मिलकर समझ बढाना!

madhav gadgil
madhav gadgil

निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या, त्यावर तऱ्हेतऱ्हेने अवलंबून असणाऱ्या लोकांनाच निसर्गाच्या वेगवेगळ्या पैलूंचा खोलवर समज असतो; एकवटला की असा समज तज्ज्ञांच्या समजाहूनही सरस असतो. तेव्हा लोकांच्या आकलनाला मोल देऊन, त्यांना सहभागी करून निसर्गसंपत्तीचे व्यवस्थापन करणे हाच मार्ग श्रेयस्कर आहे.

पंबा नदी केरळच्या संस्कृतीचं माहेरघर आहे. याच नदीत सर्पनौकांच्या प्रसिद्ध शर्यती दरवर्षी मोठ्या उत्साहात होतात. केरळातल्या एका मैत्रिणीच्या, सजनीच्या आईचं घर पंबाच्या तीरावर आहे. ऑगस्टच्या मध्यावर केरळात महाप्रलय सुरू झाला आणि सजनीचा फोन आला की तिच्या आईच्या घराचा पहिला मजला पाण्याखाली गेला आहे आणि ती जीव मुठीत धरून दुसऱ्या मजल्यावर राहते आहे. या महाप्रलयाच्या वेळी नदीचं पाणी इतक्‍या जोरात वाहत होतं, की लोकांच्या माहितीत प्रथमच पंबा नदीचा पूर्ण तळ खरवडून निघून दगडांचे कणकण संपूर्ण पाण्यात भरले गेले आणि ते पाणी जिथं जिथं शिरलं, तिथं दगडकण आणि चिखलाचा अजब थर बसला. आधीचे काही आठवडे भरपूर पाऊस पडत असतानाही हे सगळं पाणी वरच्या धरणांत साठवून ठेवलं आणि अचानक सोडलं, त्यामुळं असा अभूतपूर्व महाप्रलय आला, अशी सगळ्या लोकांची खात्री होती; पण नेते आणि "बाबू' सांगत राहिले, की आम्ही धरणांमध्ये पाणी अगदी शास्त्रशुद्ध रीतीनं, शिस्तीनं साठवत होतो आणि मग ते एकदम सोडलं, तोही शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाचा भाग होता. दुसरे काही निष्पक्षपाती तज्ज्ञ सांगत होते, की नाही, धरणांमध्ये पावसाळ्याच्या मध्यावरच इतकं तुडुंब पाणी साठवणं अयोग्य होतं, आधीचे आठवडे जोरदार पाऊस पडत असताना ते हळूहळू सोडणं आवश्‍यक होतं आणि पावसाळ्याच्या अखेरीस धरणे भरली असतील, अशा रीतीनं साठवणूक व्हायला हवी होती. लोकांनाही हेच पटत होतं.

धरणातून पाणी कसं साठवावं आणि केव्हा सोडावं हे आम्ही शास्त्रशुद्ध आणि शिस्तबद्ध रीतीनं ठरवतो, हा या इंजिनियरांचा दावा ऐकल्यावर चाळीस वर्षांपूर्वीचा एक अनुभव आठवला. चैत्र महिन्यात शहाद्याजवळच्या गावात एका भिल्ल शेतकऱ्याच्या घरी राहिलो होतो. त्याच्याबरोबर सकाळ, दुपार, संध्याकाळ भाकरी, कांदा, लसणीचं तिखट खात होतो, कोरा चहा पीत होतो. तिसऱ्या दिवशी सकाळी तो म्हणाला, "आता तुला काहीतरी गोड रसाळ खायला नक्कीच आवडेल. इथून दहा मैलावर तापीच्या वाळवंटात माझे काही मित्र टरबूज-खरबुजाची शेती करतात. तिथं जाऊ. ताजी टरबुजं- खरबुजं खायला मस्त मजा येईल.' खरंच त्या फराळाची खुमारी काही आगळीच होती. टरबुजं खाताना लोकांची काहीतरी कुजबूज ऐकू आली ः तो इंजिनियर तुमच्या गावात येऊन वसुली करून गेला का? मी विचारलं, "कसली हो वसुली?' म्हणाले, "अहो, इथून वरल्या अंगाला धरण आहे. दरवर्षी आमची टरबुजं- खरबुजं पिकायला आली की तिथला इंजिनियर येऊन धमकी देतो. मला घरटी दीडशे रुपये द्या, नाहीतर मी धरणातलं पाणी सोडतो आणि मग पुरात तुमची सगळी शेती वाहून जाईल.' आम्ही मुकाट्यानं हप्ता देतो. मी मनात विचार केला, असंही चालतं तर धरणावरच्या इंजिनियरांचं पाणी सोडण्याचं शास्त्रशुद्ध, शिस्तबद्ध नियोजन!
जगात पुरातन काळापासूनच आपल्या अधिकाराचा, विशेष ज्ञानाचा असा दुरुपयोग करत शासकीय अधिकारी कारभार हाकत आलेले आहेत. कौटिलीय अर्थशास्त्र सांगते, की मासा जितक्‍या सहजतेनं पाणी पितो, तितक्‍याच सहजतेनं अधिकारी लांडीलबाडी करतात, तेव्हा राजानं सावधगिरीनं राहावं. पण भ्रष्टाचार सोडा, 1906मध्ये गाल्टन या संख्याशास्त्रज्ञाच्या डोक्‍यात आलं - तथाकथित तज्ज्ञांपाशी खरोखरच किती जास्त ज्ञान असतं? मग तो इंग्लंडच्या ग्रामीण भागातल्या गुरांच्या बाजारात गेला आणि लोकांना आवाहन केलं, की सांगा हो, या धष्टपुष्ट बैलाचं वजन किती असेल? आठशे लोकांनी असे अंदाज सांगितले; त्यांची सरासरी काढली; आणि मग बैलाचं वजन केलं. गाल्टन चकित झाला, की सर्वसामान्य लोकांच्या अंदाजांची सरासरी होती, 1197 पौंड आणि खरे वजन होते 1198 पौंड. एकही तज्ज्ञाला इतका बरोबर अंदाज करता आला नव्हता. याचा अर्थ काय? तज्ज्ञांनाही काही परिपूर्ण ज्ञान नसतं, त्यांचेही काही कल असतात, त्यामुळं त्यांचेही अंदाज चुकतात. सर्वसामान्य लोकांचेही असेच कल असतात. त्यांचे बहुतांश अंदाज तज्ज्ञांच्या अंदाजांहून जास्त चुकीचे असतात; पण शेकडो लोकांचे अंदाज एकत्र केले, तर सगळ्यांचा मिळून जो सरासरी अंदाज येतो तो वास्तवाच्या खूपच जवळचा असतो. एवंच अनेक सर्वसामान्य लोकांचं ज्ञान संकलित करण्याची शक्‍यता असेल, तर त्यातून जे ज्ञानभांडार निर्माण होतं ते तज्ज्ञांच्या ज्ञानाहून सरस असतं.

जगभरच्या लोकशाहीप्रणालीत हे ओळखलं गेलं आहे. विशेषतः पाण्यासारख्या नैसर्गिक संसाधनांचा विचार केला तर इंजिनियर लोक साहजिकच एकांगी विचार करतात. त्यांच्या डोक्‍यात असतं सिंचन किंवा वीजनिर्मिती; पण पाण्याचे नानाविध उपयोग लोकांच्या जिव्हाळ्याचे आहेत. पिण्यासाठी, इतर घरेलू वापरासाठी, गुराढोरांसाठी, मासे-झिंगे-शंख-शिंपल्यांच्या उत्पादनासाठी, समुद्रातलं खारे पाणी भूजलात घुसणं रोखण्यासाठी, नदीच्या खळखळाटाचा, धबधब्यांचा आनंद उपभोगण्यासाठी. तेव्हा सर्वांगीण दृष्टीनं जलसंसाधनांचा उपयोग व्हावयाचा असेल आणि लोकशाहीत असाच व्हायला पाहिजे, तर सगळ्या लोकांना पाण्याकडे लक्ष ठेवण्यात आणि त्याचा उपयोग कसा करावा, हे ठरवण्यात सहभागी करून घेतलं पाहिजे.

ऑस्ट्रेलियात अशी एक उत्तम योजना आहे, तिचं नाव आहे "पाण्यावरचा पहारा' अथवा इंग्रजीत "वॉटर वॉच'. या योजनेचं ब्रीदवाक्‍य आहे : एक अकेला कुछ भी कहेगा, मिलकर समझ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना! सरकारद्वारे सर्व इच्छुक नागरिकांसाठी पाण्याची गुणवत्ता कशी ठरवावी याचं दोन दिवसांचं साधं-सोपं प्रशिक्षण दिलं जातं. सगळ्या लोकांना आवाहन केलं जातं की तुमच्या परिसरातील तलावांच्या, नदीच्या, पिण्यासाठी व इतर उपयोगांसाठी पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेचा आणि गुणवत्तेचा सातत्यानं अभ्यास करत राहा. ती माहिती आधुनिक संगणकाच्या आणि आंतरजालाच्या साह्यानं देशव्यापी माहिती भंडारात चढवूया. असं माहिती भांडार सर्व लोकांना खुलं असेल. त्याचा अभ्यास करत आपण सगळे मिळून पाण्याच्या वापराचं नियोजन करूया.

पश्‍चिम घाटाची पर्वतराजी हे भारताच्या दक्षिण भूखंडाचं सर्वांत महत्त्वाचं जलभांडार आहे. पश्‍चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाच्या अहवालात आम्ही सुचवलं होतं, की या पर्वतराजीच्या सर्व भागांत अशीच लोकाभिमुख देखरेख व असं लोकसहभागी नियोजन अमलात आणावं. दुर्दैवानं या शिफारशीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आणि एक लोकविन्मुख आणि मर्यादित उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करणारी व्यवस्था चालू ठेवण्यात आली. हट्टानं अनेक आठवडे धरणांत पाणी साठवत ठेवून मग ते अकस्मात सोडल्यावर केरळभर मातलेला महाप्रलय आणि झालेला हाहाकार हा या गैरव्यवस्थेचा परिणाम आहे. आता केरळ विधानसभेत काही आमदारही आमच्या अहवालाचं समर्थन करताहेत; पण त्याची दखल घेऊन सरकारनं अजूनपर्यंत तरी काहीही पावलं उचललेली नाहीत; मला जबरदस्त आशा आहे, की अखेर सरकारही काही धडा शिकून सकारात्मक विचार करू लागेल, एक लोकाभिमुख व्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com