किस्सा आधारवडांचा...

madhav gadgil
madhav gadgil

काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आवश्‍यक अशी शिस्त आणि श्रम बाजूला सारून, शासकीय चाकोरीबाहेरच्या ज्ञानाला डावलून, काहीतरी अधिकारवाणीने ठणकावून द्यायचे ही सरकारची रीत आहे. विज्ञानाधिष्ठित विकासाच्या मार्गावर आगेकूच करायची असेल तर ही चाल बदलावी लागेल.

एकेकाळी मी खूप दिवस निलगिरीलगतच्या बंडीपुराच्या अभयारण्यात निसर्गनिरीक्षणात घालवले. अभयारण्यात तीन पाळीव हत्तीणी होत्या. रात्री त्यांना गळ्यात घंटा बांधून रानात चरायला सोडायचे, तिथेच त्यांना वन्य प्रियकर भेटायचे, पिल्ले व्हायची. पहाटे घंटानादाचा कानोसा घेत माहूत त्यांना हुडकून तळावर परत आणायचे. मी खूपदा त्यांच्याबरोबर प्रभातफेरीला जायचो. एकदा माहूत मला म्हणाले: "या रानात भुईउंबर, नांद्रुक, पाईर, दान्तिरा अशी वड-पिंपळ-उंबरांच्या गोतावळ्यातली झाडे आहेत. हत्तींना यांचा पाला भावतो, आम्ही तो त्यांना खायला घालतो. हे बरोबर नाही. अहो, इतर झाडा-झुडपांना फळे नसतात, अशा दिवसांतसुद्धा त्यांना फळे धरतात. या फळांच्या आधारावर तऱ्हतऱ्हेचे किडे, पाखरं, माकडं, खारी, वटवाघळं तग धरून राहतात. आमच्या तोडीमुळे ही फळं कमी होतात. आता प्राण्यांसाठी राखून ठेवलेल्या जंगलात त्यांचा हा मेवा कमी करणं ठीक नाही.' मी म्हटलं, "हो, अगदी खरं.' मग तीन वर्षांनी टर्बोर्ग नावाच्या शास्त्रज्ञाने खूप गाजलेला शोधनिबंध प्रसिद्ध केला, अन्‌ हा संवाद मला अचानक आठवला. निबंधाचे शीर्षक होते, "कळीची संसाधने'. त्याने अमेझॉनच्या जंगलातल्या वड-पिंपळ कुळातल्या वृक्षांबद्दल म्हटले की या जाती तर जीवसृष्टीच्या आधारवड आहेत. कारण या वर्षभर फळणाऱ्या जातींच्या फळांवरच काही ऋतूंमध्ये अनेक जीवजाती अवलंबून असतात. टर्बोर्गने शास्त्रीय जगताच्या नजरेस आणून दिलेले हे शहाणपण बंडीपुराच्या माहुतांना उमगले होते. एवढेच नव्हे, तर पूर्वीपासून ते आशिया, आफ्रिका, मेलानेशिया अशा विस्तृत प्रदेशाच्या लोकपरंपरांचा भाग असणार. कारण इथे सर्वत्र वड-पिंपळांच्या गणगोतातल्या वृक्षांना पवित्र मानून संरक्षण दिले आहे. भगवान गौतम बुद्धांनाही एका पिंपळाखालीच ज्ञानप्राप्ती झाली.

विवेकवादाचे, वैज्ञानिक विचारसरणीचे आदिम प्रणेते बुद्ध ठासून सांगतात, की त्यांना ज्ञान प्राप्त झाले ते दैवी साक्षात्कारातून नाही, तर जमिनीवरच्या प्रत्यक्ष अनुभवातून. बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीच्या वेळच्या मूर्ती भूमीस्पर्शमुद्रेत आहेत; त्यांच्यात ते आपल्या बोटांनी भूमीच ज्ञानाचा स्रोत आहे हे दर्शवतात. आधुनिक विज्ञानाप्रमाणेच बुद्ध अधिकारवाणी नाकारतात आणि सांगतात ः केवळ मी, किंवा शिक्षकांनी, ज्येष्ठांनी सांगितले आहे, जुनी परंपरा आहे म्हणून कशावरही विश्वास ठेवू नका. काळजीपूर्वक निरीक्षणांतून आणि विश्‍लेषणातून तुमच्या बुद्धीला जे पटते आणि जे सर्वहितकारक वाटते तेच स्वीकारा. जमिनीवरचे प्रत्यक्ष निरीक्षण हाच ज्ञानाचा खराखुरा स्रोत हे बुद्धांचे प्रतिपादन सर्व ज्ञानपरंपरांनी स्वीकारले नाही. आयुर्वेद मानतो की आयुर्वेदाचे परिपूर्ण ज्ञान अश्‍विनीकुमारांकडून ऋषींकडे आणि मग सर्वसामान्य मानवांपर्यंत पोचले आहे. युरोपातही शतकानुशतके बायबल हाच परिपूर्ण ज्ञानाचा स्रोत मानला होता. अशा अधिकारवाणीवर भिस्त ठेवणाऱ्या चौकटीत ज्ञानाचा विकास होऊ शकत नव्हता. मध्ययुगीन युरोपात याला छेद देऊन बायबलची अधिकारवाणी नाकारत प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे ज्ञानवृद्धी सुरू झाली आणि त्याबरोबरच विज्ञानाची घोडदौड सुरू झाली. या विज्ञानाच्या बळावर युरोपीयांनी सगळ्या जगावर कुरघोडी केली.  विज्ञानाला नानाविध पैलू आहेत. भौतिकविज्ञान, रसायनशास्त्र साध्या-सोप्या घटनांचा अभ्यास करते. त्यांचे ज्ञान काटेकोर प्रयोगांतून पडताळता येते, म्हणून ते झपाट्याने वाढत गेले. प्रयोगशाळेत बंदिस्त करता येत नाहीत अशा गुंतागुंतींच्या घटनांचा परिसरशास्त्र अभ्यास करते, त्यामुळे या विषयाचे शास्त्रोक्त ज्ञान तुलनेने अप्रगत आहे; उलट जमिनीत ज्यांची पाळे-मुळे रोवलेली आहेत अशा बंडीपुराच्या माहुतांसारख्या लोकांपाशी या विषयांचे भरपूर अनुभवजन्य ज्ञान आहे.

जग जिंकल्यावर युरोपीय इतर लोकांपाशी काहीही अर्थपूर्ण ज्ञान नाही असे दावे करू लागले. त्यांनी प्रस्थापित केलेल्या भारतीय वनविभागाने हीच भूमिका स्वीकारली आणि "लोकांचे ज्ञान, त्यांच्या पद्धती फालतू आहेत, आम्ही सांगतो तेच शास्त्रोक्त आहे' असा आग्रह धरला. परंतु, वनविभागाने केव्हाही काळजीपूर्वक वैज्ञानिक संशोधनाचा प्रयत्न केलेला नाही. ते जे सांगतात त्याला वास्तवाचा बळकट आधार नाही; त्यांचे बहुतांश प्रतिपादन बिनबुडाची अधिकारवाणी आहे. मला हे शिकवले बुरुडांनी. 1958 मध्ये कारवार जिल्ह्यातला बांबू कायमचा पुरेल अशा आश्वासनाच्या आधारावर दांडेलीच्या कागदगिरणीने उत्पादनाला सुरवात केली, पण प्रत्यक्षात 1973पर्यंत हा बांबू संपत आला होता. यातून बांबूवर पोट भरणाऱ्या हजारो कुटुंबांवर आकाश कोसळले होते. त्यांनी कर्नाटकाच्या अर्थमंत्र्यांना घेराव घातला आणि त्यातून मला या बांबूच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करायला सांगण्यात आले. मी वनाधिकाऱ्यांशी, कागद गिरणीच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली. सर्वांनी सांगितले की बांबू झपाट्याने कमी झाला आहे हे नक्की, पण त्याचे कारण आहे ग्रामवासीयांचे बांबू तोडणे आणि गायी-म्हशी चारणे. हे पडताळून पाहणे हे आमच्या अभ्यासाचे प्रमुख उद्दिष्ट होते. बांबूचे कोंब जसे वाढतात तशा बांबूंना आडव्या, काटेरी फांद्या फुटतात; बुंध्याजवळ त्यांचे जाळे बनते. गिरणीला प्रत्येक बेटातून जास्तीत जास्त बांबू हवा होता; हे काटेरी आवरण त्यांना अडचणीचे होते. शिवाय या गुंतागुंतीने नव्या बांबूंची नीट वाढ होत नाही, असे ते काहीही अभ्यास न करता ठासून सांगत होते. तेव्हा गिरणीचे मजूर मुद्दाम हे आवरण साफ करायचे. उलट गावकरी काटेरी आवरण शाबूत ठेऊन गुडघ्याच्या उंचीवरच बांबू तोडायचे. लोकांना माहीत होते, की या काटेरी आवरणामुळे नवे कोंब सुरक्षित राहतात. नाही तर सायाळ, वानरे, रानडुकरे, गायी-म्हशी ती फस्त करतात. कागद गिरणीच्या हस्तक्षेपामुळे हेच होत होते. बांबूच्या बेटांत उगवलेले नवे कोंब खाल्ले जाऊन बेटांची वाढ खुंटत होती. मग काही वर्षांत ही बेटे वाळून जायची. उलट जिथे गावकरी आपल्या पद्धतीने बांबू वापरत होते, तिथे बांबू सुस्थितीत होता. या उप्पर कागद गिरणीचे कामगार बांबू अंदाधुंद तोडून तो नासत होते हे वेगळेच. पाच वर्षे केलेल्या आमच्या अभ्यासाचा स्पष्ट निष्कर्ष निघाला की गावकरी नाहीत, गिरणीचाच गैरवापर बांबूच्या विध्वंसाला जबाबदार होता.

एवंच, विज्ञानाच्या अग्निपरीक्षेत पारखल्यावर लोकांचे ज्ञानच बावन्नकशी सोने ठरले होते. आमच्या अभ्यासाला मार्गदर्शन करण्यात कागद गिरणीच्या, तसेच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता. आमचा अहवाल अधिकृतपणे मान्य करण्यात आला. आम्ही अभ्यासासाठी निरनिराळ्या ठिकाणी कुंपणे आणि इतर निर्बंध घालून निरीक्षणे सुरू केली होती. ही प्रायोगिक निरीक्षणे आम्ही वनविभागाच्या हाती सुपूर्त केली आणि ती चालू ठेवून अधिक माहिती गोळा करण्यात येईल असे वनविभागाने आश्वासन दिले. परंतु, प्रत्यक्षात ती निरीक्षणे लागलीच बंद पडली आणि आमच्या अभ्यासाचे निष्कर्ष वापरून त्यांच्या व्यवस्थापन पद्धतीत काहीही सुधारणा केली गेली नाही. उघड आहे की नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनाच्या आजच्या शासकीय प्रणालींमध्ये मूलभूत सुधारणा करणे अत्यावश्‍यक आहे. अलीकडेच सामूहिक वनव्यवस्थापनाचे अधिकार मिळाल्यापासून लोकांना आपल्या जमिनीवरच्या ज्ञानाला पद्धतशीर निरीक्षणातून विकसित केलेल्या सच्च्या वैज्ञानिक ज्ञानाची जोड देत निसर्गसंपत्तीची जोपासना करण्याची सुसंधी उपलब्ध झाली आहे. यातून काहीतरी नवे आणि चांगले घडेल अशी जबरदस्त आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com