मोदीविरोधाची बेरीज (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

विरोधी आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे दिसत असून भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल. सध्या अवघा मोदीविरोधक मेळवावा या सूत्राने सुरू असलेल्या प्रयत्नांना पर्यायी कार्यक्रमाचीही जोड द्यावी लागेल.

विरोधी आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे दिसत असून भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल. सध्या अवघा मोदीविरोधक मेळवावा या सूत्राने सुरू असलेल्या प्रयत्नांना पर्यायी कार्यक्रमाचीही जोड द्यावी लागेल.

चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या संसदेच्या पूर्ण अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला -‘एनडीए’ बिहारमधील नेते उपेन्द्रकुमार कुशवाह यांनी धक्का दिला आहे. लोकसभा निवडणुकीची पूर्वपरीक्षा म्हणून अटीतटीने लढवलेल्या विधानसभा निवडणुकांच्या मंगळवारी जाहीर होणाऱ्या निकालांकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असतानाच, कुशवाह यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, त्यामुळे सोमवारी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला आयतेच बळ प्राप्त झाले. अर्थात, लोकसभा निवडणुकीतील या संभाव्य ‘गठबंधना’चे पडघम कर्नाटकात भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर राखण्यात काँग्रेस यशस्वी झाली, तेव्हापासूनच वाजू लागले होते! एच.डी. कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला उपस्थित राहिलेल्या देशभरातील प्रमुख विरोधी नेत्यांनी हातात हात घालून, त्याची प्रचिती आणून दिली होती. मात्र, राजधानीत संसद अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या बैठकीकडे पाठ फिरवून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती तसेच समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश सिंग यांनी आपण उत्तर प्रदेशात वेगळी चूल मांडू इच्छितो, याचेच संकेत दिले. तरीही ‘आम आदमी पार्टी’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची या बैठकीस असलेली उपस्थिती बेरजेच्या नव्या राजकारणाची चाहूल देऊन गेली, हेच खरे!
विरोधी पक्षांच्या या बैठकीला पार्श्‍वभूमी होती, ती पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या ‘एक्‍झिट पोल’ची! भाजपचा पराभव किमान राजस्थानमध्ये तरी अटळ असल्याचा कौल या ‘पोल ऑफ पोल्स’मधून बाहेर आल्यामुळे विरोधी पक्ष आणि विशेषत: काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच रविवारी सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, तसेच कनिमोझी आणि राजा यांनी त्यांची तसेच राहुल गांधी यांची भेट घेतल्याने या विरोधी ऐक्‍याच्या राजकारणाला गती मिळाली होती. राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर स्टॅलिन यांनी जातीने केजरीवाल यांची भेट घेतली आणि काँग्रेसविरोधी राजकारण सोडून दिल्याचे त्यांना पटवून दिले, असे सांगण्यात येते. केजरीवाल यांची या बैठकीतील उपस्थिती भाजप आणि विशेषत: मोदी विरोधासाठी ऐक्‍य किती गरजेचे आहे, हेच दाखवून देणारी आहे. याच पार्श्‍वभूमीवर एकेकाळचे नितीश कुमार यांचे ज्येष्ठ सहकारी शरद यादव यांनी लालूप्रसाद यादव यांची इस्पितळात भेट घेतली. ‘एनडीए’तून बाहेर पडलेले कुशवाह यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली. विरोधकांच्या या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता तो एकेकाळचे ‘एनडीए’चे निमंत्रक आणि भाजपचा दक्षिणेतील हुकमी एक्‍का समजल्या जाणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांनी. शरद पवार तसेच ममता बॅनर्जी असे काही बडे नेतेही या बैठकीस उपस्थित होते.
अर्थात, इतक्‍या मोठ्या देशात अस्मितेच्या जोरावर उभे राहिलेल्या सर्वच प्रादेशिक पक्षांचे ‘गठबंधन’ होईल, असे गृहीत धरणेच चुकीचे आहे; कारण प्रत्येक पक्षाला आपल्या जागा वाढवायच्या तर असतातच, शिवाय आपल्या पक्षाचा विस्तार यानिमित्ताने करावयाचा असतो. त्यामुळेच शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे विरोधकांचे खरे ऐक्‍य हे निवडणुकांच्या निकालांनंतरच होऊ शकते. अर्थात, काही राज्यांत स्थानिक पक्षांची वेगळी आघाडी होऊ शकते आणि उत्तर प्रदेश हे त्याचे मासलेवाईक उदाहरण आहे. मायावती तसेच अखिलेश यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला; कारण त्यांच्याच हातात या घडीला त्या राज्यातील विरोधी राजकारण आहे. त्यांना सोबत आणखी कोणाला घेऊन आपले बळ त्याच्या वाट्याला द्यावे, असे वाटत नसल्यास त्यात गैर ते काय? खरा मुद्दा लोकसभा निकालांनंतर तरी या सर्व विरोधकांचे ‘महागठबंधन’ होऊ शकते का, हा आहे. त्याचे वातावरण निर्माण होत असले आणि सध्या अवघा मोदीविरोधक मेळवावा या सूत्राने सुरू असलेल्या प्रयत्नांना पर्यायी कार्यक्रमाचीही जोड द्यावी लागेल.

उत्तर प्रदेशातील या दोन नेत्यांच्या संभाव्य आघाडीस शिवपाल यादव यांनी भगदाड पाडण्याचा प्रयत्न रविवारीच लखनऊमध्ये एक मोठी ‘रॅली’ घेऊन केला. मुख्य म्हणजे दस्तुरखुद्द मुलायमसिंग यांनीही आपल्या ‘छोटी बहू’सह त्या मेळाव्यास हजेरी लावली. याचा अर्थ आता समाजवादी पक्षावर कब्जा करण्यासाठी बाप आणि बेटा यांच्यातील लढाई ऐन निवडणुकीच्या मोसमात सुरू झाली आहे. ते भाजपच्या पथ्यावरच पडणारे आहे. तसाच प्रकार हरयाणात लोकदलाला भगदाड पाडण्यासाठी ओमप्रकाश चौटाला यांचे नातू दुष्यंत यांनी नव्या पक्षस्थापनेची घोषणा करून केला आहे. निवडणुकीत असे अनेक प्रकार बघायला मिळू शकतात आणि त्यांच्या मागे पडद्याआडून भाजपच्या कारवाया असतील, असे गेल्या चार वर्षांतील अनुभवामुळे सहज म्हणता येते! पण तरीही विरोधी आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे दिसत असून भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल.

Web Title: loksabha election and bjp in editorial