दृष्टिकोन : सैन्यकपात ते सैन्याचे आधुनिकीकरण

प्रत्येक देशाच्या इतिहासात काही घटना अशा घडत असतात, की त्यावेळेला काळाच्या चक्राने एक वर्तुळ पूर्ण केल्याचे बघायला मिळते.
Rajnath Singh
Rajnath SinghSakal
Summary

प्रत्येक देशाच्या इतिहासात काही घटना अशा घडत असतात, की त्यावेळेला काळाच्या चक्राने एक वर्तुळ पूर्ण केल्याचे बघायला मिळते.

गेल्या ७५ वर्षांमध्ये देश खूप पुढे गेला आहे. परिस्थितीही बदलत आहे. पण कॉंग्रेस नेते बदलायला तयार नाहीत. त्यामुळेच संरक्षणसिद्धता मजबूत करणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या विरोधात भूमिका घेऊन ते गदारोळ माजवत आहेत. युवकांना जी संधी मिळणार आहे, ती त्यांना हिरावून घ्यायची आहे का?

प्रत्येक देशाच्या इतिहासात काही घटना अशा घडत असतात, की त्यावेळेला काळाच्या चक्राने एक वर्तुळ पूर्ण केल्याचे बघायला मिळते. सध्या आपल्या देशात अशा काही घटना घडत आहेत, की त्यांचा अन्वयार्थ लावताना याचा प्रत्यय येताना दिसतो. २२ ऑक्टोबर १९४७ रोजी पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. तेव्हा आपल्याला व पाकिस्तानला दोघांनाही स्वातंत्र्य मिळून केवळ दोन महिने झाले होते. सुमारे दहा महिने चाललेले हे युद्ध संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीमुळे जानेवारी १९४९ मध्ये संपले. त्या युद्धात भारताचे ११०४ जवान मारले गेले आणि ३१५४ जखमी झाले होते. त्यापूर्वी, सप्टेंबर १९४७मध्ये भारताच्या सेनेचे तेव्हाचे प्रमुख जन. लॉकहार्ट यांनी पंतप्रधान नेहरुंना एक टिपण सादर केले होते. ‘नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला कोणकोणत्या बाजूने आक्रमणाचे धोके आहेत व त्याबाबत संरक्षणाविषयी काय उपाययोजना केल्या पाहिजेत,’ ह्याची चर्चा त्या टिपणात केली होती. ते टिपण हातात घेतल्यानंतर त्याचे शीर्षक बघितल्याबरोबर पं.नेहरू लॉकहार्ट यांच्यावर जवळजवळ खेकसलेच आणि “Rubbish! Total rubbish! We don’t need a defence plan. Our policy is Ahimsa. We foresee no military threats. Scrap the Army. The police is good enough to meet our security threats” असे त्यांनी आपल्या सेनाप्रमुखाला बजावले. त्यावेळी जन. लॉकहार्ट यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारे मे.जन.रुद्र यांनी आपल्या आठवणींमध्ये ही घटना नोंदवली असून डी.के.पलीत यांनी आपल्या ‘War in High Himalya: The Indian Army crisis 1962’ ह्या पुस्तकातही या घटनेचा उल्लेख केला आहे.

तत्कालिन पंतप्रधान व सेनाप्रमुख यांच्यातील ह्या ‘संवादा’नंतर महिन्यात पाकिस्तानने आक्रमण केले. त्याचा मुकाबला करण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. त्या सुमाराला चीनमध्ये माओच्या नेतृत्वाखाली क्रांती घडवून आणून कम्युनिस्ट पार्टी सत्तेवर आली होती. भारत सरकारने त्या घटनेचे स्वागत करून नव्या राजवटीला मान्यताही दिली होती. नव्याने सत्तेवर आलेले कम्युनिस्ट प्रथम आपली राजवट अंतर्गतदृष्ट्या स्थिरस्थावर करण्याच्या कामाला लागतील, असे पं.नेहरूंचे म्हणणे होते. पण, तसे न घडता ऑक्टोबर १९५०मध्ये चीनने तिबेट गिळंकृत केले. चीन थेट भारताच्या सीमेवर येऊन उभा राहिला. शिवाय त्याने आपल्या सीमेमध्ये घुसखोरी सुरू केली. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर १९५०मध्ये संसदेत बोलताना ‘सेनादले व संरक्षणावर होणारा खर्च अनाठायी असून त्यात कपात करण्याची’ घोषणा पं.नेहरूंनी केली. केवळ घोषणा करून अथवा इरादा व्यक्त करून पं.नेहरू थांबले नाहीत, तर संरक्षणखर्चामधील कपातीचा एक भाग म्हणून १९५१च्या सुरुवातीलाच त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता ५० हजार सैनिकांना ‘सेवामुक्त’ केले. या सैनिकांना ‘तडकाफडकी सेवामुक्त’ केलेले असल्यामुळे सेवानिवृत्तीनंतर मिळणारे कोणतेही आर्थिक लाभ त्यांना मिळाले नाहीत. त्या वर्षीच्या मार्च अखेरपर्यंत आणखी एक लाख सैनिकांना सेवामुक्त करण्याचा मनोदयही पं.नेहरूंनी बोलून दाखवला होता. त्यांची ती योजना मात्र बारगळली. त्यानंतर चीनने भारताच्या हद्दीतून १६७ कि.मी. लांबीचा महामार्ग बांधला. अनेक चौक्या उभ्या केल्या, अक्साई चीन बळकावला आणि एवढे उद्योग करून १९६२मध्ये भारतावर युद्ध लादले.

‘अग्निपथ - अग्निवीर’ योजनेला सोनिया गांधी व राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ज्या पद्धतीने विरोध करत आहे, ते पाहात असताना ह्या सर्व घडामोडी आठवणे अपरिहार्य आहे. साडेसतरा ते तेवीस वयोगटातील युवक युवतींना सेनेत काम करण्याची संधी देणारी ही योजना केंद्राने जाहीर केल्याबरोबर सोनिया व राहुल गांधी त्याविरोधात तुटून पडले. १९५१मध्ये पन्नास हजार जवानांना कसलेही लाभ न देता ‘सेवामुक्त’ करणारी काँग्रेस आज ह्या युवकांच्या ‘भवितव्या’बद्दल चिंता व्यक्त करत आहे. त्यावेळेला कॉंग्रेसने ज्यांना सेवामुक्त केले होते, ते सर्व सैनिक वयाने चाळीशीच्या पुढे गेले होते. त्यांना नवी नोकरी मिळण्याची शक्यता नव्हती आणि कोणतेही निवृत्तीचे आर्थिक लाभही मिळाले नव्हते. त्यामुळे काही गुंतवणूक करून लहानमोठा व्यवसाय सुरु करण्याची संधी त्यांना नव्हती.

गेल्या काही दिवसात ‘अग्निवीर’ योजनेचे तपशील सरकार व सेनादलांनी जाहीर केले आहेत. त्यावरून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. त्यातील पहिली म्हणजे ही योजना युवावर्गाला अनेक नव्या संधींचे दरवाजे उघडून देणार आहे. ही एका अर्थाने ‘भत्त्यासह प्रशिक्षण’ देणारी योजना आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या सर्वाना चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर लष्करापासून पोलीस दल, निमलष्करी दले अशा विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात. चार वर्षे घेतलेले सैनिकी प्रशिक्षण हे त्यांच्यासाठी निर्णायक ठरू शकते. ज्या प्रशिक्षणासाठी खाजगी ‘प्रशिक्षण संस्था’ ह्या युवकांकडून लाखो रुपये उकळतात तेच प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून युवकांना केवळ मोफत मिळणार नसून ते घेण्यासाठी सरकारकडून एक प्रकारे ‘प्रशिक्षण भत्ता’ मिळणार आहे. तिसरा मुद्दा म्हणजे, हे प्रशिक्षण घेत असतानाच ज्यांना बाहेरुन परीक्षा देऊन पदवी मिळवायची आहे, त्यांना ती मुभा दिली जाईल. अशी पदवी मिळवणाऱ्यांना अर्थातच सेनादलांमध्ये आकर्षक संधी उपलब्ध होतात. त्याखेरीज या योजनेमुळे ‘सेनादलांचे सरासरी वय’ अधिक तरुण होणार आहे. सेनादलांमध्ये तरुणांची संख्या अधिक असणे आवश्यक आहे, अशी शिफारस कारगिल युद्धानंतर केली गेली होती. आज तीन दशकांनंतर ती अंमलात येत आहे.

स्वा.सावरकरांनी तरुणांना सेनेत भरती होण्याचे आवाहन केले होते. नेताजी सुभाषचंद्र बोसदेखील त्याच पद्धतीचे विचार मांडत होते. केंद्र सरकारची ‘अग्निपथ -अग्निवीर’ योजना या दोन्ही नेत्यांची स्वप्नपूर्ती करू पाहाणारी योजना आहे. बहुतेक प्रगत देशांमध्ये अशा स्वरुपाची काही ना काही व्यवस्था आहे. राहुल गांधींनी ज्या चीनबरोबर गुप्त करार केलेला आहे, त्या चीनमध्ये तर ही व्यवस्था सर्व युवावर्गाला अनिवार्य आहे. आपले सरकार ऐच्छिक योजना घेऊन आले आहे. आज सैन्य सक्षम आणि आधुनिक असणे ही काळाची गरज आहे. ‘ही योजना दिशाहीन आहे’ असे सोनिया गांधी म्हणतात. त्याचा अर्थ काय हे त्याच सांगू शकतील. पण राहुल गांधी व काँग्रेस ज्या पद्धतीने आक्रमक गदारोळ माजवून विरोध करीत आहेत, त्यावरून त्यांच्या विचारांच्या दिशा मात्र स्पष्ट होतात.

सोनिया व राहुल गांधी यांनी घेतलेल्या विरोधाच्या भूमिकेनंतर या योजनेला विरोध करणारी आंदोलने देशाच्या वेगवेगळ्या भागात एकाच वेळी सुरु झाली व त्यात संघटित पद्धतीने जाळपोळ, हिंसाचार झाला. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. या योजनेमुळे दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त युवकांना प्रशिक्षणासह रोजगार मिळणार आहे. ही संधी युवकांना मिळू नये, यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस या योजनेला विरोध करीत आहे का? त्याचप्रमाणे आपली सेनादले मजबूत बनवण्यासाठी आखलेली योजना सोनिया गांधींना ‘दिशाहीन’ वाटत असेल, तर त्यांच्या टीकेमागे दडलेला अर्थ समजण्याइतकी जनता सूज्ञ आहे. गेल्या ७५ वर्षांमध्ये देश खूप पुढे गेला आहे. पण नेहरूंपासून सोनिया गांधी, राहुल गांधींपर्यंत काही जणांच्या विचारांची दिशा मात्र तीच राहिली आहे. म्हणूनच ‘सैन्यकपातीपासून सैन्यभरती, सैन्याचे आधुनिकीकरण करण्यापर्यंत इतिहासचक्राने वर्तुळ पूर्ण केले आहे.

(लेखक महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष आहेत.)

madhav.bhandari@yahoo.co.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com