यशाची नव्या दिव्य आशा असे!

madhav gadgil
madhav gadgil

आजच्या स्मार्टफोनच्या नवयुगात कोट्यवधी मराठी भाषक रात्रंदिवस मराठीत लिहिताहेत, मराठी वाचताहेत. अलीकडे बळावलेला संस्कृतप्रचुर, क्‍लिष्ट प्रमाण मराठी भाषेचा दुराग्रह बाजूला सारून सर्वसमावेशक, समृद्ध आणि सुबोध मराठी घडविण्याची ही सुवर्णसंधी आहे.

माणसासारखेच डोकेबाज आणि बडबडे देवमासे तोंडाची वाफ अजिबात फुकट दवडत नाहीत ! त्या वाफेच्या बुडबुड्यांचे जाळे विणत त्यात आपल्या सावजांना गिरफ्तार करतात. जगातले सर्वांत प्रचंड मेंदू शिकारी देवमाशांच्या डोक्‍यात आढळतात. शिवाय त्यात माणसाच्या मेंदूतल्या आत्मभान, साथीदारांबरोबरची वागणूक, भावना ठरविणाऱ्या पेशींसारख्या पेशी आढळतात. साहजिकच देवमासे एकमेकांकडून शिकत, एकमेकांना शिकवत राहतात. हम्पबॅक देवमाशाची बुडबुड्यांच्या जाळ्यात मासे पकडण्याची प्रणाली अशा परस्परसंवादांतून उमलली आहे; काही विवक्षित गटच ही शक्कल वापरतात. कुठेतरी चिक्कार झिंगे, मासे दिसले की त्यांच्या खाली जाऊन एखादा हम्पबॅक आपल्या नाकातून हवा सोडत बुडबुडे निर्माण करायला लागतो आणि आपल्या सवंगड्यांना ‘जाळे विणायला चला’ म्हणून आवाज देतो. शिताफीने पोहत-पोहत अशा २-३ पासून २५-३० जणांच्या झुंडी ३ ते ३० मीटर व्यासाची नळकांड्याच्या आकाराची बुडबुड्यांची जाळी बनवून आपल्या खाद्याला त्यात अडकवतात. भरपूर सावजे सापडली की एक हम्पबॅक ‘चढवा हल्ला’ म्हणून आरोळी देतो आणि सगळे खाद्यावर तुटून पडतात !

देवमासे वाचाळ आहेत खरे, पण मनुष्यप्राणी त्यांच्या किती तरी पट वेगवेगळे सूर काढत, ते एकाला एक जोडत नानाविध संदेश निर्माण करतो. हम्पबॅकप्रमाणेच मानवाची संवादशक्ती टोळीने शिकार करताना विकसित झाली. साठ हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या माळरानावरच्या आठ-दहा हजारांच्या समुदायातून मानवाची समृद्ध भाषा अवतरली; तेव्हा सगळे एकच, आदिम भाषा वापरत असणार. मग यशस्वी मनुष्यजात जसजशी फैलावली, तसतसे वेगवेगळ्या समुदायांतले संपर्क तुटत जाऊन एकमेकांना न समजणाऱ्या नवनव्या भाषा उपजल्या. शेतीची सुरवात होण्यापूर्वी एकेका एकसंध समुदायात एकच बोली बोलली जात होती. पण कृषिप्रधान समाजात उच्च-नीचतेची भावना निर्माण झाली आणि काही बोली वरच्या दर्जाच्या, इतर खालच्या दर्जाच्या अशी वर्गवारी सुरू झाली.  

भारतातल्या प्राकृत, संस्कृत भाषा अशाच रीतीने अस्तित्वात आल्या. दहाव्या शतकातला कवी राजशेखर सांगतो, की प्राकृत याच पूर्वीपासूनच्या भाषा; त्यांच्यातले शब्द आत्मसात करून, त्यांच्यावर संस्कार करून आणि त्यांना नियमबद्ध करून संस्कृत घडवली गेली; त्या संस्कृतला पंडितांनी, राजांनी प्रतिष्ठा बहाल केली. पण संस्कृतच्या साचेबंद व क्‍लिष्ट स्वरूपामुळे सामान्यजनांच्या भावना त्यांच्या प्राकृत बोलींतच व्यक्त होत राहिल्या, म्हणून प्रतिष्ठेची हाव असलेल्या उज्जयनीच्या साहसांक राजासारख्यांना अन्तःपुरात संस्कृतच वापरली पाहिजे अशी सक्ती करावी लागली. प्राकृत भाषांची अकृत्रिम गोडी, सरलता, बालादिबोधकारिता, सर्वजनप्रियता अशा नानाविध गुणांचे कौतुक करत राजशेखर म्हणतो, की संस्कृत काव्य कठोर असून, प्राकृत सुकुमार आहे व त्यांच्या कोमलतेत पुरुष व स्त्री इतके अंतर आहे. मला नुकतीच गडचिरोली जिल्ह्यात भटकताना बहिणाबाईंची एक कविता आठवली आणि हे विधान किती समर्पक आहे हे जाणवले. वसंत ऋतूच्या होलिकोत्सवाचे दिवस होते; सगळ्या रानात पानगळ झाली होती आणि बाकी रखरखीत आसमंतात जिकडेतिकडे पळस बहरले होते. पोपटाच्या चोचीसारख्या लालबुंद, बाकदार फुलांनी डंवरले होते. त्या रम्य दृश्‍याचे बहिणाबाई चौधरी वर्णन करतात; पळसाले लाल फूल, हिरवं पान गेलं झडी। इसरले लाल चोच, मीठ्ठु गेलं कुठं उडी? कोण शहाणा अशा रसाळ, खुमासदार गाण्याला ग्राम्य, अशिष्ट, गावंढळ म्हणून टाकाऊ म्हणेल? एक शिष्टसंमत, सभ्य, प्रमाण भाषा, तर दुसरी अशिष्ट, गावंढळ बोली असे मानणे हा मराठीची निष्कारण नुकसानी करणारा दंभ आहे. दुर्दैवाने तो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर कमी होण्याऐवजी वाढलाच आहे. शंभर वर्षांपूर्वी केतकरांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्र ज्ञानकोशा’तली भाषा प्रगल्भ, पण सुबोध आहे, तर अलीकडच्या दशकांत लिहिल्या गेलेल्या विश्वकोशातील अनेक लेखांची भाषा निष्कारण क्‍लिष्ट आणि दुर्बोध आहे. महाराष्ट्राच्या शासकीय मराठीला तर दळभद्री हे एकच विशेषण योग्य आहे.

गेल्या काही वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात एक नवचैतन्य सळसळत आहे. इथल्या शेकडो गावांनी आपल्या परिसरातल्या वनसंपत्तीवर सामूहिक हक्क कमावला आहे आणि या हक्काचा विवेकपूर्ण वापर करत ते मोह, तेंदू, बांबू, चारोळी, मध अशा मोलाच्या वनोपजांना सांभाळत त्यांचा फायदा उठविण्याचा प्रयत्न करताहेत. शिवाय रासायनिक रंगांमुळे खप घटलेल्या पळसाच्या फुलांच्या नैसर्गिक रंगांसारख्या वनोपजांना मागणी पुन्हा नव्याने वाढते आहे. सुव्यवस्थापनासाठी या सगळ्यांबद्दल पद्धतशीर माहिती संकलित करणे जरुरीचे आहे, कारण आजपावेतो रानच्या मेव्याकडे शास्त्रज्ञांचे दुर्लक्ष होते. या प्रयत्नात लोकांना साथ देत शास्त्रीय काम करण्याची एक वेगळीच खुमारी मी चाखतो आहे. लोकांपासची या विषयावरची मुबलक अनुभवजन्य माहिती ठीक-ठाक संकलित करण्यासाठी तक्ते बनवून ते भरून घेण्यासाठी मी येरंडी नावाच्या छत्तीसगडच्या सीमेवरच्या छोटेखानी गावात तिथल्या युवक-युवतींच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो. मी अजून जुन्या जमान्यात असल्यामुळे म्हटले, की प्राथमिक तक्ता ई-मेलने पाठवला आहे, त्याच्या प्रती छापून आणा. माझे मित्र म्हणाले, ‘अरे, याची काय जरूर आहे? आता इथल्या बहुतेक मुला-मुलींकडे स्मार्टफोन आहेत. तुझा मराठी युनिकोडमधला तक्ता त्यांना पाठवला आहे. सर्वांच्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोनवर काम करता करता आपण त्या तक्‍त्यात हवे ते बदल करूया. जरूर ती माहिती भराभर भरत राहूया.’ काम चालू केले; मग एक विषय निघाला, वेगवेगळ्या आकारांच्या चारोळ्या निवडून त्यांची प्रतवारी लावायची याला काय शब्द वापरता? म्हणाले, ‘याला तर आम्ही छाटणी म्हणतो.’ झाले, मूळ तक्‍त्यात सॉर्टिंगच्या बदली तो शब्द टाकला. काम करता करता असे अनेक शब्द शिकत राहिलो. नंतरचा एक विषय होता, मोहाची फुले कुठल्या महिन्यात गोळा केली जातात? मंडळी हसत म्हणाली, ‘मोहाची फुलं कुणी गोळा करत नाहीत, ती वेचतात!’ मला भवानीशंकर पंडितांच्या ओळी आठवल्या- वेगवेगळी फुले वेचुनी, रचुनी त्यांचे झेले, एकमेकांवरी उधळले, गेले ते दिन गेले. मी अशीच अस्सल मराठीची शब्द्‌पुष्पे वेचत होतो, त्यांचे झेले रचण्याचे दिवस गेलेले नव्हे, तर नव्याने उगवताना पाहत होतो. आजच्या सहज संवादाच्या युगात खुल्या दिलाने सर्वांशी संवाद साधत आपण निष्कारण दुर्बोध होत चाललेल्या मराठीला सुबोध, समृद्ध बनवू शकू. नव्या पिढीतल्या गावोगावच्या बहिणाबाईंना त्यांच्या बोलीत आपापल्या प्रतिभेचे आविष्कार सगळ्या मराठी भाषकांपुढे आणायला प्रोत्साहन देऊ शकू. मग माधव ज्युलियनांबरोबर बजावता येईल: नसो आज ऐश्वर्य ह्या माउलीला, यशाची नव्या दिव्य आशा असे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com