चतुरस्र गांधीवादी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

रा. चिं. ढेरे यांचे "लज्जागौरी', नरहर कुरुंदकरांचे "अद्वितीय राजा शिवाजी' आदींची हिंदीतून देशाला ओळख करून दिली. अमृता प्रीतम यांचे "रसिदी टिकट' मराठीत आणले. संतकवी तुलसीदासांचा महाराष्ट्रीय शिष्य जनजसवंत यांची देशाला ओळख करून दिली

महात्मा गांधींचे अहिंसा-सत्याग्रहाचे विचार, साने गुरुजींच्या मातृहृदयी प्रेमाचा ओलावा, राष्ट्र सेवा दलाचा प्रागतिक विचार तळागाळात नेण्यासाठी आयुष्याची पाच-सहा दशके व्यतीत केलेले प्रा. डॉ. मुरलीधर बन्सीलाल म्हणजे मु. ब. शहा ऊर्फ भाई यांच्या निधनाने त्या परंपरेतला खानदेशी दुवा निखळला आहे. राष्ट्रीय एकात्मतेवर बेतलेली साने गुरुजींची आंतरभारती संकल्पना पुढे नेणारे, यदुनाथ थत्ते, परीट गुरुजींच्या खांद्याला खांदा लावून सेवा दलात तरुणांच्या पिढ्या घडविणारे, प्रकाशभाई मोहाडीकरांसोबत साने गुरुजी कथामालेचा परिघ विस्तारणाऱ्या भाईंची नोंद इतिहासात व्यासंगी, चतुरस्र गांधीवादी म्हणून नक्‍कीच राहील. महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक, नंतर विभागप्रमुख असे 38 वर्षे विद्यादानाचे कार्य करणाऱ्या भाईंनी गांधीविचारांबाबत खरेतर ऐंशी वर्षांचे संपूर्ण आयुष्य लोकशिक्षणाला, राष्ट्रीय एकात्मतेला वाहिले आणि महत्त्वाचे म्हणजे गांधीविचारांचा प्रसार, त्यासाठी वक्‍तृत्व, नेतृत्व, संघटन आणि सोबतच लिखाण, समीक्षा अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये मुशाफिरी, त्यातही अत्युच्च आदर मिळविणाऱ्या हिंदी व मराठी साहित्यविश्‍वांमध्ये सांगड घालण्याचे मोठे कार्य केले. त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाचा हा फारशी चर्चा न झालेला पैलू. त्यासाठी त्यांनी महात्मा फुले, सेनापती बापटांच्या चरित्राचा हिंदीत अनुवाद केला. रा. चिं. ढेरे यांचे "लज्जागौरी', नरहर कुरुंदकरांचे "अद्वितीय राजा शिवाजी' आदींची हिंदीतून देशाला ओळख करून दिली. अमृता प्रीतम यांचे "रसिदी टिकट' मराठीत आणले. संतकवी तुलसीदासांचा महाराष्ट्रीय शिष्य जनजसवंत यांची देशाला ओळख करून दिली. जैन कवी समय सुंदर यांची "मृगवती चऊपई' ही कलाकृतीही नव्याने समाजासमोर आणली.

मूलभूत संशोधनांसाठी नावाजल्या जाणाऱ्या धुळ्यातील वि. का. राजवाडे, का. स. वाणी आदी संस्थांची धुरा शहा यांनी अनेक वर्षे सांभाळली; पण केवळ पदाधिकारी म्हणून ते मिरवले नाहीत, तर राजवाडेंच्या समग्र साहित्याचे तेरा खंड प्रकाशित केले. वाणी संस्थेच्या कार्याला साहित्यकृतीची महिरप दिली. राष्ट्रभाषा समितीचे काम पुढे नेताना आणि विविध भाषांमधील इतकी मोठी ग्रंथसंपदा लिहितानाही ते केवळ ग्रंथांमध्ये रमले नाहीत. जिथे जिथे प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची गरज भासली, तिथे बाह्या सरसावून समाजपरिवर्तनाच्या लढाईतही ते उतरले. बाबा आमटेंच्या "भारत जोडो यात्रे'त, मेधा पाटकरांच्या "नर्मदा बचाव आंदोलना'त शहांमधला कार्यकर्ता थेट मैदानात उतरला. आपल्या परीने परिवर्तन घडविण्याचा, मने जोडण्याचा, सर्वसामान्यांच्या वेदना वाटून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

Web Title: m b shaha obituary