षाला आणखी एक परिमाण मिळाले आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागण्याच्या बराच काळ आधी भारतीय जनता पक्षाने जाणीवपूर्वक दोन राज्यांवर लक्ष केंद्रित केले होते आणि ती राज्ये होती पश्‍चिम बंगाल व तमिळनाडू. दोन्हीकडे प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत. पण, एक फरक असा, की तमिळनाडूत राष्ट्रीय पक्षांना स्वतंत्र स्पेस नाही. पश्‍चिम बंगालमधील चित्र वेगळे आहे. तेथे तृणमूल काँग्रेस नावाप्रमाणेच मुळापर्यंत रुजला असला, तरी डावे पक्ष, भाजप, काँग्रेस यांचेही स्थान दुर्लक्षिण्याजोगे नाही. या राज्यात सोमवारी मतदानाच्या चौथ्या टप्प्यात असनसोल परिसरात हिंसाचार उफाळून आला आणि अवघ्या देशाचे लक्ष त्याकडे गेले. असनसोल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बाबुल सुप्रियो व ‘तृणमूल’चे कार्यकर्ते यांच्यात मारामारी झाली. सुप्रियो यांच्या मोटारीवर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत असून, आपल्याला आपल्याच मतदारसंघात जायला हे कार्यकर्ते आडकाठी करत होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. राजकीय हिंसाचार हा लोकशाहीला असलेला सर्वांत मोठा धोका. दुर्दैवाने त्याची एक पठडीच येथे तयार झाली असून, डाव्या आघाडीच्या सरकारला पूर्वी याच मुद्यावर धारेवर धरणाऱ्या तृणमूल काँग्रेसने आता स्वतःदेखील ती आत्मसात केल्याचे दिसते. पण, आधीच हिंसाचारग्रस्त असलेल्या या राज्यातील राजकारणाला आक्रमक हिंदुत्ववादाचा अजेंडा घेऊन उतरलेल्या भाजपमुळे आणखी एक धारदार परिमाण मिळाले आहे. एकूणच प्रचाराची भाषाही प्रक्षोभक झाली असून, आपल्या कार्यक्रमापेक्षा प्रतिस्पर्ध्यांवर घणाघात, असे त्याचे स्वरूप झाले आहे.

उत्तर प्रदेश, तसेच महाराष्ट्र यांच्या पाठोपाठ ४२ खासदार लोकसभेत पाठवणारे हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य. त्यामुळे तेथील घडामोडींची दखल घ्यायला हवी. या राज्यात गेल्या वेळी भाजपला भले १७ टक्‍के मते मिळाली असली, तरी त्यांचे अवघे दोनच खासदार निवडून आले होते. २०१४ मध्ये ४२ पैकी ३४ जागा जिंकताना ममतादीदींनी ३९ टक्‍के मते मिळवली होती. तर, त्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २९५ पैकी २११ जागा जिंकणाऱ्या ‘तृणमूल’ची मते वाढून ४४ टक्‍क्‍यांवर गेली होती. त्यामुळे ममतादीदींनी ‘एकला चलो!’ अशी भूमिका घेतली आणि सामना चौरंगी झाला. तो संघर्ष किती विकोपाला गेला आहे, याची झलक फक्त आसनोलमध्ये दिसली. लोकसभेच्या चौथ्या फेरीचे मतदान सोमवारी सुरू असताना तेथे दंगे झाले. या भागाला दंगे हा प्रकार मुळीच नवा नाही. गेल्या वर्षी रामनवमीच्या दिवशीच मिरवणुकीच्या प्रश्‍नावरून हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण झाला होता आणि त्यातून असनसोल-राणीगंज परिसरात उफाळलेल्या दंगलीत पाच जण हकनाक मृत्युमुखी पडले. ‘या दोन समाजांत तेढ वाढवण्याचे काम भाजप कार्यकर्ते करत आहेत,’ असा आरोप ममतादीदींनी केला आहे. सोमवारच्या प्रकारानंतर मतदारांना मतदान केंद्रावर येण्यास ‘तृणमूल’चे कार्यकर्ते प्रतिबंध करत असल्याचा आरोप बाबुल सुप्रियो यांनी केला. तसे असेल, तर ते निषेधार्हच आहे; परंतु हा सारा ‘खेळ’ ममतादीदींच्या राजवटीत बंगालमध्ये हिंसाचार वाढला, हे दाखवण्याचा एक प्रयत्नही असू शकतो. अवघ्या आठ-दहा दिवसांपूर्वीच ‘पश्‍चिम बंगालमधील परिस्थिती १५ वर्षांपूर्वीच्या बिहारची आठवण करून देणारी आहे,’ असे विधान या राज्यासाठी नियुक्‍त करण्यात आलेले निवडणूक आयोगाचे विशेष निरीक्षक अजय नायक यांनी केले, हे नोंद घेण्याजोगे आहे. एकीकडे निवडणूक आयोग हा केंद्र सरकारच्या हातातील बाहुले होत चालल्याचा आरोप होत असतानाच, नायक यांच्या या विधानामुळे ममतादीदी खवळून उठल्या होत्या आणि नायक यांना त्वरित पश्‍चिम बंगालमधून माघारी बोलावण्यात यावे, अशी मागणी ‘तृणमूल’च्या नेत्यांनी केली होती. आता पश्‍चिम बंगालमध्ये उर्वरित तीन फेऱ्यांचे मतदान बाकी असल्यामुळे खरे तर नायक यांचीच जबाबदारी वाढली आहे. पश्‍चिम बंगालमधील लढती या तिरंगी नव्हे, तर चौरंगी आहेत. कोणे एकेकाळचा ‘लाल बंगाल’ भगवा करून सोडण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या भाजपच्या विरोधात ‘तृणमूल’, काँग्रेस, तसेच डावे कम्युनिस्ट असा हा सामना असला, तरी भाजपविरोधक बहुतांशी स्वतंत्रपणे लढत आहेत. पंतप्रधानांनी सोमवारी प्रचारसभेत तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार निवडणुकीनंतर आमच्या छावणीत येतील, असा दावा केला, त्यावरून प्रचारयुद्धाच्या एकूण स्वरूपाची कल्पना यायला हरकत नाही. एकेकाळी पश्‍चिम बंगाल हे राज्य ‘बंगाली जादू’मुळे ओळखले जात होते. आता हा ताणतणाव आणि हिंसाचार या पार्श्‍वभूमीवर तेथे नेमकी कोणाची ‘जादू’ चालते, ते बघायचे! त्यावर ममता बॅनर्जी यांची केंद्रातील भूमिका काय असणार, हे ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com